Leading International Marathi News Daily
रविवार, ८ फेब्रुवारी २००९

सारेगमप‘लिटिल चॅम्प्स्’ची आज अंतिम फेरी आहे. या स्पध्रेदरम्यान मुलं कशी घडत गेली, त्यांची गायकी कशी बहरत गेली, त्यांचं व्यक्तिमत्त्व कसं फुलत गेलं हे जाणून घेणं मोठं रंजक आहे. या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सांगितिक समुपदेशकाचे हे अनुभवाचे बोल.. या गुणी मुलांना अलविदा करताना या स्पध्रेतील काही अनवट पैलू उलगडून दाखविणारे काही लेख.
एखाद्या छोटय़ा बाळाचं भुरभुरणारं जावळ भान हरपून पाहत राहावं, त्याच्या तान्ह्या मुठीत त्यानं आपलं बोट पकडून ठेवावं आणि आपण कौतुकानं त्या कोवळ्या स्पर्शाची कोमल अनुभूती घेत राहावं, तसाच अनुभव गेले सहा महिने प्रत्येक मराठीच नव्हे, तर अमराठी माणसांना, कुटुंबांना दिला झी मराठीने! सारेगमप लिटिल चॅम्पस् सुरू झालं आणि प्रत्येक घरानं जणू कात टाकली. प्रत्येक नगर, उपनगर झालं गोकुळ आणि प्रत्येक घरात जणू कान्ह्याचा जन्म झाला. दिसामासानं वाढणाऱ्या कृष्णाच्या बाललीलांप्रमाणेच या बालकलाकारांच्या स्वर्गीय गानलीलांनी जो- तो लुब्ध होऊ लागला आणि ही बाळरूपं त्यांच्या मुलांइतकीच त्यांची, त्यांच्या घरची होऊन गेली.
जेव्हापासून छोटा पडदा अस्तित्वात आला, नानाविध चॅनल्सनी रंजनाचे विविध लोकाभिमुख प्रयोग करायला सुरुवात केली, त्यामध्ये मुलांचेसुद्धा अनेक कार्यक्रम दर्शकांसमोर आले. गायन, नृत्य, अंताक्षरी, अॅकॅडमिक टॅलेंट शोज्, शॉर्ट फिल्म्स.. खूप काही. पण आमच्या सारेगमपच्या छोटय़ा कलाकारांनी मात्र प्रत्येक मनाचा ताबा घेतला. का झालं असेल बरं असं? या कार्यक्रमातील सांगीतिक समुपदेशक आणि मुलांच्या गाण्यांना मार्गदर्शन करणारी प्रशिक्षिका म्हणून गेले काही महिने मी या विषयाचा थोडासा खोलात जाऊन विचार करते आहे. इतर कुठल्याही सर्वसाधारण कार्यक्रमापेक्षा या कार्यक्रमाचा स्पॅन अधिक मोठा आहे, हे याचं कारण असेल का? पण तसं असेल तर याहीपेक्षा कितीतरी अधिक स्पॅनवाले कार्यक्रम आपण पाहतोच की! ते कार्यक्रम कधी एकदा बंद होतील, असंसुद्धा वाटतं आपल्याला. पण ‘सारेगमप लिटिल चॅम्पस्’ चालतच राहावा, पाहतच राहावा असं का वाटतं बरं?
