Leading International Marathi News Daily

रविवार , ८ फेब्रुवारी २००९

१७ वर्षांच्या वैराची ‘मातोश्री’वर ‘इतिश्री’
बाळासाहेब-भुजबळ यांचे प्रीतिभोजन
मुंबई, ७ फेब्रुवारी / खास प्रतिनिधी

सुमारे १७ वर्षांची कटुता विसरून आपले जुने दैवत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भेटीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे सपत्नीक आज रात्री ‘मातोश्री’वर दाखल झाले. १९९१च्या

 

नोव्हेंबरनंतर इतक्या वर्षांने बाळासाहेबांची भेट झाल्याने भुजबळ भारावून गेले होते. प्रीतिभोजनापूर्वी बाळासाहेब, उद्धव ठाकरे व भुजबळ या तिघांमध्ये २० ते २५ मिनिटे चर्चा झाली. या राजकीय चर्चेबाबत मात्र वेगवेगळे तर्कवितर्क व्यक्त केले जाऊ लागले. मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावर पक्षात कोंडी होत असल्याने राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला सूचक इशारा देण्याकरिताच भुजबळ मातोश्रीवर गेल्याचे बोलले जात आहे. मात्र आपल्याला विचारूनच भुजबळ हे मातोश्रीवर गेल्याचे सांगून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या भेटीमागे भुजबळांची नाराजी नाही हे दाखविण्याचा प्रयत्न केला.
भुजबळांच्या मातोश्रीवरील प्रीतीभोजनामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली नाही तरच नवल. नाराज भुजबळांनी पवारांना इशारा देण्याकरिता मातोश्री गाठल्याची अधिक चर्चा होती. तर काँग्रेसच्या नेतृत्वाने पवारांना शह देण्याचा पद्धतशीरपणे प्रयत्न सुरू केला आहे. जागावाटपातही काँग्रेसने पवारांची अडवणूक केली आहे. या पाश्र्वभूमीवर काँग्रेसला सूचक इशारा देण्यासाठीच पवारांनी भुजबळांना मातोश्रीवर धाडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. शिवसेनेने पवारांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीस पाठिंबा दर्शविला आहे. आजच्या भेटीतून एक गोष्ट भुजबळांनी स्पष्ट केली. ती म्हणजे पुढेमागे राष्ट्रवादीने अव्हेरले तरीही आपल्याजवळ अन्य पर्याय उपलब्ध असल्याचे राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला या भेटीतून दाखवून देण्याचा त्यांचा हा प्रयत्न असावा.
पत्नी मीना, पुत्र पकंज, पुतणे समीर, सुना व नातवंडांसह भुजबळ हे मातोश्रीवर गेले होते. गेल्या १७ वर्षांंमध्ये शिवसेनाप्रमुख व भुजबळ यांच्याच अजिबात संवाद नव्हता. अपवाद फक्त राज ठाकरे यांचे वडिल श्रीकांत ठाकरे यांच्या मृत्यूनंतर भुजबळांनी शोक व्यक्त करण्यासाठी बाळासाहेबांना केलेल्या दूरध्वनीचा. मातोश्रीवर जाताच भुजबळांनी शिवसेनाप्रमुखांना शाल घालून त्यांचे अभिष्टचिंतन केले. नंतर जुन्या आठवणींना उजाळा देत दोघांमध्ये गप्पा रंगल्या. किती वर्षांंनी भेटलास हे बाळासाहेबांनी भुजबळांना विचारले. उद्धव व रश्मी ठाकरे यांनी भुजबळ कुटुंबियांचे स्वागत केले. नंतर शाकाहारी व मांसाहारी अशा दोन्ही प्रकारच्या भोजनाचा भुजबळांनी आस्वाद घेतला. सुमारे सव्वा दोन तास भुजबळ कुटुंबिय मातोश्रीवर होते.