Leading International Marathi News Daily
रविवार , ८ फेब्रुवारी २००९
राज्य

प्रादेशिक

विविध

क्रीडा

राशिभविष्य

प्रतिक्रिया

मागील अंक

वृत्तांत


निवडणुकांचे पडघम वाजायला सुरूवात झाली आहे..
उमेदवारांच्या नावांचे झेंडे देखील फडकायला लागले आहेत..
कालचे 'घरभेदे' उद्याचे 'आधारस्तंभ' भासायला लागले आहेत..
जातीपातींची नवी समीकरणे आकाराला येऊ लागली आहेत..
एकीकडे विद्यमान आघाडय़ा बिघडायला लागल्या आहेत,
तर दुसरीकडे नव्या आघाडय़ा जन्म घेताना दिसू लागल्या आहेत..
आघाडी कितवी म्हणावी..
तिसरी, चौथी, पाचवी... की दहावी..
असा प्रश्न पडावा, असं सभोवतालचं वातावरण आहे..
वाट पाहिली जात्येय ती फक्त निवडणूक आयोगाकडून घोषणा होण्याची..
बदलत्या लोकसभा मतदारसंघ क्षेत्रांचा वेध आम्ही वर्षभर घेतोच आहोत..
पण आता आम्हाला हवा आहे, तुमचा अंदाज..
तो सुद्धा तीन सोप्या प्रश्नांच्या उत्तरांमधून..
तुम्ही इतकंच करायचं..
सोबतच्या तीन प्रश्नांची उत्तरं लिहिलेलं कुपन आमच्याकडे लगेच भरून पाठवायचं..
अचूक उत्तरांना बक्षिसं आहेतच..
(कुपन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा)

१७ वर्षांच्या वैराची ‘मातोश्री’वर ‘इतिश्री’
बाळासाहेब-भुजबळ यांचे प्रीतिभोजन

मुंबई, ७ फेब्रुवारी / खास प्रतिनिधी

सुमारे १७ वर्षांंची कटुता विसरून आपले जुने दैवत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भेटीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे सपत्नीक आज रात्री ‘मातोश्री’वर दाखल झाले. १९९१च्या नोव्हेंबरनंतर इतक्या वर्षांने बाळासाहेबांची भेट झाल्याने भुजबळ भारावून गेले होते. प्रीतिभोजनापूर्वी बाळासाहेब, उद्धव ठाकरे व भुजबळ या तिघांमध्ये २० ते २५ मिनिटे चर्चा झाली. या राजकीय चर्चेबाबत मात्र वेगवेगळे तर्कवितर्क व्यक्त केले जाऊ लागले.

भाजपचा पुन्हा रामनामाचा जप
नागपूर, ७ फेब्रुवारी/ प्रतिनिधी
‘कोई भी माई का लाल हमारी भगवान रामपर निष्ठा और श्रद्धा के उपर दाग नही लगा सकता’ या शब्दात आज भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा रामजन्मभूमीचा मुद्दा ऐरणीवर आणला. पक्ष पूर्ण बहुमताने केंद्रात सत्तेत आल्यास गरज पडली तर कायदा करून अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. कुठल्याही परिस्थितीत लालकृष्ण अडवाणी यांना पंतप्रधानपदी बसवण्याचा संकल्प कार्यकर्त्यांनी करावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. विद्यापीठाच्या सुभेदार सभागृहा समोरील मंडपात आयोजित करण्यात आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन राजनाथ सिंह यांच्याहस्ते झाले.त्यावेळी ते बोलत होते.

मुंबई, ७ फेब्रुवारी/ प्रतिनिधी
उद्याचा रविवार खास चॅम्पियन्सचाच आहे. सकाळी सुरुवात होणार आहे ती, भारत- श्रीलंका एकदिवसीय क्रिकेट सामन्याने. तिकडे टीम इंडियामध्ये चॅम्पियन्सचे विजयाचे वारू शिरले आहे. तर इकडे सारेगमचे लिट्ल चॅम्प्सही महाअंतिम फेरीच्या मुहूर्तावर ऐन बहरात आले आहेत. भारत- श्रीलंका मॅचचे काय होणार हा प्रश्न मनात नाहीच मुळी, पण पाहण्यातली मजा सर्वांना लुटायची आहे. आणि मॅच संपते न संपते तोच झी टीव्हीवर सारेगमची महाअंतिम फेरी सुरू होणार आहे. त्यामुळे जवळपास पूर्ण रविवार हा चॅम्पियन्समयच असणार आहे. आणि मग सारेजण टीव्हीसमोर असल्याने कार्यक्रमाला कोण येणार या भीतीने अनेक संस्थांनी आपले उद्याचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केले आहेत.

कला, विज्ञान, वाणिज्य शाखांच्या भिंती दूर होणार!
‘लोकसत्ता’च्या व्याख्यानमालेचे उद्घाटन
पुणे, ७ फेब्रुवारी/खास प्रतिनिधी
कला, विज्ञान, वाणिज्य शाखांमधील भिंती दूर होऊन उच्चशिक्षण आता खऱ्या अर्थाने खुले होणार आहे. पुणे विद्यापीठात हे क्रांतिकारी पाऊल उचलण्यात येणार असून, त्यासाठी पाच वर्षांचा विशेष पदव्युत्तर अभ्यासक्रमही तयार करण्यात येत आहे. कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव यांनी आज येथे ही माहिती दिली. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने ‘लोकसत्ता’च्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘उच्चशिक्षण : दशा आणि दिशा’ या विषयावरील व्याख्यानमालेचे उद्घाटन डॉ. जाधव यांच्या भाषणाने झाले. विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अरुण निगवेकर या वेळी अध्यक्षस्थानी होते. ‘लोकसत्ता’चे संपादक कुमार केतकर, निवासी संपादक मुकुंद संगोराम, सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, सचिव जगदीश चिंचोरे, मॉडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र झुंझारराव, महाविद्यालयाचे व्हिजिटर अ. गो. गोसावी, कनिष्ठ महाविद्यालयाच्या स्थानिक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा ज्योत्स्ना एकबोटे आदी या वेळी उपस्थित होते.

