Leading International Marathi News Daily

रविवार , ८ फेब्रुवारी २००९

काँग्रेस व राष्ट्रवादीमधील जागावाटपाचा तिढा आता दिल्लीदरबारी
मुंबई, ७ फेब्रुवारी / खास प्रतिनिधी

लोकसभेच्या कोणी किती जागा लढवायच्या यावरून काँग्रेस व राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष अडून बसल्याने

 

जागावाटपाचा पेच आता मुंबईऐवजी दिल्लीदरबारी सोडविला जाणार आहे. केंद्रीय पातळीवर संख्याबळावरून तोडगा निघाल्यावर मगच प्रत्यक्ष कोणी कोणत्या जागा लढवायच्या याची चर्चा पुढे सरकू शकेल.
काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांची जागावाटपाची पहिली फेरी गेल्या सोमवारी पार मुंबईत पार पडली. तेव्हा काँग्रेसने २००४ मधील सूत्रानुसार म्हणजेच २७-२१ जागांचा प्रस्ताव मांडला. राष्ट्रवादीने निम्म्या जागांची मागणी लावून धरली आहे. जागावाटपाची चर्चा सुरू होण्यापूर्वी नवी दिल्लीत झालेल्या काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत २००४च्या सूत्रानुसार जागावाटपाची चर्चा करावी, अशी सूचना करण्यात आली. काँग्रेस नेते राष्ट्रवादीच्या दबावापुढे झुकतात, असा नेहमी सूर लावला जातो. यामुळे काँग्रेस नेतृत्वाने यंदा सुरुवातीपासूनच काहीशी आक्रमक भूमिका घेतली आहे.
राष्ट्रवादीचा निम्म्या जागांचा प्रस्ताव मान्य नसल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले आहे. तसेच राष्ट्रवादीचा दावा चुकीचा असल्याचे काँग्रेसने निदर्शनास आणून दिले आहे. यासाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष हुसेन दलवाई यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीला चार गोष्टी सुनावल्या. ही पंचायत समितीची निवडणूक नाही हे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी लक्षात ठेवावे हे सांगण्यापर्यंत काँग्रेसची मजल गेली. यावरून काँग्रेस राष्ट्रवादीच्या दबावापुढे झुकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे स्पष्ट होते. काँग्रेस या विषयावर आक्रमक झाली असताना राष्ट्रवादीने मात्र काहीच प्रतिक्रिया करण्याचे अद्याप टाळले आहे.
संख्याबळ निश्चित करावे मगच प्रत्यक्ष जागावाटपाची चर्चा पुढे सरकू शकेल, अशी भूमिका माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी घेतली आहे. काँग्रेस संख्याबळाच्या मुद्दय़ावर ठाम असल्यास राज्यात चर्चा करण्यात अर्थ नाही, असे राष्ट्रवादीच्या नेत्यांचे म्हणणे आहे. जागावाटपावर दिल्लीतच तोडगा निघेल व तेथेच अंतिम निर्णय होईल, अशी भूमिका मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मांडली आहे. राष्ट्रवादीच्या भूमिकेबद्दल मुख्यमंत्र्यांनी नवी दिल्लीतील पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केली आहे.