Leading International Marathi News Daily

रविवार , ८ फेब्रुवारी २००९

प्रादेशिक

वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील आयकर विभागाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन शनिवारी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी आयकर विभागाचे अध्यक्ष एस. एस. एन. मूर्ती, माजी अध्यक्ष एन. बी. सिंग, आयकर आयुक्त पी. सी. छोटेराय, बी. पी. गौर, ए. के. सिन्हा आदी मान्यवर उपस्थित होते.

महिलांच्या समस्यांवर संशोधन व्हायला हवे - राष्ट्रपती
एसएनडीटी विद्यापीठाकडून राष्ट्रपतींना डी.लिट. प्रदान

मुंबई , ७ फेब्रुवारी / प्रतिनिधी

पहिल्या महिला राष्ट्रपती ठरलेल्या प्रतिभाताई पाटील यांना एसएनडीटी विद्यापीठाच्या वतीने आज सन्माननीय डी.लिट. देवून गौरविण्यात आले. विद्यापीठाचे कुलपती व राज्यपाल एस. सी. जमीर यांच्या हस्ते राष्ट्रपतींना डी.लिट. देण्यात आली. एसएनडीटी विद्यापीठाच्या ५८व्या दीक्षांत समारंभाचे आज आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री अशोक चव्हाण , उपमुख्यमंत्री छगन भुजबळ , देवीसिंग शेखावत , उच्च व तंत्र शिक्षणमंत्री राजेश टोपे , उच्च-तंत्र शिक्षण राज्यमंत्री सुरेश शेट्टी , कुलगुरू चंद्रा कृष्णमूर्ती , प्र-कुलगुरू एस. एस. मंथा आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. विविध अभ्यासक्रमांत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना यावेळी राष्ट्रपती व राज्यपाल यांच्या हस्ते पदक व प्रमाणपत्रे देवून गौरविण्यात आले.

२६/११ च्या हल्ल्यानंतरही पोलीस तरसताहेत काडतुसासांठी!
मुंबई, ७ फेब्रुवारी / प्रतिनिधी

२६ नोव्हेंबरच्या हल्ल्यानंतरच पोलिसांकडे असलेल्या शस्त्राला महत्त्व प्राप्त झाले आहे. नियमानुसार प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याला ३० काडतुसांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. हा कोटा पोलीस अधिकाऱ्याला प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर दिला जातो. मात्र सेवेच्या कालावधीत दंगल वा गुंडांबरोबरच्या चकमकीसाठी त्याने खर्च केलेल्या एकेक काडतुसासाठी पोलिसांना शस्रागाराचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. परिणामी गुन्हेगारांविरुद्ध सक्रिय असलेल्या अनेक पोलीस अधिकाऱ्यांकडे हा पूर्ण साठा नसल्याचे आढळून आले आहे. पुन्हा अतिरेकी हल्ला झालाच तर त्यावेळी या काडतुसांचे महत्त्व अधिक असल्याचे या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

भुजबळांची मातोश्रीवारी नाराजीमुळे?
मुंबई, ७ फेब्रुवारी / खास प्रतिनिधी

गृह खाते असताना शिवसेनाप्रमुखांना अटक करण्याची कारवाई करणाऱ्या भुजबळांचा शिवसेना विरोध गेल्या काही वर्षांमध्ये कमी होत गेला होता. गेल्या ऑक्टोबर महिन्यात भुजबळांनी शिवसेनाप्रमुखांच्या विरोधातील खटला मागे घेऊन राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. तेव्हा भुजबळांच्या स्वगृही परतण्याची चर्चा सुरू झाली. बाळासाहेबांच्या विरोधातील खटला मागे घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानण्याकरिता शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे हे जातीने वांद्रे न्यायालयात उपस्थित होते. त्यानंतर थोडय़ाच दिवसांत वाढदिवसाच्या निमित्ताने भुजबळांनी शक्तिप्रदर्शन केले होते.

‘ताज’वरील हल्ल्यावरून मुख्यमंत्र्यांना जावे लागते मग संसदेवरील हल्ल्याचे काय?
राज ठाकरे यांचा सवाल

नवी मुंबई, ७ फेब्रुवारी / प्रतिनिधी

ताज आणि ओबेरॉय ही सार्वजनिक हॉटेल आहेत. त्यामध्ये कोणालाही मुक्त प्रवेश असतो. अशा हॉटेलांवर हल्ला झाला म्हणून देशाचा आणि राज्याचा मराठी गृहमंत्री, मुख्यमंत्र्याला जबाबदार धरून राजीनामा द्यावा लागतो; परंतु संसदेसारख्या अतिमहत्त्वाच्या ठिकाणी झालेल्या हल्ल्याबद्दल दिल्लीत एकालाही जबाबदार धरले जात नाही. मराठी नेत्यांबाबत असा न्याय कसा लावला जातो, असा खडा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज वाशी येथे उपस्थित केला.

