Leading International Marathi News Daily

शनिवार, ७ फेब्रुवारी २००९

राज्य

वृत्तवाहिन्यांचे वृत्तपत्रांना कधीच आव्हान नाही - कुमार केतकर
पुणे, ६ फेब्रुवारी/ प्रतिनिधी

‘‘एखाद्या विषयाबाबत समाजमनात सुरू असलेली प्रक्रिया जाणून घेऊन ती अभ्यासपूर्ण पद्धतीने बातमीतून प्रकट झाली पाहिजे. हीच बातमीदारी वृत्तपत्रातील पत्रकारितेचा नवा आयाम ठरणार असून, अशी बातमीदारी करण्याचे सामथ्र्य केवळ वृत्तपत्रांमध्येच आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमातील दृश्य बातमीपेक्षा मुद्रित माध्यमातील लेखन चिरकाल टिकणारे असल्याने वृत्तवाहिन्या वृत्तपत्रांना कधीच आव्हान देऊ शकणार नाहीत,’’ असे विचार ‘लोकसत्ता’चे संपादक कुमार केतकर यांनी आज येथे व्यक्त केले.

सत्ता प्राप्त करण्यासाठी महामोहीम -अडवाणी
नागपूर, ६ फेब्रुवारी/प्रतिनिधी

येत्या लोकसभा निवडणुकीत सत्ता प्राप्त करण्यासाठी भाजप एक महामोहीम हाती घेणार आहे. नागपुरातील पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर पक्षाच्या महामोहिमेला सुरुवात होईल, असे लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी यांनी सांगितले.अडवाणी यांचे आज सकाळी १०.४५ वाजता नागपूर येथे विमानाने आगमन झाले. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

एनडीएचे अडवाणी, यूपीएचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण?
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंग यांचा सवाल
नागपूर, ६ फेब्रुवारी/ प्रतिनिधी
आगामी लोकसभा निवडणूक संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) यांच्यात होणार आहे. दीर्घानुभवाच्या आधारे एनडीएचे नेतृत्व करणाऱ्या लालकृष्ण अडवाणी यांच्याप्रमाणे यूपीएचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण आहे, असा प्रश्न भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंग यांनी विचारला. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक शुक्रवारी सिव्हिल लाईन्समधील राणी कोठी येथे सुरू झाली.

राष्ट्रीय दृष्टिहीन संघाच्या सामथ्र्य-२००९ उपक्रमात
आळंदी-पुण्याची जागृती अंध मुलींची शाळा सवरेत्कृष्ट
अलिबाग, ६ फेब्रुवारी/ प्रतिनिधी
अंधांनीच अंधांच्या सर्वागीण विकासाकरिता चालविलेल्या राष्ट्रीय दृष्टिहीन संघ, महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने येथील आरसीएफ वसाहतीत आयोजित सामथ्र्य-२००९ या २१ व्या अंध कल्याण व शैक्षणिक सप्ताहात विविध स्पर्धामध्ये प्रथम क्रमांक मिळविल्याने आळंदी-पुणे येथील जागृती अंध मुलींची शाळा सवरेत्कृष्ट ठरली आहे.

निषाद देशमुख यांना आंतरराष्ट्रीय युवा प्रकाशन उद्योजकता पुरस्कार
नाशिक, ६ फेब्रुवारी / प्रतिनिधी

ब्रिटीश कौन्सीलतर्फे देण्यात येणाऱ्या युवा प्रकाशन उद्योजकता आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी यंदा नाशिक येथील करिअर पब्लिकेशन्सचे सह-संस्थापक व संचालक निषाद देशमुख यांची निवड झाली असून प्रसिद्ध लेखक हरी कुंझरू यांच्या हस्ते देशमुख यांना पुरस्काराचे वितरण करण्यात आले. अखिल भारतीय स्तरावर हा पुरस्कार मिळवणारे ते महाराष्ट्रातील पहिलेच प्रकाशक आहेत.
इंग्लंडमधील प्रकाशकांसोबत व्यावसायिक व सांस्कृतिक संबंध निर्माण करणाऱ्या तरूण उद्योजकास दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. या वर्षीच्या निवडीच्या अंतिम टप्प्यात मंदिरा सेन, स्त्री पब्लिकेशन्स, एस. आनंद, नवयाग पब्लिशिंग, एस. के घई, स्टर्लिंग पब्लिकेशन्स, देवांजन चक्रवर्ती, इंटर कल्चरल ग्रुप, ब्रिटीश कौन्सिल या प्रकाशन व्यवसायातील तज्ज्ञ व्यक्तींच्या समितीसमोर मुलाखती झाल्या. नाशिकसारख्या मध्यम शहरातून व्यवसायातील संधी शोधत आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला व्यवसाय नेत देशमुख यांनी स्वतंत्रपणे विज्ञान, तंत्रज्ञान व वैद्यकीय क्षेत्रातील प्रकाशन व्यवसायात आपला ठसा उमटविला, याची विशेष नोंद निवड समितीने घेतली. पुणे विद्यापीठातून पदवी घेतल्यावर देशमुख यांनी काही वर्षे विपणन क्षेत्रात काम करून उद्योजक बनण्याचा निर्णय घेतला. २००० मध्ये करिअर पब्लिकेशन्सचे काम सुरू करून नऊ वर्षांत औषध निर्माणशास्त्र या क्षेत्रातील ४५ अभ्यास पुस्तकांचे प्रकाशन केले. या पुस्तकाचे देशभर व काही विकसनशील राष्ट्रांमध्ये वितरण केले जाते. या पुरस्काराचा एक भाग म्हणून देशमुख हे ब्रिटनमधील प्रकाशन व्यवसायाचा अभ्यास करण्यासाठी जाणार आहेत. आंतरराष्ट्रीय तरूण प्रकाशक व्यावसायिकांच्या २००९ स्पर्धेसाठी ते एकमेव भारतीय प्रतिनिधी असतील.