याचं श्रेय झी मराठीला द्यायला पाहिजे. हा कार्यक्रम सुरू झाला त्यापूर्वी सुमारे एक आठवडा आधीपासून या सर्व मुलांची कम्फर्ट लेव्हल उंचावण्यासाठी झी मराठीकडून अनेक सुंदर गोष्टी केल्या गेल्या. अनेक प्रथितयश मंडळींनी मुलांशी गप्पा मारल्या, त्यांच्याशी वैचारिक देवाणघेवाण केली. समाजाच्या विविध स्तरांतून आलेल्या या मुलांना बोलतं केलं गेलं. दिग्दर्शक राजन डांगे यांनी आपल्या ऋजू स्वभावानं आणि मधुर शब्दांनी मुलांचं मन जिंकलं. मुलांशी झालेल्या संवादातून आणि त्यांच्या प्रोफाइलचा अभ्यास करून मीटिंगच्या पहिल्याच दिवशी त्यांनी पल्लवीताईच्या हस्ते मुलांना त्यांच्या त्यांच्या आवडीच्या गिफ्टस् दिल्या. यापूर्वी मुलांचे कार्यक्रम आयोजित करणाऱ्या अनेक व्यवस्थापनांशी माझा संबंध आलेला आहे. त्या ठिकाणी अनेकदा मुलांकडे केवळ ‘ऑब्जेक्ट’ म्हणून पाहिलं जातं. घिसाडघाईनं कार्यक्रम केले जातात. इथे मात्र तसं अजिबात झालं नाही. आपण जो कार्यक्रम करणार आहोत तो ‘मुलांचा’ आहे, याची जाणीव ठेवून अत्यंत काळजीपूर्वक ‘झी मराठी’ने या कार्यक्रमाची मूळ बैठक तयार केली. आणि म्हणूनच या वेळ देऊन केलेल्या पायावर या चिमुकल्यांनी सारेगमपचा बांधलेला भव्य प्रासाद मोठय़ा डौलाने उभा राहिला.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेचं आणखी एक कारण म्हणजे- मुलांचं मुलांसारखंच दिसणं, वागणं आणि बोलणं! आमच्या मुलांचे पेहराव उत्सवी असतात, पण ते कधीच फिल्मी नसतात. कधी कधी कपडे झँगो असतात असं मानलं, तरी जेव्हा ही मुलं बोलायला लागतात तेव्हा ती इतकी आपली आणि घरची वाटतात, की थेट टीव्हीचा पडदा बाजूस सारून आपल्या घरात येऊन पोचतात. या मुलांच्या बालसुलभ वागण्या-बोलण्यानं दर्शकांची त्यांच्याशी असलेली जवळीक वाढत जाते. आपण कितीतरी मराठी- हिंदी चित्रपटांतून, मालिकांतून मुलांच्या तोंडी असलेली अतिशय बोजड आणि छापील वाक्यं ऐकतो. इतकं खोटं आणि हास्यास्पद वाटतं ते! पण आपले लिटिल चॅम्प्स् कधीच असे शब्दबंबाळ होताना दिसत नाहीत. कारण त्यांना जे वाटतं, तेच ते बोलतात. सारेगमपचा कार्यकारी निर्माता आणि स्क्रिप्ट रायटर नीलेश मयेकर याला कधी कधी मुलांकडून काही प्रसंगोचित संवाद काढून घ्यायचे असतात त्यावेळी त्यांचं मूलपण जपत तो ज्या संयततेनं मुलांना बोलतं करतो, ते त्याचं कौशल्य दाद देण्याजोगंच आहे.
जूनच्या शेवटच्या आठवडय़ापासून मी ‘झी मराठी’च्या लिटिल चॅम्प्स या कार्यक्रमाशी संलग्न झाले. या कालावधीत अत्यंत गुणवंत अशा ५० लिटिल चॅम्प्सशी माझा सातत्यानं सहवास झाला. कलांगणची संचालिका या नात्यानं गेली ११ वर्षे माझा मुलांशी विशेष धागा जुळलेला आहे आणि गेली २५ वर्षे मी गायिका, संगीतकार आणि गुरू या भूमिकांतून संगीताशी जोडली गेलेली आहे. संगीत तसंच विविध कला-माध्यमांतून मुलांचा व्यक्तिमत्त्व विकास हे माझ्या ध्येयांपैकी एक महत्त्वाचं ध्येय आहे. त्यामुळेच अत्यंत आवडीनं मी लिटिल चॅम्प्सची वर्षांमावशी झाले. आज पाच लिटिल चॅम्प्स आपल्या गळ्यातले ताईत बनले आहेत. त्यांच्यापैकी कुणी एक ‘उद्याचा आवाज’ म्हणून गौरवला जाईल. काही महिन्यांपूर्वी