Leading International Marathi News Daily

शनिवार, ७ फेब्रुवारी २००९

क्रीडा

फ्लिंटॉफ, पिटरसन महागडे
आयपीएलचा लिलाव
पणजी, ६ फेब्रुवारी/पीटीआय
इंग्लंडचे दिग्गज क्रिकेटपटू केव्हिन पिटरसन आणि अ‍ॅण्ड्रय़ू फ्लिंटॉफ यांना १५ लाख ५० हजार अमेरिकन डॉलर (अंदाजे ७.३५ कोटी रुपये) इतका तगडा भाव मिळाला असून, इंडियन प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वासाठी येथे झालेल्या लिलावात जगातील सर्वात महागडय़ा क्रिकेटपटूंचा मान त्यांनी संपादन केला आहे. पहिल्यावहिल्या आयपीएल ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेत भारताचा कर्णधार महेंद्रसिंगला विक्रमी सहा कोटी रुपयांचा भाव मिळाला होता. इंग्लिश जोडगोळीने आज धोनीलाही मागे टाकले.

पीटरसनच्या खरेदीने मल्ल्या समाधानी
पणजी : इंग्लंडचा सवरेत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू अ‍ॅन्ड्रय़ू फ्लिन्टॉफ आणि कर्णधार केविन पीटरसन यांची आयपीएलच्या आज झालेल्या लिलावात १.५५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स अशा सर्वोच्च किमतीला खरेदी करण्यात आली. फ्लिन्टॉफची चेन्नई सुपर किंग्जने तर पीटरसनची बंगलोर रॉयल चॅलेंजर्सने खरेदी केली. आज लिलावात ज्या खेळाडूंची खरेदी करण्यात आली ती दोन वर्षांसाठी असेल असे आयपीएलचे चेअरमन ललित मोदी यांनी सांगितले. केविन पीटरसनच्या खरेदीनंतर बोलताना बंगलोर संघाचे मालक विजय मल्ल्या यांनी आता आपल्या संघाची फलंदाजी अधिक मजबूत होईल, असे म्हटले आहे.

भारत दुसऱ्या क्रमांकावर
दुबई, ६ फेब्रुवारी / पीटीआय

दक्षिण आफ्रिकेने बलाढय़ ऑस्ट्रेलियाला आयसीसी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थानावरून खाली खेचल्यानंतर भारतीय संघाने आज त्यांचे दुसरे स्थानही हिरावले. न्यूझीलंडने आज मेलबर्नला झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय लढतीतही ऑस्ट्रेलियाला ६ गडय़ांनी पराभवाचा जबरदस्त धक्का दिल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाला ‘वन डे’ जागतिक क्रमवारीतील दुसरे स्थानही गमवावे लागले.

२०११ च्या विश्वचषकानंतर मुरलीची निवृत्ती
कोलंबो, ६ फेब्रुवारी/वृत्तसंस्था

एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक बळी घेणारा मुरलीधरन २०११ मधील विश्वचषक स्पर्धेनंतर क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे.गुरुवारी भारताविरुद्ध झालेल्या सामन्यात मुरलीधरनने एकदिवसीय सामन्यातील सर्वोच्च बळींचा विक्रम आपल्या नावे केला. या अगोदर हा विक्रम पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज वासिम अक्रम याच्या नावावर होता.‘क्रिकइन्फो’ या संकेतस्थळाशी बोलताना मुरलीधरनने आपल्या निवृत्तीचे संकेत दिले आहेत. त्याने म्हटले आहे की, माझा फिटनेस सध्या चांगला आहे.

बलाढय़ ऑस्ट्रेलियाला सलग पाचव्या पराभवाचा धक्का
मेलबर्न, ६ फेब्रुवारी / पीटीआय

जागतिक क्रमवारीत अनेक वर्षे अव्वल स्थान कायम राखणाऱ्या विश्वविजेत्या ऑस्ट्रेलिया संघाच्या कामगिरीला आता खरोखरच उतरती कळा लागली असल्याचे आज न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सलग दुसऱ्या पराभवाने स्पष्ट झाले. आज न्यूझीलंडने दुसऱ्या एकदिवसीय लढतीत ऑस्ट्रेलियाचा सहा गडय़ांनी पराभव करत पाच एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत २-० ने आघाडी घेतली. या पराभवामुळे ऑस्ट्रेलियाची आयसीसी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर घसरण झाली. एकदिवसीय सामन्यातील हा ऑस्ट्रेलियाचा सलग पाचवा पराभव ठरला.

