Leading International Marathi News Daily

शनिवार, ७ फेब्रुवारी २००९

विविध

पाकिस्तानचे वादग्रस्त अणुशास्त्रज्ञ ए. क्यू. खान र्निबधमुक्त
नवी दिल्ली, ६ फेब्रुवारी/पीटीआय

 

पाकिस्तानचे वादग्रस्त अणुशास्त्रज्ञ ए. क्यू. खान यांच्यावरील र्निबध इस्लामाबाद उच्च न्यायालयाने आज हटविले. मात्र अणुतंत्रज्ञानाची तस्करी केल्याचा आरोप असलेल्या ए. क्यू. खान यांनी र्निबधमुक्त होण्यासाठी पाकिस्तान सरकारशी न्यायालयाबाहेर गुप्त समझोता केला असल्याचे पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. आपल्यावरील र्निबध हटविण्यासंदर्भात खान यांनी न्यायालयात याचिका सादर केली होती. यासंदर्भात इस्लामाबाद उच्च न्यायालयाने निकाल देताना म्हटले आहे की, ए. क्यू. खान हे पाकिस्तानमध्ये मुक्तपणे वावरू शकतात तसेच विज्ञान संस्थांमध्ये संशोधनासाठी जाऊ शकतात. तसेच नातेवाईक व जवळच्या मित्रांकडे जाण्यासही खान आता मोकळे आहेत.२००४ सालाच्या प्रारंभी आपण अणुतंत्रज्ञानाची तस्करी केली होती अशी कबुली ए. क्यू. खान यांनी दिली होती. त्यानंतर आपल्यावरील र्निबध हटविले जावे यासाठी ए. क्यू. खान यांनी न्यायालयाबाहेर पाकिस्तान सरकारशी गुप्त समझोता केला असे वृत्त पाकिस्तानमधील दूरचित्रवाहिन्यांनी प्रसारित केले आहे.ए. क्यू. खान यांनी पत्रकारांना सांगितले की, माझ्यावरील र्निबध न्यायालयाने हटविले आहेत ही माहिती मला पाकिस्तानी दूरचित्रवाहिन्यांच्या वृत्ताव्दारेच मिळाली. आता मी मुक्तपणे वावरू शकतो. मात्र अजूनही घरातच आहे अशी पुस्तीही त्यांनी पुढे जोडली.

किरण कर्णिक यांच्याकडे ‘सत्यम’च्या अध्यक्षपदाची धुरा
नवी दिल्ली, ६ फेब्रुवारी/ वृत्तसंस्था

घोटाळेबाज सत्यम कॉम्प्युटरमधील अध्यक्षपदाचा सर्वोच्च पदभार आज नॅसकॉमचे माजी अध्यक्ष किरण कर्णिक यांच्यावर सोपविण्यात आला. कर्णिक हे सत्यमवरील सरकारनियुक्त संचालक मंडळाचे सदस्यही आहेत. कालच सत्यमचे एक वरिष्ठ अधिकारी ए. एस. मूर्ती यांची कंपनीच्या सीईओ पदावरील नियुक्ती घोषित करण्यात आली होती. केंद्रीय कंपनी व्यवहारमंत्री प्रेमचंद गुप्ता यांनी आज किरण कर्णिक यांच्या नावाची घोषणा केली. गुप्ता यांच्या विभागानेच सत्यममधील घोटाळा उघडकीस आल्यानंतर कंपनी लॉ बोर्डनुसार सत्यमचे संचालक मंडळ बरखास्त करून नवीन सरकारनियुक्त संचालक मंडळाकडे कंपनीचा कारभार सोपविला होता. या संचालक मंडळाने आजवर अनेक बैठकांमध्ये चर्चाविमर्श करून महत्त्वाच्या पदांबाबत शिफारशी केल्या होत्या. आयटी क्षेत्रात अनेक वर्षांचा अनुभव असलेले कर्णिक हे २००१-०२ साली या उद्योगक्षेत्राची शिखर संघटना नॅसकॉमचे अध्यक्षपद भूषविले आहे. ‘डिस्कव्हरी नेटवर्क’चे व्यवस्थापकीय संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.

दोन बहिणींची झाली ६६ वर्षांनंतर पुनर्भेट
कोलकाता, ६ फेब्रुवारी/पी.टी.आय.