बारा लिटिल चॅम्प्स आपल्या संगीतवैभवासह आपल्यासमोर दिमाखात उभे होते आणि त्याही आधी आमचे गुणी असे इतर ३८ लिटिल चॅम्प्स आपल्या सुरेल आवाजांनी आणि गोड बालविभ्रमांनी आपल्याला वेड लावत होते. ही सगळीच्या सगळी मुलं माझ्यासाठी अगदी जवळची आहेत, खास आहेत. कारण या काळात त्यांच्या सतत सहवासात राहणं, त्यांची मन:स्थिती सांभाळणं, त्यांना उत्तेजन देणं, त्यांचं प्रत्येक गाणं मन:पूर्वक ऐकणं, त्यांच्या कलानं घेत त्यांच्या गाण्यातल्या छोटय़ा छोटय़ा गोष्टी त्यांच्याकडून करवून घेणं, हे माझं काम होतं. त्यांच्या गुणवत्तेबरोबरच त्यांच्या वयानुसार त्यांच्यात असलेला बालसुलभ हट्टीपणा, वात्रटपणा, दंगा, बडबड, कटकट या सर्वाचा तोल सांभाळण्याची मजाही काही और होती. ही सगळीच मुलं त्यांच्या गुणांमुळे, स्वभावामुळे, चौकसपणामुळे, निरागसतेमुळे, कष्टाळूपणामुळे लक्षात राहिली. आशीष कुलकर्णी, मोहित कार्ले, कल्याणी भांडे आणि रागेश्री वैरागकर यांसारख्या मुलांच्या आठवणी हृदयात घर करून राहिल्या. ही मुलं स्पर्धेतून बाहेर गेली खरी, पण त्यांच्या स्वभावातल्या नाजूक पदरांनी त्यांनी माझ्या मनात स्वत:ची अशी खास जागा पटकावली आहे. कधीतरी पटकन् आठवण येते शरयू, रेवती, श्रेया, वैदेही, ऋतुजा यांच्यासारख्या अनेक छोटुकल्यांची! त्यांचं फुलपाखरी बागडणं मग मनभर भिरभिरत राहतं. या सुरेल, तरल आठवणींचा दरवळ आयुष्यभर पुरणार आहे.
मुग्धा, कार्तिकी, रोहित, आर्या आणि प्रथमेश यांनी तर साऱ्या दुनियेलाच भुरळ घातली आहे. या मुलांचं कर्तृत्व जितकं वाखाणण्यासारखं आहे, तितकीच त्यांची जडणघडणही! गेल्या सहा महिन्यांतील त्यांच्या प्रवासाबद्दल आवर्जून लिहावंसं वाटतं. सारेगमप सुरू झालं आणि त्यांना शाळा, दप्तर, अभ्यास, गृहपाठ, टय़ूशन्स या गोष्टींना बुट्टी मिळाली. आनंदीआनंद. सुरुवातीला त्यांना आनंद वाटला खरा, पण हळूहळू स्पर्धेचं गांभीर्य लक्षात यायला लागलं आणि स्पर्धेतल्या ‘परफेक्शन’ नावाच्या प्रकरणाची जबाबदारी वाटायला लागली. स्पर्धेत गाण्याचं,जिंकण्याचं सोनेरी स्वप्न घेऊन आलेल्या या मुलांना प्रत्येक गाण्यावर जे ताशीवकाम करावं लागलं, जी मेहनत घ्यावी लागली, त्यामुळे या स्पर्धेचा खरा रंग त्यांच्या लक्षात यायला लागला. गाणं शिकवताना प्रत्येक गुरू आपल्या शिष्याला गाण्याचं मर्म सांगायला प्रयत्न करतो. रियाज आणि अनुभवातून समृद्ध झालेल्या गुरूचं बोलणं, शिकवणं शिष्याला कळतं, पण बऱ्याचदा वळत मात्र नाही. इथं मात्र हळूहळू त्या- त्या गाण्याचा बाज, त्याची खासियत, त्यासाठी लागणारा आवाजाचा पोत या गोष्टी मुलांना कळू लागल्या आणि त्या वळण्यासाठी प्रात्यक्षिकाची वारंवार संधी त्यांना मिळू लागली. आपल्याला या स्पर्धेत पुढं जायचं असेल तर जसं सांगितलं जातंय तसंच आणि तितकंच गाणं बसवणं, त्यातली जागा न् जागा घासूनपुसून लख्ख बसवणं किती गरजेचं आहे, याची जाणीव मुलांना झाली आणि गाण्यातल्या ज्या मेखेच्या गोष्टी कळायला वर्षांनुर्वष लागतात, त्या या मुलांना अगदी कमी वेळात उलगडू लागल्या. मग जाणीवपूर्वक या गोष्टींची अंमलबजावणी त्यांच्या गाण्यातून होऊ लागली.