गर्दची विक्री करणाऱ्या तिघांना अटक; सव्वा कोटीचा माल जप्त
पुणे, ६ फेब्रुवारी/प्रतिनिधी

‘देवरुषी बाबा’च्या नावाखाली गर्दची होलसेल दरात विक्री करणाऱ्या बापलेकासह गर्दुल्यास गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकून मुंढव्यात अटक करण्यात आली. तीन जणांच्या या टोळीकडून पोलिसांनी जप्त केलेल्या गर्दची आंतरराष्ट्रीय बाजारात एक कोटी पंचवीस लाख रुपये एवढी किंमत आहे. देवरुषी बाबा ऊर्फ नजीर अहमद महंमद हजरत शेख (५६), अहंमद नजीर शेख (२३, दोघेही रा. मिलिंदनगर, कल्याणी स्टील कंपनीसमोर, मुंढवा) आणि रफिक कादर बेग (३७, रा. अशोकनगर, म्हाडा क कॉलनी, येरवडा) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार मुंढव्यातील मिलिंदनगर येथील कल्याणी स्टील कंपनीसमोर राहणाऱ्या नजीर ऊर्फ बाबा शेख यांच्या राहत्या घरी पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी नजीर याला पोलिसांनी गर्द विकताना रंगेहाथ पकडले. बेग हा त्यावेळी गर्द खरेदी करण्यासाठी आला होता. नजीर याच्या घरझडतीमधून एक किलो वीस ग्रॅम वजनाचे गर्द, दोन वजनकाटे, मोबाईल, मापे, पॅकिंगच्या प्लॅस्टिकच्या व कागदी पिशव्या आणि रोख रक्कम असा पंधरा लाख ६६ हजार ९०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. एक किलो वीस ग्रॅम गर्दची आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे एक कोटी पंचवीस लाख रुपये एवढी किंमत होते. यासंदर्भात हडपसर पोलीस ठाण्यात अमली पदार्थ कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक जी. व्ही. निकम, पोलीस उपनिरीक्षक बाजीराव पाटील हे तपास करीत आहेत.

पंढरपुरात माघी यात्रेला तीन लाख भाविक
पंढरपूर, ६ फेब्रुवारी/वार्ताहर

सोलापूर जिल्ह्य़ासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सुमारे तीन लाख भाविकांच्या उपस्थितीत माघी एकादशीचा भक्तीमय सोहळा संपन्न झाला. मधुर घुमणारे टाळ- मृदंगाचे स्वर, डौलाने फडकणारी भागवत धर्माची पताका यामुळे सारे वातावरण भक्तीमय झाले होते.पहाटेपासूनच एकादशीची पर्वणी साधून वारकऱ्यांनी चंद्रभागा नदीवर स्नासाठी गर्दी केली होती, तर प्रत्येक फडावर भजन, कीर्तनाचे कार्यक्रम चालू होते. पहाटेपासूनच प्रत्येक मठातून नगर प्रदक्षिणेसाठी दिंडय़ांचा ओघ चालू होता.श्रीविठ्ठलाच्या पदस्पर्शासाठी दर्शनाची रांग मंदिरापासून सुमारे सात किलोमीटर अंतरावर गोपाळपूरजवळ गेली होती, तर मुखदर्शनाची रांग संत तुकारामभवनपासून दोन कि.मी. अंतरावर होती. ज्ञानेश्वरदर्शन मंडपातील दर्शन रांगेत उभ्या असलेल्या वारकरी भाविकांना पिण्याच्या पाण्याची सोय समितीने केली होती.