काँग्रेस व राष्ट्रवादीमधील जागावाटपाचा तिढा आता दिल्लीदरबारी
मुंबई, ७ फेब्रुवारी / खास प्रतिनिधी

लोकसभेच्या कोणी किती जागा लढवायच्या यावरून काँग्रेस व राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष अडून बसल्याने जागावाटपाचा पेच आता मुंबईऐवजी दिल्लीदरबारी सोडविला जाणार आहे. केंद्रीय पातळीवर संख्याबळावरून तोडगा निघाल्यावर मगच प्रत्यक्ष कोणी कोणत्या जागा लढवायच्या याची चर्चा पुढे सरकू शकेल. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांची जागावाटपाची पहिली फेरी गेल्या सोमवारी पार मुंबईत पार पडली. तेव्हा काँग्रेसने २००४ मधील सूत्रानुसार म्हणजेच २७-२१ जागांचा प्रस्ताव मांडला. राष्ट्रवादीने निम्म्या जागांची मागणी लावून धरली आहे. जागावाटपाची चर्चा सुरू होण्यापूर्वी नवी दिल्लीत झालेल्या काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत २००४च्या सूत्रानुसार जागावाटपाची चर्चा करावी, अशी सूचना करण्यात आली. काँग्रेस नेते राष्ट्रवादीच्या दबावापुढे झुकतात, असा नेहमी सूर लावला जातो. यामुळे काँग्रेस नेतृत्वाने यंदा सुरुवातीपासूनच काहीशी आक्रमक भूमिका घेतली आहे.

एमएमआरडीए क्षेत्रात रिक्षाभाडय़ात
दोन रुपयांची कपातठाणे, ७ फेब्रुवारी/प्रतिनिधी

मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील रिक्षा भाडय़ात दोन रुपयांनी कपात करण्याचा निर्णय आज एमएमआरडीएच्या बैठकीत घेण्यात आला असून, आज मध्यरात्रीपासून ही भाडेकपात लागू होणार आहे. सर्वसाधारणपणे पेट्रोलच्या किंमतीत वाढ होताच त्वरित रिक्षांची भाडेवाढ केली जाते, मात्र गेल्या दोन महिन्यात दोन वेळा पेट्रोलचे दर कमी झाल्यानंतरही रिक्षा भाडय़ात कपात करण्याबाबत सरकार पातळीवर उदासीनता होती. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी पसरली होती. लोकांमधील असंतोषाचा भडका उडण्याची लक्षणे दिसू लागताच प्रादेशिक परिवहन विभागाने भाडेकपातीबाबतचा प्रस्ताव तयार केला होता. आता मंत्रालयात परिवहन सचिव संगीतराव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मुंबई महानगर प्रादेशिक परिवहन प्राधिकरण (एमएमआरडीए)च्या बैठकीत भाडेकपातीवर चर्चा झाली. सध्या रिक्षाचे भाडे पहिल्या एक मैल म्हणजेच १.६ किलोमीटर अंतरासाठी १३ रुपये होते ते आता ११ रुपये करण्यात आले आहे. त्यानंतरच्या प्रति किलोमीटरसाठी आठ रुपयांऐवजी सात रुपये भाडे आकारले जाईल.
मुंबई-ठाण्यातील सीएनजी रिक्षाच्या भाडय़ात मात्र कोणताच बदल झालेला नसून नव्या भाडेकपातीचा लाभ कल्याण, डोंबिवली, मिरा, भाईंदर, वसई, नवी मुंबई व जिल्ह्यातील अन्य ठिकाणच्या नागरिकांना होईल. तर कोकण प्रादेशिक परिवहन (आरटीए)च्या आगामी बैठकीत या भागातील रिक्षा भाडय़ात कपात करण्याचा निर्णय होईल, अशी माहिती आरटीओ सुत्रांनी दिली.

बाबरी मशीद सरकारने पाडली - सुदर्शन
शाजापूर, ७ फेब्रुवारी/पी.टी.आय.

बाबरी मशीद कारसेवकांनी पाडली नाही तर सरकारने पाडली, असा दावा रा. स्व. संघाचे सरसंघचालक कु. सी. सुदर्शन यांनी आज येथे केला. मात्र सरकार म्हणजे नेमके कोणते, राज्य सरकार की केंद्र सरकार याचा खुलासा त्यांनी केला नाही. बाबरी मशीद पडली त्या वेळी उत्तर प्रदेशात कल्याणसिंग यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार होते तर केंद्रात नरसिंहराव यांचे काँग्रेस सरकार होते. मात्र कोणत्या सरकारने मशीद पाडली हे न सांगता सुदर्शन म्हणाले की, बाबरी मशीद पाडण्यात बजरंग दल, विश्व हिंदू परिषद यांचा हात होता, असा अपप्रचार जाणीवपूर्वक करण्यात आला. हा एक कटच होता. मध्य भारत प्रांताच्या तीन दिवसांच्या शिबिरासाठी सुदर्शन येथे आले होते.

 

लोकसत्ता दिवाळी अंक २००८


प्रत्येक शुक्रवारी


दिवाळी २००८