जेव्हा तरुण मुलं वा मोठी माणसं अशा प्रकारच्या कार्यक्रमांत सहभागी होतात, तेव्हा प्रशिक्षकावर त्यांचा १०० टक्के विश्वास असतोच असं नाही. आपले गुरू, मित्र-मैत्रिणी, आयुष्यातले अनुभव आणि त्यातून बनलेला स्वत:चा विचार असे नानाविध फाटे त्यांच्या डोक्यात फुटतात. पण या मुलांनी मात्र आम्हा सर्वावर संपूर्ण विश्वास टाकला. त्यांना स्वत:चं सांगीतिक मत नव्हतं. स्वत:ची वैचारिक भूमिका नव्हती. कारण अजून ती तयारच झालेली नव्हती. शिक्षक सांगतील त्या वाटेनं त्यांच्यावर पूर्ण भरवसा ठेवून चालत राहण्याचं वय आहे त्यांचं. आणि अनुकरण करत पुढे जाण्याच्या या वयात एका निश्चित विचारप्रवाहात ही मुलं पुढे जात राहिली. मनात हे करू की ते करू, या जळमटाचा जन्म न झाल्यामुळे आपण जे गातो आहोत ते परिपूर्णतेकडे जाणारं आहे, याबद्दल त्यांना जबरदस्त आत्मविश्वास होता. त्यांच्या गाण्याचं सादरीकरण उत्कृष्ट होण्यात हा घटक फार महत्त्वाचा ठरला असं मला वाटतं.
लहान मुलांच्या आयुष्यात एकाग्रतेला स्थान नसतं. पण आमच्या लिटिल चॅम्प्सना मात्र ही एकाग्रता साध्य करावीच लागली. ग्लॅमरस सेट, भरपूर लाइटस्, समोर प्रचंड संख्येने बसलेले श्रोते, दडपण वाटावे असे बुजुर्ग मान्यवर परीक्षक, वाढत्या लोकप्रियतेमुळे येणारी एक्साइटमेंट, कितीही उत्तम प्रॅक्टिस झालेली असली तरी प्रत्यक्ष सेटवर गाणं कसं होणार आहे, याचा स्वाभाविक येणारा ताण.. या सर्वाच्या पलीकडे जाऊन कमालीच्या एकाग्रतेने त्या गाण्याची पकड घेणं, हे काही साधं काम नाही. पण आमच्या मुलांनी हे दिव्य एकदा-दोनदा नाही, तर पन्नास वेळा केलं. अंतिम फेरीतल्या पाच लिटिल चॅम्प्सनी एकही रिटेक होऊ न देता प्रत्येकी सुमारे पंचावन्न गाणी गायली आहेत. ‘अॅक्शन’ हा शब्द कानावर पडताच ज्या एकाग्रतेनं आणि मनोधैर्यानं ही मुलं गाण्यात उतरतात, ते पाहून थक्क व्हायला होतं. त्या गाण्याशी त्या दोन मिनिटांपुरतं जणू त्यांचं अद्वैत जुळतं, भावसमाधी लागते. आणि ते गाणं ऐकणाऱ्या लक्षावधींना एका निरामय गानसमाधीचा अनुभव येतो.