पोलिसाची एके-४७ खेचणारे सचिव अरविंदकुमार पुन्हा मंत्रालयात
मुंबई, ७ फेब्रुवारी / खास प्रतिनिधी
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या वेळी निवडणूक निरीक्षक म्हणून काम करताना सुरक्षा रक्षकाची एके-४७ ही बंदूक खेचल्याने निलंबित करण्यात आलेले अरविंद कुमार यांना पुन्हा शासकीय सेवेत दाखल करून घेण्यात आले असून त्यांची नियुक्ती मंत्रालयात वस्त्रोद्योग खात्याच्या सचिवपदी करण्यात आली आहे. याशिवाय सहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

‘अल्ट्रा मेगा’ प्रकल्पातील वीज मुंबईच्या वाटय़ाला नाही
केदार दामले, मुंबई, ७ फेब्रुवारी

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला केंद्राकडून योग्य प्रमाणात वाटा मिळत नाही अशी कायमची ओरड सुरू असतानाच भविष्यात विजेच्या बाबतीतही मुंबईवर अन्यायच होणार असल्याची माहिती हाती आली आहे. देशातील विविध भागांत प्रत्येकी चार हजार मेगाव्ॉट वीजनिर्मितीचे अल्ट्रा मेगा दर्जाचे प्रकल्प उभारण्यात येणार असून त्या प्रकल्पातील नियत वाटा महाराष्ट्राला मिळणार असला तरी त्यामधील एक युनिट इतकी वीजही मुंबईच्या वाटय़ाला येणार नाही. सदर अल्ट्रा मेगा प्रकल्प हे मुंबईच्या विजेच्या पुरवठय़ाशी संबंधित असलेल्या टाटा आणि रिलायन्स या कंपन्यांचे असूनही एक युनिट वीजही मुंबईला मिळणार नाही हे विशेष.

टीएमटी-एनएमएमटी बसचाही मुंबई प्रवेशाचा मार्ग खुला!
मुंबई, ७ फेब्रुवारी / प्रतिनिधी
ठाणे महापालिका परिवहन (टीएमटी) सेवेच्या बसेसमधून प्रवाशांना लवकरच ठाण्यातून कुर्ला गाठता येईल किंवा नवी मुंबई महापालिका परिवहन (एमएमएमटी) सेवेच्या बसेसमधून थेट घाटकोपपर्यंत जाता येईल. मुंबई महानगर क्षेत्रातील बेस्टसह सर्व परिवहन सेवांना एकमेकांचे क्षेत्र ठराविक अंतरापर्यंत खुले करण्याच्या मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या (एमएमआरटीए) निर्णयामुळे हे स्वप्न प्रत्यक्षात उतरणे शक्य होणार आहे.

सीएसटी स्थानकात गोळीबार करणाऱ्यास अटक
मुंबई, ७ फेब्रुवारी / प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानकात मध्यरात्री दीडच्या सुमारास गोळीबार करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून गावठी बनावटीचे रिव्हॉल्व्हर व एक जिवंत काडतूस हस्तगत केले आहे. राजू तोमर असे या तरुणाचे नाव असून तो दादर येथील आंबेडकर नगर झोपडपट्टीत राहतो. मध्यरात्री दीडच्या सुमारास रेल्वे पोलिसांकडून तपासणी सुरू असताना सदर तरुण अचानक पळू लागला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले त्यावेळी त्याने गावठी रिव्हॉल्व्हर काढून हवेत गोळीबार केला. त्यानंतरच लगेचच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. या गोळीबारात कोणीही जखमी झालेले नाही. त्याच्याकडे गावठी रिव्हॉल्व्हर कसे आले याची चौकशी केली असता त्याने आपण ते विकत घेतल्याचे सांगितले. रिव्हॉल्व्हरचा वापर तो कशासाठी करणार होता असे त्याला विचारले असता तो प्रत्येक वेळी वेगवेगळी उत्तरे देत असल्याचे पोलिसांनी सांगितले. वडिलांचा मृत्यू झाल्याने आपण अस्वस्थ झालो होतो, वडिलांच्या मृत्यूचा बदला घ्यायचा होता, प्रेमप्रकरणातून मार्ग काढायचा होता अशी कारणे त्याने पोलिसांना सांगितली आहेत.

उत्तम कांबळे यांचे आज व्याख्यान
वसई, ७ फेब्रुवारी/वार्ताहर

समाजसेवक अंतोन दमेल यांच्या दहाव्या स्मृतीदिनानिमित्त रविवारी आठ फेब्रुवारीस उत्तम कांबळे यांचे ‘जगण्यातील नवी आव्हाने’ यावर व्याख्यान होणार आहे. हा कार्यक्रम श्रमदीप विश्वशांती, दोनतलाव, नंदखाल येथे चार वाजता आहे.