Leading International Marathi News Daily

रविवार , ८ फेब्रुवारी २००९

अंत पाहणारा प्रवास
मधुकर ठाकूर

भाऊचा धक्का-मोरा व रेवस या सागरी मार्गावरून वर्षांकाठी दहा लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. मात्र दहा लाख प्रवाशांचे हित जोपासण्याऐवजी बंदर अधिकारीच नव्हे, तर संबंधित खात्याचे मंत्रीही लाँच मालकांच्या मुठीत आहेत. यामुळे प्रवाशांना सोयी-सुविधा मिळेनाशा झाल्याने अतिजलद, सुखकर वाटणारा हा प्रवास प्रवाशांचा अंत पाहणारा ठरू लागला आहे. मोरा-भाऊचा धक्का-रेवस या दोन्ही सागरी मार्गावर मुंबई जलवाहतूक सहकारी संस्थेच्या लाँचेस प्रवासी वाहतूक करीत आहेत. मुंबईला पोहोचण्याचा जलद व सुखकारक मार्ग म्हणून या सागरी मार्गावर ये-जा करणाऱ्या प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते. या दोन्ही सागरी मार्गांवर संस्थेच्या २५ प्रवासी बोटी साधारणत: ४० वर्षांंपासून प्रवाशांची वाहतूक करीत आहेत. भाऊचा धक्का ते मोरा हे सागरी अंतर ११ किलोमीटर, तर रेवस-भाऊचा धक्का या सागरी मार्गावरील अंतर २४ किलोमीटर आहे

वसुधैव कुटुंबकम!
जयंत टिळक

आधुनिक, विध्वंसक आणि अमानवी दहशतवादाने आपल्या देशात १५ वर्षांपासून अधिक उग्र रूप धारण केले आहे. या कालावधीत झालेल्या बॉम्बस्फोटात किती निष्पाप नागरिक मारले गेले, किती संसार उद्ध्वस्त झाले, याची गणती नाही. या दुर्घटनांची आपण जणू सवयच लावून घेतली आहे. मात्र २६ नोव्हेंबरला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याने सामान्य नागरिक अंतर्बाह्य हादरला. हा निर्घृणपणा कशासाठी, हे थांबणार कधी, यावर उपाय काय, असे असंख्य प्रश्न आजही सर्वाच्या मनात आहेत.

रंगलेला हृदयेश समारोह
प्रतिनिधी

शास्त्रीय संगीताच्या वाढत्या लोकप्रियतेची साक्ष पुरेपूर पटविणारा मुंबई शहरातला सर्वात मोठा समारोह असे ज्याचे सार्थ वर्णन केले जाते तो ‘हृदयेश आर्टस् संगीत समारोह’ नुकताच विलेपार्ले येथील पार्ले टिळक विद्यालयाच्या पटांगणात उत्साहात पार पडला. ‘घैसास आशालता ट्रस्ट’, ‘टाटा कॅपिटल’, ‘ओरॅकल’, ‘स्टेट बँक’ आणि ‘रिचा रिएल्टर्स’ यांच्या सहकार्याने पार पडलेल्या या संगीत उत्सवात सुमारे चार हजार रसिकांनी देशातल्या अत्यंत नामवंत कलाकारांच्या कलेचा आस्वाद घेतला. ग्वाल्हेर घराण्याच्या प्रसिद्ध गायिका नीला भागवत यांच्या ‘पूर्वी’ रागाने समारोहाला छान सुरुवात झाली. ‘पूर्वी’तला गंभीर आणि करुण भाव त्यांच्या मांडणीतून व्यक्त झाला. ‘हमसे ना बोलो’ हा दादरा शोभा गरुटूची आठवण जागी करणारा होता. ‘काफी’ रागातली मराठी भक्तिरचना आणि पंजाबी टप्पा गाऊन त्यांनी श्रोत्यांची मनं जिंकली. पं. उल्हास कशाळकरांचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाल्याबद्दल सन्मान करण्यात आला. त्यांच्या ‘अमन’मधली गमकाची आणि जलद तान आणि लयकारी अत्यंत चित्तवेधक होती. ‘गणेश कल्याण’ हा स्वनिर्मित राग वाजविताना उस्ताद अमजद अली खास रंगात आले आणि ‘दुर्गा’ हा तर त्यांचा हातखंडा राग! पं. राजन - साजन मिश्र यांच्या ‘धानी’ रागात अप्रतिम गोडवा होता. पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या बासरीच्या नादाने अखिल विश्व जणू व्यापून टाकले.
संगीतमरतड पं. जसराज यांचा ‘जोग’ राग मन्द्रापासून मध्यसप्तकापर्यंत खुलत गेला. आरती अंकलीकर टिकेकर यांनी ‘पूर्वा कल्याण’ रागातून गानसरस्वती किशोरी आमोणकरांच्या गायकीची सावली दाखविली. ‘हेमंत’ रागातून पं. दिनकर कायकिणीचे दर्शन घडले. उस्ताद राशिद खान यांनी ‘बिहाग’ आणि ‘सोहनी बहार’ तबियतीत ऐकविले. पं. शिवकुमार शर्मानी ‘चंद्रकंस’ आणि एक धून वाजवून सुरेख सांगता केली. अनंत कुंटे, सुरेश तळवलकर, विजय घाटे, योगेश सम्सी, सुधीर नायक, भरत कामत, गुरुप्रसाद हेगडे, गिरीश नलावडे वगैरेंनी उत्कृष्ट संगत केली.