टीम ऑस्ट्रेलियाला ग्रासले मतभेदांनी!
मेलबर्न, ६ फेब्रुवारी/ वृत्तसंस्था

सततच्या पराभवाबरोबरच ऑस्ट्रेलिया संघाला खेळाडूंतील मतभेदांनीही ग्रासले असल्याची चर्चा येथील प्रसारमाध्यमांतून चालू झाली आहे. गेल्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या कसोटीत विजय मिळविल्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये मायकेल क्लार्क आणि सायमन कटिच यांच्यातील बोलाचालीचे रुपांतर झटापटीत झाले होते, असे वृत्त स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिले आहे. विजयानंतर ड्रेसिंग रुममध्ये संघ गीत गाण्याची ऑस्ट्रेलिया संघाची प्रथा आहे. सिडनी कसोटीनंतर संघ गीत गाण्यासाठी सर्व खेळाडू ड्रेसिंग रुममध्ये जमले होते.

राजस्थान रॉयल्ससाठी शिल्पा शेट्टीची नवीन जाहिरात
जयपूर : इंडियन प्रीमिअर लीगच्या पहिल्या वर्षांतील विजेत्या राजस्थान रॉयल्स संघाचे १२ टक्के शेअर्स विकत घेणारी सिनेतारका शिल्पा शेट्टी आपल्या संघासाठी नवीन जाहिरात करणार आहे. ही जाहिरात मार्चच्या मध्यावर तयार होणार असल्याचे राजस्थान रॉयल्सचे उत्कर्ष सिंग यांनी म्हटले आहे. या जाहिरातीबरोबरच राजस्थान रॉयल्सच्या सगळ्या लढतींदरम्यान ती आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी मैदानात उपस्थित राहणार आहे. कारण शेट्टी ती या संघाची भागधारक आहे, असे उत्कर्ष सिंग यांनी म्हटले आहे. शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली खेळणारा राजस्थान रॉयल्स संघ घरच्या मैदानावरील सात लढतींपैकी दोन सामने अहमदाबादमध्ये खेळणार आहे.

मारिज्वाना सेवनप्रकरणी मायकल फेल्फला शिक्षा
अटलांटा, ६ फेब्रुवारी / वृत्तसंस्था

बीजिंग ऑलिम्पिकचा अमेरिकन हीरो, जलतरणपटू मायकल फेल्फ याला अमेरिकन जलतरण संघटनेने तीन महिन्यांसाठी बडतर्फ केले आहे. मारिज्वाना पाइप हातात असलेल्या छायाचित्रामुळे आठ ऑलिम्पिक सुवर्णपदके पटकाविण्याचा या अमेरिकेच्या महान जलतरणपटूवर ही नामुष्की ओढावली आहे. तीन महिन्यांसाठी स्पर्धेतील सहभागांमध्ये बंदी आणि अर्थसहाय्य थांबविण्याचा निर्णय अमेरिकन क्रीडा संघटनेने घेतला आहे. येत्या गुरुवारपासून बंदीचा हा निर्णय लागू करण्यात येणार आहे.अमेरिकेच्या जलतरण संघटनेने यासंबंधी प्रसिद्ध केलेल्या पत्रकामध्ये म्हटले आहे, मायकल फेल्फने उत्तेजक द्रव्य सेवनासंबंधीच्या कोणत्याही नियमांचे उल्लंघन केले नाही. मात्र मायकल फेल्फने हजारो अमेरिकन चाहत्यांची निराशा केली आहे. अनेक अमेरिकन आणि हजारो अमेरिकन तरुण उदयोन्मुख जलतरणपटू मायकल फेल्फकडे आपला आदर्श म्हणून पाहत आहेत. त्यामुळे त्याच्या कृत्यामुळे या सर्वाची घोर निराशा झाली आहे. मायकल फेल्फला त्याची जाणीव करून देण्यासाठी संघटनेने हे कठोर पाऊल उचलले आहे.

पराभवाचा वचपा काढू -युनूस खान
कराची, ६ फेब्रुवारी/ वृत्तसंस्था

श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेत झालेल्या पराभवाचा वचपा कसोटी मालिकेत काढू, असे पाकिस्तानचा नूतन कर्णधार युनूस खान याने म्हटले आहे.श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत पाकिस्तानला २-१ असा पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळे शोएब मलिक याची कर्णधारपदावरुन उचलबांगडी करण्यात आली. त्याच्या जागी युनूस खान याची नियुक्ती करण्यात आली. या दोन संघातील कसोटी मालिका या महिन्याच्या अखेरीस चालू होणार आहे.या मालिकेसंदर्भात बोलताना खान म्हणाला की, श्रीलंकेविरुद्धची मालिका चुरशीची होणार आहे. आम्ही गेल्या १५ महिन्यांत एकही कसोटी खेळलेलो नाही. मात्र कसोटी मालिकेत एकदिवसीय मालिकेतील पराभवाचा वचपा काढण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील आमचा पराभव लाजिरवाणा होता. त्या कामगिरीची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी आम्ही कसोशीने प्रयत्न करु, असेही युनूस खानने सांगितले.

