Leading International Marathi News Daily

शनिवार, ७ फेब्रुवारी २००९

ठाण्यातील अनधिकृत बांधकामांची होणार सीआयडी चौकशी
ठाणे/प्रतिनिधी

ठाण्यातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याबाबतचे प्रकरण उच्च न्यायालयात असतानाही शहरातील अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट सुरू आहे. त्यामुळे ही बांधकामे कोणामुळे होतात आणि त्याला कोण अभय देते, याची सीआयडीमार्फत चौकशी करण्याचा निर्णय गुरूवारी सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. काँग्रेसचे शैेलेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला यांनी शहरातील अनधिकृत बांधकामाबाबत मांडलेल्या लक्षवेधीवर तब्बल १० तास चर्चा झाली.

मराठी गीतांचा वेलू गेला टीव्हीवरी!
प्रशांत मोरे

झी मराठी या दूरचित्रवाणी वाहिनीवरील सध्या लोकप्रियतेचे एव्हरेस्ट गाठलेल्या ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या रिअ‍ॅलिटी शोमधील अंतिम फेरीत प्रवेश केलेल्या पाचही बालगायकांनी आपल्या अफाट प्रतिभेने अक्षरश: लहान तोंडी मोठा घास घेत या कार्यक्रमाच्या पारडय़ात टीआरपीचे तगडे माप टाकलेच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे हल्ली सार्वजनिक ठिकाणी क्वचित कधीतरी ऐकल्या जाणाऱ्या, अवीट गोडी असूनही केवळ चांगले व्यासपीठ उपलब्ध नसल्याने विस्मृतीच्या पडद्याआड जाण्याची भीती निर्माण झालेल्या जुन्या-नव्या मराठी गाण्यांना छोटय़ा पडद्यावर प्राइम टाइममध्ये सुपरहिट करून टाकले आहे. त्यामुळे सध्या भावगीतांचा वेलू गेला टीव्हीवरी अशी अवस्था आहे.

अमेरिकन मंदीचा तूर्त भारतावर परिणाम नाही - डॉ. रूपा रेगे
बदलापूर/वार्ताहर
येथील आदर्श कला आणि वाणिज्य महाविद्यालयात ‘जागतिक वित्तीय अरिष्ट आणि त्याचे भारतावरील परिणाम’ या विषयावर आयोजित दोन दिवसीय चर्चासत्र नुकतेच पार पडले. चर्चासत्राचा समारोप करताना बँक ऑफ बडोदाच्या डॉ. रूपा रेगे यांनी हे स्पष्ट केले की, भारतीय वित्तीय व्यवस्था आणि विशेषकरून बँका आर्थिकदृष्टय़ा अगदी सक्षम असून अमेरिकन महामंदीपासून आपल्याला कसे दूर ठेवता येईल याची त्यांनी पूर्ण खबरदारी घेतली आहे. याशिवाय रिझर्व बँकेनेही अत्यंत काळजीपूर्वक पावले उचलली असून देशाच्या वृद्धी दरावर कमीत कमी परिणाम होण्यासाठी तत्पर कार्यवाही केली आहे.

‘शतरंगी विनोद’ तणावग्रस्त समाजाला उभारी देईल - अ‍ॅड. श्रीकांत गडकरी
ठाणे/प्रतिनिधी
‘अ‍ॅड. अनंत मेढेकरांचे विनोद उच्च दर्जाचे असून आजच्या टेन्शनग्रस्त समाजाला अशाच पुस्तकाची गरज आहे,’ असे उद्गार ज्येष्ठ अ‍ॅड. श्रीकांत गडकरी यांनी ‘शतरंगी विनोद’ पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात काढले.ठाणे जिल्हा वकील संघटनेने आयोजित समारंभ ठाणे वकील संघटनेच्या सभागृहात नुकताच पार पडला. महाराष्ट्र गोवा वकील परिषदेचे सदस्य अ‍ॅड. प्रमोद पाटील यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले. याप्रसंगी नाटककार व प्रसिद्ध वकील संजय बोरकर, अ‍ॅड. प्रदीप टिल्लू, ठाणे जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष गजानन चव्हाण, अभिनेत्री शर्मिला कुलकर्णी, अ‍ॅड. यशवंत म्हसकर आदी मान्यवरांनी अ‍ॅड. मेढेकरांच्या पुस्तकांची मुक्तकंठाने प्रशंसा केली. प्रसिद्ध व्यंगचित्रकार विवेक मेहेत्रे यांच्या उद्वेली बुक्सतर्फे या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. अ‍ॅड. मदन ठाकूर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

ठाणे न्यायालयात न्यायमूर्तीवरच आरोप ! फिर्यादींना अटक
ठाणे/ प्रतिनिधी

ग्रामपंचायत सदस्याच्या खुनाच्या आरोपातून ठाणे जलदगती न्यायालयाचे न्या. जी. डी. शिरवाडकर यांनी गुरूवारी १८ आरोपींची निदरेष मुक्तता केल्याने संतप्त झालेल्या फिर्यादी आणि त्याच्या नातेवाईकांनी न्यायालयातच न्यायमूर्तीवर आरोप करून गोंधळ घातला. ठाण्यातील न्यायमूर्ती बच्छाव यांच्यावर निलंबनाची कारवाई झाल्यानंतर न्या. शिरवाडकर यांच्या विरोधात ठाणे जिल्हा न्यायाधिशांकडे तक्रार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

निव्वळ कागदावरच्या तालुक्याचा भाडोत्री संसार!
सोपान बोंगाणे

तब्बल १० वर्षांपूर्वी शासनाने निर्माण केलेल्या विक्रमगड तालुक्याच्या ठिकाणी आवश्यक असलेल्या मुख्यालयासह अद्याप एकाही शासकीय कार्यालयाला स्वत:ची जागा नाही. भाडय़ाच्या जागेतील कार्यालयात अपुरे कर्मचारी, निवासाची कोणतीही सोय नाही. ५१ लाख रुपये खर्च करून बांधलेल्या ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचा केवळ सांगाडा वगळता संपूर्ण विक्रमगड गावात तालुक्याचे मुख्यालय असल्याची एकही खूण सापडत नाही. त्यामुळे विक्रमगड हा केवळ कागदोपत्री तालुका उरला आहे.

रेखा चौहान यांची नियुक्ती
बदलापूर : अंबरनाथ शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी रेखा चौहान यांची नियुक्ती करण्यात आली आहे.ठाणे जिल्हा ग्रामीण महिला काँग्रेस अध्यक्षा संघजा मेश्राम यांनी चौहान यांची शहर अध्यक्षपदी नियुक्ती केली. हे वर्ष निवडणुकीचे असल्याने सर्व महिलांना एकत्र आणून पक्ष संघटना मजबुतीवर भर देणार असल्याचा विश्वास चौहान यांनी व्यक्त केला. याशिवाय शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या नागरी समस्या सोडविण्यासाठी नगरपालिकेशी पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

कुमुदिनी काटदरे यांचे गायन
बदलापूर/वार्ताहर

अंबरनाथ संगीत सभेच्या वतीने रविवार, ८ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता ब्राह्मणसभा सभागृह, दत्तमंदिर, वडवली, अंबरनाथ (पू) येथे कुमुदिनी काटदरे (पुणे) यांच्या शास्त्रीय गायनाची मैफल आयोजित करण्यात आली आहे. प्रवेश विनामूल्य आहे. सभेच्या वतीने दर महिन्याला महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या गायक, वादक कलावंतांची मैफल रसिकांकरीता आयोजित केली जाते, अशी माहिती डॉ. वसंत महाजन यांनी दिली.