‘अपने आप’ने दिले नवीन आयुष्य..
प्रतिनिधी

‘मी इथे नऊ वर्षांपूर्वी आले होते..मला या केंद्राने शिक्षण दिले, आज मी कॉलेजच्या दुसऱ्या वर्षांत शिकत असून माझी सी. ए. होण्याची इच्छा आहे,’ नसीम सांगत होती. ‘अपने आप वुमेन्स कलेक्टीव्ह’ या संस्थेविषयीचा अभिमान तिच्या बोलण्यात दिसत होता. नूतनीकरण केलेल्या संस्थेच्या कार्यालयाचे नुकतेच उद्घाटन झाले, त्यावेळी नसीम अनुभव कथन करीत होती. या कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे आणि अभिनेता राहूल बोस उपस्थित होते. शरीर विक्रय करणाऱ्या महिलांच्या मुलांना शिक्षण मिळावे आणि त्यांच्या मुलींना या व्यवसायापासून दूर ठेवण्यासाठी ‘अपने आप वुमेन्स कलेक्टीव्ह’ कार्य करीत आहे. अनेकांनी दिलेल्या देणगीमधून या संस्थेने आपल्या खेतवाडी येथील कार्यालयाचे नूतनीकरण केले आहे. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले. प्रत्येकाला काही तरी करण्याची इच्छा असते. मात्र दिशा मिळत नाही. ‘अपने आप वुमेन्स कलेक्टीव्ह’ ने केलेल्या कार्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळेल, अशी आशा सुळे यांनी व्यक्त केली. कोणत्याही इतर आव्हानांपेक्षा शरीर विक्रय करणाऱ्या महिलांच्या समस्या आणि ही प्रथा आपल्यापुढे मोठे आव्हान आहे, असे बोस म्हणाले. कोणत्याही संवेदनशील व्यक्तीने या विषयी विचार केला पाहिजे, असे आवाहनही बोस यांनी या वेळी केले.
या कार्यक्रमाला माजी नगरपाल बकूल पटेल, संस्थेचे संस्थापक सुदर्शन लोयलका यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. लोयलका यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. आपण राजकारणात होतो. मात्र तिथे करण्यासारखे काही दिसले नाही. त्यामुळे आपण या कार्याकडे वळलो, असे त्यांनी सांगितले. संस्थेच्या मंजू व्यास यांनीही मनोगत व्यक्त केले. राहीन यांच्यासोबत संस्थेतील शालेय विद्यार्थ्यांनी प्रार्थना सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिका पोहूमल यांनी केले.