गेले काही आठवडे सातत्याने आपल्यासमोर येणाऱ्या आमच्या पाच लिटिल चॅम्प्सचं वैशिष्टय़ म्हणजे त्यांचे वेगवेगळ्या पोताचे आवाज, गाण्यातले त्यांचे स्वत:चे रंग आणि स्टाईल, रोहितची आश्चर्यकारक एनर्जी, लीलया चढणारा सूर, त्याचा लाजवाब परफॉर्मन्स, तर प्रथमेशचा रुंद, भारदस्त, समुद्राच्या गाजेसारखा भरीव, परिपक्व आवाज, शास्त्रीय संगीत, नाटय़गीत, अभंग यांसारख्या गीतप्रकारांना सहजी गळ्यावर चढवण्याची हुकूमत अवर्णनीयच! आर्याचा सोन्याच्या तारेसारखा चमकदार, टोकदार, पण मधुर आवाज, एखाद्या गाण्यावर, त्यातल्या सुंदर जागांवर कितीही मेहनत घेण्याची तयारी. कार्तिकीचा आवाज आणि तिचं सादरीकरण हे परमेश्वराने तिला बहाल केलेलं आगळंवेगळं वरदानच आहे. तिचा सूर आणि त्याच वेळी तिच्या डोळ्यांतली चमक बघत राहावी अशी! शब्दोच्चारांपासून ते भावदर्शनापर्यंत तिने घेतलेले अथक परिश्रम तिच्या या वयात कुणी घेतलेले मी तरी पाहिलेले नाहीत. आणि मुग्धा..! कुणी तिला मोगू म्हणतं, कुणी मुग्धड, कुणी मुग्झी बेबी, तर कुणी माऊ! या वयात गाण्याचा किती ध्यास असावा, त्याला काही सुमारच नाही. समज तरी केवढी! एखादी जागा गळ्यावर चढत नसेल तर ती चढेपर्यंत उसंत नाही. मी जिथे जिथे जाईन तिथे तिथे माझ्या मागे येणार आणि ‘वर्षांमावशी ऐक,’ असं म्हणत मला पुन: पुन्हा गाऊन दाखवणार. सारखं माझं लक्ष वेधून घेत पुन: पुन्हा गाऊन दाखवण्याचा तिचा उद्योग दिवसभर- अगदी त्या गाण्याचं पुरतं पीठ होईपर्यंत चालू असतो. काहीसा रुंद, कमालीचा सुरेल, स्वच्छ आवाज आणि लखलखीत शब्दोच्चार हे मुग्धाचं वैशिष्टय़. आवाज खालपासून वपर्यंत अगदी एकसारखा! शास्त्रीय संगीताची कमालीची आवड! तिचं गाणं ऐकताना या भविष्यातल्या केसरबाई तर नसतील ना, असं धाडसी विधान करावंसं वाटतं.
या स्पर्धेतील दिवाळीचा स्पेशल एपिसोड, दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शहिदांना श्रद्धांजली वाहणारा एपिसोड आणि प्रजासत्ताकदिनी सादर झालेले स्वातंत्र्यवीर सावरकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतींना मानवंदना देणारे आणि पं. हृदयनाथ मंगेशकरांनी संकल्पित केलेले, धीरोदात्त वीरमातांच्या स्वाभिमानी स्मृती दर्शकांसमोर आणणारे एपिसोड्स या संपूर्ण कार्यक्रमावर कळस चढविणारे ठरले. रंजन आणि उद्बोधनाचा हा सुरेल समतोल साधल्याबद्दल लाखो दर्शकांनी झी मराठीला मन:पूर्वक धन्यवाद दिले असणार, यात शंका नाही.
आता स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहचलीय. सेटवरचे शेवटचे भागही संपले आहेत. आता मुलं दुरावणार, या जाणिवेने वेळी-अवेळी डोळ्यांच्या कडा ओलावू लागल्या आहेत. झी मराठीच्या टीममधील प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात या मुलांनी घर केलंय. अतिशय निष्पाप, निरागस आणि निगर्वी अशा या मुलांना आता आपण रोज भेटू शकणार नाही, या जाणिवेनं सगळ्यांची मनं उदास झालेली आहेत. मुलांची स्थितीसुद्धा अगदी अशीच आहे. डोळे भरून येताहेत, गळ्यात हुंदका दाटतोय आणि त्याच वेळी ‘ग्रँड इव्हेन्टला आपण भेटणारच की!,’ असा परस्परांना दिलासाही दिला जातोय. एकमेकांचे हात हाती घट्ट धरून गगनभरारी मारू पाहणाऱ्या या भावी गायकांकडे कौतुकानं, अभिमानानं पाहणाऱ्या प्रत्येकाच्या हृदयाची तार शुभेच्छा आणि आशीर्वादांची सरगम गाते आहे..
वर्षां भावे
kalavarsha@yahoo.com