पश्चिम विभागाचे वर्चस्व
चेन्नई, ६ फेब्रुवारी / पीटीआय

अजिंक्य रहाणेच्या (१६५) दीडशतकी खेळीच्या जोरावर पहिल्या डावात ४५९ धावांची दमदार मजल मारणाऱ्या पश्चिम विभागाने प्रतिस्पर्धी दक्षिण विभागाची ४ बाद १०६ अशी नाजूक अवस्था केली आणि दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीत दुसऱ्या दिवसअखेर वर्चस्व मिळवले. आज दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी अर्धशतक झळकावणाऱ्या सुब्रम्हण्यम बद्रीनाथला (५४) दिनेश कार्तिक (५) साथ देत होता.
पश्चिम विभागाच्या पहिल्या डावातील विशाल धावसंख्येच्या प्रत्युत्तरात खेळताना कर्णधार सुब्रम्हण्यम बद्रीनाथचा (नाबाद ५४ )अपवाद वगळता दक्षिण विभागाचे आघाडीचे फलंदाज अपयशी ठरले. भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड (५) आणि मुरली विजय (१०) यांना झटपट माघारी परतवल्यामुळे पश्चिम विभागाला वर्चस्व मिळवण्याची संधी मिळाली. रमेश पोवारने सलामीवीर रॉबिन उथप्पाला (३२) तर राजेश पवारने राहुल द्रविड व मुरली विजय यांना माघारी परतवले. चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात एम. सुरेश धावचित झाल्याने दक्षिण विभागाचा डाव अडचणीत सापडला. त्याआधी, कालच्या ५ बाद ३०३ धावसंख्येवरून पुढे खेळणाऱ्या पश्चिम विभागाने पहिल्या डावात ४५९ धावांची मजल मारली. पश्चिम विभागाच्या डावात अजिंक्य रहाणेव्यतिरिक्त सिद्धार्थ त्रिवेदी (२३), राजेश पवार (१८) व रमेश पोवार (१२) या फलंदाजांचेही योगदान उल्लेखनीय ठरले. रहाणेच्या १६५ धावांच्या खेळीत १८ चौकार आणि तीन षटकारांचा समावेश आहे.

गेल, सरवानची शतके;
विंडीज ३ बाद २२४
जमैका, ६ फेब्रुवारी / वृत्तसंस्था

ख्रिस गेल आणि रामनरेश सरवान यांची झुंजार शतके आणि दुसऱ्या विकेटसाठी केलेल्या २०२ धावांच्या दमदार भागीदारीच्या बळावर सबिना पार्कवर इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात यजमान वेस्ट इंडिजने तिसऱ्या दिवसाच्या उपहारापर्यंत ३ बाद २२४ अशी मजल मारली होती. खेळ थांबला तेव्हा रामनरेश सरवान १०३ तर शिवनारायण चंदरपॉल ० धावांवर खेळत होते.
इंग्लंडच्या ३१८ धावांच्या प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजने दुसऱ्या दिवसअखेर १ बाद १६० धावांची मजल मारली होती. सकाळच्या सत्रात विंडीजचा कर्णधार ख्रिस गेल आणि सरवान यांनी मोठी धावसंख्या उभारण्याच्या इराद्यानेच फलंदाजी केली. गेलने पाच चौकार आणि पाच षटकारांच्या साह्याने १०४ धावांची खेळी साकारली. उपहारापूर्वी ख्रिस ब्रॉडने गेलचा त्रिफळा उडवून ही महत्त्वपूर्ण जोडी फोडली. त्यानंतर दुसऱ्याच चेंडूवर ब्रॉडने झेव्हियर मार्शलला भोपळाही न फोडू देता पायचीत केले. त्यानंतर सरवानने १० चौकारांनिशी आपले शतक साजरे केले.

सर्वोत्तम एकदिवसीय खेळी -गंभीर
कोलंबो, ६ फेब्रुवारी / पीटीआय

श्रीलंकेविरुद्ध गुरुवारी केलेली दीडशतकी खेळी आतापर्यंतच्या एकदिवसीय कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी असल्याचे मत सामनावीर ठरलेल्या गौतम गंभीरने व्यक्त केले. या शतकी खेळीमुळे न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी मनोधैर्य उंचावले असल्याचे त्याने सांगितले. प्रत्येक शतकी खेळीला वेगळे महत्त्व असते पण, शतक झळकावल्यानंतर संघाने विजय मिळवला तर त्या खेळीला अधिक महत्त्व प्राप्त होते. श्रीलंकेत शतक झळकावणे कठीण आहे. त्यामुळे हे शतक कारकिर्दीतील सर्वोत्तम असल्याचे त्याने सांगितले. या वर्षांतील हे पहिले शतक असल्यामुळे विशेष आनंद झाला, असे ६८ एकदिवसीय लढतीत सहा शतके झळकावणाऱ्या गंभीरने सांगितले.

