Leading International Marathi News Daily

रविवार , ८ फेब्रुवारी २००९

भाजपचा पुन्हा रामनामाचा जप
नागपूर, ७ फेब्रुवारी/ प्रतिनिधी
‘कोई भी माई का लाल हमारी भगवान रामपर निष्ठा और श्रद्धा के उपर दाग नही लगा सकता’ या

 

शब्दात आज भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा रामजन्मभूमीचा मुद्दा ऐरणीवर आणला. पक्ष पूर्ण बहुमताने केंद्रात सत्तेत आल्यास गरज पडली तर कायदा करून अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. कुठल्याही परिस्थितीत लालकृष्ण अडवाणी यांना पंतप्रधानपदी बसवण्याचा संकल्प कार्यकर्त्यांनी करावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
विद्यापीठाच्या सुभेदार सभागृहासमोरील मंडपात आयोजित करण्यात आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन राजनाथ सिंह यांच्याहस्ते झाले.त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी, राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते जसवंतसिंह, ज्येष्ठ नेते मुरलीमनोहर जोशी, सुषमा स्वराज, अरुण जेटली, व्यंकय्या नायडू, भाजपची सत्ता असलेल्या पाच राज्याचे मुख्यमंत्री, राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे, प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी, विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते पांडुरंग फुंडकर यांच्यासह पक्षाचे अनेक नेते उपस्थित होते.
भारतीय जनता पक्षाने केंद्रात सत्तेत आल्यावर हा मुद्दा गुंडाळून ठेवला होता. त्यामुळे पक्षातूनच नव्हे तर बाहेरूनही त्यांच्यावर टीका होत होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयी होत असलेल्या पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने भाजपने हा मुद्दा येत्या लोकसभानिवडणुकीचा प्रचाराचा प्रमुख मुद्दा राहील याचे स्पष्ट संकेत दिेले
अयोध्येचा राम आणि तेथील मंदिर हे भारतीय जनता पक्षाचे आस्था आणि निष्ठेचे विषय आहेत. यावर कुणीही शंका घेण्याचे कारण नाही, अयोध्येत आम्ही राम मंदिर बांधूच, पण प्रतिक्षा आहे ती संधीची. केंद्रात बहुमताने पक्ष सत्तेत आला तर यासाठी सर्वपक्षांचे सहकार्य मागण्यात येईल आणि ते मिळाले नाही तर तर प्रसंगी कायदा करून राममंदिर बांधू,अशी घोषणा राजनाथ सिंग यांनी केली. यावेळी परिषदेत उपस्थित असलेल्या विविध राज्यातील हजारो प्रतिनिधींनी ‘जय श्रीराम’ च्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.
राम मंदिराच्या मुद्दावर राजनाथ सिंह यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवरही टीका केली. राम मंदिराच्या प्रश्नावरून भाजपला टिकेचे लक्ष्य करणाऱ्या केंद्र सरकारने पाच वर्षांत हा प्रश्न सोडवण्यासाठी पाच मिनिटाचाही वेळ खर्ची घातला नाही. उलट त्यांनी राम अस्तित्वात नव्हता असे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले. रामसेतू तोडण्याचे प्रयत्न केले. आम्ही ते यशस्वी होऊ देणार नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.