चुकीचे नाव नोंदल्याने होणाऱ्या मनस्तापाचा अनुभव अनेकांना आला असेल. मात्र इंटरनेटवर चुकीचे नाव लिहिले गेल्याचा फायदा होऊन म्यानमारच्या दोन बहिणींची तब्बल ६६ वर्षांनंतर पुनर्भेट झाली आणि तीही कोलकात्यात! रंगूनमध्ये जन्मलेल्या या दोघींपैकी थोरलीचे नाव सिबिल ले फ्लोरी व धाकटीचे ब्लांचे आहे. डिसेंबर १९४१ मध्ये जपानने म्यानमारवर हल्ला चढविल्यानंतर या दोघींची ताटातूट झाली होती. सिबिल ले फ्लोरीचा मुलगा डेरेक फ्लोरी याने इंटरनेटवर गुगल सर्च इंजिनमध्ये आपल्या आईचे नाव टाइप केले. पण तिच्याबद्दलची काहीही माहिती उपलब्ध नव्हती. त्यामुळे त्याने पुन्हा ते नाव टाइप केले खरे पण हे करताना त्याच्याकडून स्पेलिंगची चूक झाली आणि संगणकाच्या पडद्यावर आलेल्या माहितीतून त्याला आपल्या मावशीचा म्हणजे ब्लांचे-देसाई हिचा संदेश. मी माझी मोठी बहिण सिबिलचा शोध घेत असल्याचे तिने त्या संदेशात म्हटले होते. त्यानंतर या दोघींनी इंटरनेटद्वारे संपर्क साधून खातरजमा केली. २००७ मध्ये सिबिल सपरिवार कोलकात्यात आली व दोघींची गळाभेट झाली. सिबिलचा मुलगा डेरेक सध्या कोलकात्यात आला असून त्यानेच ही कथा पत्रकारांना सांगितली.जपानने म्यानमारवर आक्रमण केले त्या धामधुमीत सिबिलची घरच्या मंडळींशी ताटातूट झाली. ती नंतर भारतात मेरठ येथे आली व १९४३ साली एका स्कॉटिश शिपायाबरोबर विवाहबद्ध झाली. नंतर ती स्कॉटलंड येथे स्थायिक झाली तर ब्लांचे हिने एका रेडिओ निवेदकाबरोबर लग्न केले व ती कोलकाता येथे स्थायिक झाली. या दोन्ही बहिणींना एकमेकींच्या अस्तित्वाची पुसटशीही जाणीव नव्हती.

नव्या नावाने ‘जमात’ पुन्हा सक्रिय
इस्लामाबाद, ६ फेब्रुवारी/पी.टी.आय.

पाकिस्तानने बंदी घातलेल्या ‘जमात-उद-दावा’ संघटनेने नाव बदलून पुन्हा डोके वर काढले असून लाहोरमध्ये या संघटनेच्या नेत्यांनी ‘तेहरिक ए आझादी ए काश्मीर’ या नव्या संस्थेच्या नावाने हजारोंचा मोर्चा काल काढला. मुंबईवरील हल्ल्यांनंतर अमेरिका व संयुक्त राष्ट्रांकडून आलेल्या दडपणानंतर या संघटनेवर पाकिस्तानने बंदी घातली होती. लाहोरमध्ये ‘जमात-उद-दावा’च्या देशभरातील नेत्यांची रविवारी बैठक झाली. त्यात संघटनेचे नवे नाव ठरविण्यात आले. अर्थात हे नाव तात्पुरते असून नवे कायमस्वरुपी नाव नंतर निश्चित केले जाणार आहे.

‘स्लम डॉग मिलेनिअर’ ला ‘बेस्ट ब्रिटिश फिल्म’ पुरस्कार
लंडन, ६ फेब्रवारी / पी.टी.आय.

आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध पुरस्कार पटकाविणाऱ्या ‘द स्लम डॉग मिलेनिअर’ या चित्रपटाने ब्रिटनच्या वार्षिक चित्रपट महोत्सवात ‘बेस्ट ब्रिटिश फिल्म’ सहित तीन पुरस्कार मिळवून आपली घोडदौड कायम ठेवली आहे. मुंबईतील झोपडपट्टीमधील जीवनाचे दर्शन घडविणाऱ्या या चित्रपटाने जगभरात तडाखेबंद यश मिळविले असून अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळविले आहेत. डॅनी बॉयल दिग्दर्शित या चित्रपटाची सर्वत्र प्रशंसा होत आहे. ब्रिटन चित्रपट महोत्सवात बॉयल आणि पटकथालेखक सायमन बिफोय या दोघांचाही गौरव करण्यात आला.

‘श्रीराम सेने’ला भाजपचा पाठिंबा नाही
नागपूर, ६ फेब्रुवारी/ प्रतिनिधी

कर्नाटकमध्ये पब संस्कृतीविरोधात हिंसक कृत्ये करणाऱ्या श्रीराम सेनेला भाजपचा पाठिंबा नाही, असे पक्षप्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी स्पष्ट केले. मंगलोरमधील एका पबमध्ये शिरून काही युवक-युवतींना मारहाण करणाऱ्या श्रीराम सेनेला आम्ही पाठिंबा देण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळेच तेथील भाजप सरकारने संघटनेच्या कार्यकर्त्यांवर कारवाई केली आहे. मात्र पब कल्चर ही भारताची संस्कृती नाही असे अनेकांचे मत आहे, अशी पुस्ती प्रसाद यांनी जोडली. भाजपने राम व रोटीचा मुद्दा सोडून दिला आहे काय असे विचारता, राम मंदिर हा नेहमीच निवडणुकीचा मुद्दा होऊ शकत नाही, असे ते म्हणाले. महाराष्ट्र व कर्नाटक वादाबाबत तसेच शिवसेनेच्या विरोधाबाबत विचारता प्रसाद उत्तरले की, कोणत्याही दोन राज्यांत एखाद्या मुद्यावर वाद असेल तर चर्चेने त्यावर तोडगा निघू शकतो. आमचे सरकार सत्तेवर आले की या प्रश्नावरही तोडगा निघेल.