भारत पराभूत
पंजाब सुवर्णचषक हॉकी
चंडिगड, ६ फेब्रुवारी/वृत्तसंस्था

पंजाब सुवर्ण चषक हॉकी स्पर्धेत भारताला आज विश्वविजेत्या जर्मनीकडून ४-२ असा पराभव स्वीकारावा लागला. भारताचा स्पर्धेतील हा पहिला पराभव आहे. भारताचे या स्पर्धेत आठ गुण झाले आहेत. उद्या भारताची गाठ न्यूझीलंडशी पडणार आहे. उद्याचा सामना भारताने अनिर्णित राखला तरी भारताला अंतिम फेरी गाठता येईल. उद्या हॉलंड आणि जर्मनी यांच्यात लढत होणार आहे. जर्मनीने उद्याची लढत जिंकली तरी त्यांना अंतिम फेरीत प्रवेश मिळणार नाही. उद्या विजय मिळविला तर जर्मनीचे आठ गुण होतील. भारताने न्यूझीलंडविरुद्धची लढत अनिर्णित राखली तर भारताचे नऊ गुण होतील.
हॉलंड अंतिम फेरीत
युरोपियन चॅम्पियन हॉलंडने आज न्यूझीलंडचा ४-१ गोलने पराभव केला आणि चार देशांच्या पंजाब सुवर्णचषक हॉकी स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश केला. यजमान संघाविरुद्ध दोन्ही लढतीत बरोबरीत समाधान मानावे लागलेल्या हॉलंडने आज स्पर्धेत तिसरा विजय मिळवत ११ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. रॉब रेकर्स (२४ वा मिनिट), लुकास जज (३१ वा मिनिट), वौटर जोली, जेरन हत्झबर्गर यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवत हॉलंडच्या विजयात उल्लेखनीय योगदान दिले. पराभूत न्यूझीलंड संघातर्फे झालेला एकमेव गोल ६३व्या मिनिटाला निक हॅग याने केला.

मुंबई खो-खो संघटना महापौर चषक स्पध्रेसाठी उत्सुक
मुंबई, ६ फेब्रुवारी/क्री.प्र.

मुंबई महानगरपालिकेने महापौर चषक खो-खो स्पध्रेचे प्रतिवर्षी आयोजन करावे. यंदाच्या महापौर चषक स्पध्रेचे यजमानपद मुंबई उपनगर खो-खो असोसिएशनला देण्यास काही अडचणी येत असतील तर मुंबई खो-खो संघटना आयोजनासाठी सक्षम आहे. असा ठराव रविवारी दादर येथे झालेल्या मुंबई खो-खो असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संमत झाला. महापौर चषक स्पर्धा होण्यासाठी मुंबई खो-खो संघटना यजमानपद सांभाळायला तयार आहे, अशा आशयाचे संघटनेचे पत्र लवकरच मुंबईचे महापौर आणि लेखापाल यांना सुपूर्द करण्यात येणार आहे. या सभेत मॅटवर झालेल्या अभिनव खो-खो स्पध्रेचे विशेष कौतुक झाले. याचप्रमाणे व्यावसायिक खो-खो स्पध्रेच्या संदर्भात सखोल चर्चा झाली. व्यावसायिक गटाच्या स्पर्धा नियमितरीत्या स्पर्धा झाल्यास मुलांच्या नोकऱ्या आणि खेळाच्या व्यावसायिक वातावरण निर्मितीस हातभार लागतो, या विषयावर विचारमंथन झाले.

बँक ऑफ महाराष्ट्र- ओएनजीसी यांच्यात अंतिम लढत रंगणार
मुंबई, ६ फेब्रुवारी / क्री. प्र.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, जांभोरी मैदान, वरळी येथे सुरू असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र सहपुरस्कृत जगन बेंगळे स्मृती १८ व्या मुंबई जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेतील आंतरसंस्था सांघिक ‘अ’ गटात बँक ऑफ महाराष्ट्रने उपान्त्य फेरी सामन्यात बँक ऑफ इंडियाचा ३-० असा सरळ पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला, तर ओन. एन. जी. सी.ने मुंबई महानगरपालिकेवर २-१ असा विजय मिळविला. बँक ऑफ महाराष्ट्रविरुद्द ओ. एन. जी. सी. अंतिम लढत शनिवारी दुपारी ३ वाजता होणार आहे. उपान्त्य फेरीचे निकाल पुढीलप्रमाणे : बँक ऑफ महाराष्ट्र वि. वि. बँक ऑफ इंडिया ३-०, ओ. एन. जी. सी. वि. वि. मुंबई महानगरपालिका २-१.