Leading International Marathi News Daily

रविवार , ८ फेब्रुवारी २००९

मुंबई, ७ फेब्रुवारी/ प्रतिनिधी
उद्याचा रविवार खास चॅम्पियन्सचाच आहे. सकाळी सुरुवात होणार आहे ती, भारत- श्रीलंका एकदिवसीय क्रिकेट सामन्याने. तिकडे टीम इंडियामध्ये चॅम्पियन्सचे विजयाचे वारू शिरले आहे. तर इकडे सारेगमचे लिट्ल चॅम्प्सही महाअंतिम फेरीच्या मुहूर्तावर ऐन बहरात आले आहेत. भारत- श्रीलंका मॅचचे काय होणार हा प्रश्न मनात नाहीच मुळी, पण पाहण्यातली मजा सर्वांना लुटायची आहे. आणि मॅच संपते न संपते तोच झी टीव्हीवर सारेगमची महाअंतिम फेरी सुरू होणार आहे. त्यामुळे जवळपास पूर्ण रविवार हा चॅम्पियन्समयच असणार आहे. आणि मग सारेजण टीव्हीसमोर असल्याने कार्यक्रमाला कोण येणार या भीतीने अनेक संस्थांनी आपले उद्याचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केले आहेत.
लिट्ल चॅम्प्स विषयीचे आकर्षण हे काही आता केवळ मराठी किंवा महाराष्ट्रातील घरांपुरते मर्यादित

 

नाही राहिलेले. या लिट्ल चॅम्प्सची चर्चा आता इतर भाषकांमध्येही जोरदार सुरू आहे. गेल्या काही भागांमध्ये तर त्यांना इतर भाषकांचाही प्रेक्षकवर्ग लाभला आहे. त्यामुळे उद्याच्या महाअंतिम फेरीविषयी घराघरात प्रचंड आकर्षण आहे. गेले सहा महिने आयडिया सारेगमपमधील छोटय़ांनी संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या आवाजाने अक्षरश: मंत्रमुग्ध केले आहे. फक्त एक कार्यक्रम एवढेच या स्पर्धेचे स्वरुप न राहता आता हा कार्यक्रम अनेकांच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग झाल्यासारखीच अवस्था आहे. महाअंतिम फेरीपर्यंत पोहोचल्यानंतर लिट्ल चॅम्प्सचे पर्व संपणार याची हुरहूर आणि त्यांच्यातील चांगल्या प्रतीची गायकी अनुभवायला मिळाल्याचा आनंद अशा दुहेरी भावना अनेकांच्या मनात आहेत. त्यांचे वय, त्यांनी घेतलेली मेहनत आणि गायकी हे सारे लक्षात घेता त्यांच्यातील स्पर्धा थांबवावी आणि पाचही जणांना ‘लिटल चॅम्प्स’ घोषित करावे, अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून कळकळीने व्यक्त होऊ लागल्या.. उद्या संध्याकाळी काय होणार, ‘लिटल चॅम्प्स’चा मुकुट कोण पटकावणार, खरेतर सगळ्यांनीच हा मुकुट परिधान करावा यासाठी समस्त प्रेक्षक देव पाण्यात बुडवून बसले आहेत. उद्याचा सगळा दिवस याच घालमेलीत जाणार आहे. लोकल ट्रेन, बसस्टॉप, हॉटेल्स आदी सर्व ठिकाणी सध्या केवळ हाच एक चर्चेचा विषय ठरला आहे.
..पण सारखा या छोटय़ा दोस्तांचाच विचार नको, म्हणून भारतीय संघ आपल्या या ‘फॅन्स’च्या मदतीला तत्पर आहे. भारत-श्रीलंकेदरम्यानच्या एकदिवसीय सामन्यात सलग नववा विजय मिळविल्यानंतर महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने अर्थातच भारतातील क्रिकेटप्रेमींच्या अपेक्षा वाढवून ठेवल्या आहेत. त्यामुळे लिट्ल चॅम्प्सचे आगमन स्क्रीनवर होईपर्यंत क्रिकेटप्रेमी नक्कीच टीव्हीला खिळून बसणार..

पुढचे पर्व नामवंत गायक-गायिकांचे
झी टीव्हीवरील आयडीया सारेगमप या कार्यक्रमाद्वारे नव्या जुन्या काळातील दर्जेदार गाणी ऐकायला मिळत असल्यामुळे रसिकप्रेक्षकांसाठी हा कार्यक्रम एक पर्वणीच आहे. लिट्ल चॅम्प्स भेटणार नाहीत याची हुरहुर प्रेक्षकांना असली तरी यापुढचे सारेगमपचे पर्व काय असणार याविषयीदेखील तेवढीच उत्सुकताही प्रेक्षकांना आहे. दरवेळी काहीतरी नवीन कल्पना लढवित असलेल्या सारेगमपचे पुढचे पर्व हे आजचे आघाडीचे तरुण गायक व गायिका यांच्यातील असणार आहे. या पर्वाची तपशीलवार घोषणा लवकरच झी टीव्हीतर्फे करण्यात येईल, अशी माहिती ‘झी मराठी’चे बिझनेस हेड निखील साने यांनी दिली. दरम्यान, पुढचे दोन-तीन आठवडे या पाच लिटल चॅम्प्सच्या जडणघडणीचा आलेख दाखविणारे काही क्षण प्रेक्षकांना बघता येतील व मार्चपासून नामवंत गायक-गायिकांचे पर्व सुरु होईल..