Leading International Marathi News Daily

रविवार , ८ फेब्रुवारी २००९

कला, विज्ञान, वाणिज्य शाखांच्या भिंती दूर होणार!
‘लोकसत्ता’च्या व्याख्यानमालेचे उद्घाटन
पुणे, ७ फेब्रुवारी/खास प्रतिनिधी

कला, विज्ञान, वाणिज्य शाखांमधील भिंती दूर होऊन उच्चशिक्षण आता खऱ्या अर्थाने खुले होणार

 

आहे. पुणे विद्यापीठात हे क्रांतिकारी पाऊल उचलण्यात येणार असून, त्यासाठी पाच वर्षांचा विशेष पदव्युत्तर अभ्यासक्रमही तयार करण्यात येत आहे.
कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव यांनी आज येथे ही माहिती दिली. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने ‘लोकसत्ता’च्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘उच्चशिक्षण : दशा आणि दिशा’ या विषयावरील व्याख्यानमालेचे उद्घाटन डॉ. जाधव यांच्या भाषणाने झाले. विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अरुण निगवेकर या वेळी अध्यक्षस्थानी होते. ‘लोकसत्ता’चे संपादक कुमार केतकर, निवासी संपादक मुकुंद संगोराम, सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, सचिव जगदीश चिंचोरे, मॉडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र झुंझारराव, महाविद्यालयाचे व्हिजिटर अ. गो. गोसावी, कनिष्ठ महाविद्यालयाच्या स्थानिक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा ज्योत्स्ना एकबोटे आदी या वेळी उपस्थित होते.
‘अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये विद्याशाखांचा अडसर नसतो. आवडीच्या विषयाचे शिक्षण घेण्याची संधी मिळतानाच विविधांगी करीअरचे पर्यायही त्यामुळे खुले राहतात. सध्याच्या मंदीच्या काळामध्ये अशा लवचिक धोरणाचा फायदा होऊ शकतो. भारतामधील शिक्षण मात्र आपण विद्याशाखांमध्ये जखडून टाकले आहे. मंदीमुळे वाणिज्य क्षेत्रातील संधी कमी होण्याचा धोका असल्याने या शाखेच्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यापुढे प्रश्नचिन्ह उभे राहते. अशा वेळी खुला दृष्टिकोन उपयुक्त ठरेल,’ असे मत केतकर यांनी व्यक्त केले. तोच धागा पकडून कुलगुरू डॉ. जाधव यांनी विद्यापीठात आकाराला येत असलेल्या क्रांतिकारी योजनेबद्दल माहिती दिली. ते म्हणाले की, ‘उच्चशिक्षणाला विद्याशाखांमध्ये जखडून ठेवणे पूर्णपणे कालबाह्य़ आहे. त्यामधून मार्ग काढण्यासाठी लवकरच पाच वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम (मास्टर्स) सुरू करण्याबाबत नियोजन होत आहे. त्यात पहिल्या दोन वर्षांमध्ये कोणत्याही विद्याशाखेतील कोणताही विषय शिकण्याची मुभा राहील. तिसऱ्या वर्षांपासून स्पेशलायझेशनचा विषय निवडून त्यामधील सखोल शिक्षण दिले जाईल. समाजाच्या बदलत्या गरजांनुरूप शिक्षणसुविधा उपलब्ध करून देण्यास पुणे विद्यापीठ वचनबद्ध आहे,’ असेही कुलगुरूंनी स्पष्ट केले. अध्यक्षीय समारोपात डॉ. निगवेकर यांनी राज्य-केंद्र सरकारच्या धोरणांमध्ये समन्वय, कालबाह्य़ झालेल्या कायदेशीर चौकटींचा कालानुरूप पर्याय, खासगी संस्थांच्या माध्यमातून अस्तित्वात आलेल्या समांतर शिक्षणव्यवस्थेसाठी कडक चौकट आखणे, अशा मुद्दय़ांचा त्यांनी ऊहापोह केला.
येत्या वर्षभरात पुण्या-मुंबईसह नागपूर, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर, रत्नागिरी, अहमदनगर, अमरावती आदी दहा शहरांमध्ये ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात येणार आहे. खासगीकरण, नफेखोरीच्या विळख्यात अडकलेल्या उच्चशिक्षणाविषयी सध्या मोठय़ा प्रमाणावर अविश्वास व्यक्त करण्यात येत आहे. शिक्षण हे रोजगार-करीअरची संधी मिळवून देणारे आणि कालानुरूप आहे काय, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. याबाबत विचारमंथन करून र्सवकष आराखडा तयार करण्याचे काम राज्य वा केंद्र शासनाकडून होताना दिसत नाही. उच्चशिक्षणाविषयी नेमलेल्या समित्यांचे अहवाल धूळ खात पडून राहतात. या पाश्र्वभूमीवर उच्चशिक्षणाविषयी विचारमंथन घडवून आणण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.