Leading International Marathi News Daily

रविवार , ८ फेब्रुवारी २००९

राज्य

जमावबंदी झुगारून टोपवासीयांचा कचरा डेपोविरोधात धडक मोर्चा पोलीस व पालिका प्रशासनावर शिवराळ भाषेत टीका
कोल्हापूर, ७ फेब्रुवारी/प्रतिनिधी

पोलीस प्रशासनाची ठोकशाही येथून पुढे सहन केली जाणार नाही, तसेच कोल्हापूर महापालिकेचा कचऱ्याचा एक ट्रकही प्रकल्पाकडे फिरकू देणार नाही, असा इशारा टोप आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या धडक मोर्चाने आज जिल्हा प्रशासनाला देण्यात आला. जमावबंदी आदेश पायदळी तुडवून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेला मोर्चा पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अडवल्यानंतर तेथेच झालेल्या सभेत काही वक्त्यांनी पोलीस प्रशासन आणि महापालिका प्रशासन यांना उद्देशून शिवराळ आणि चिथावणीखोर भाषा वापरली.

दहशतवादाची जागतिक राजकीय परिमाणे शोधावीत - केतकर
पुणे, ७ फेब्रुवारी/खास प्रतिनिधी

जगभर थैमान घालणारा दहशतवाद म्हणजे केवळ वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि ताजवरील हल्ल्यांचा थरारक नाटय़पट नाही. अमेरिकेपासून आखाती देशांपर्यंत व्यापलेली भूराजकीय परिस्थिती त्यासाठी कारणीभूत आहे. म्हणूनच, माध्यमांनी दहशतवादाच्या जागतिक राजकीय परिमाणांबाबत संवेदनशीलता निर्माण करावी, असे आवाहन लोकसत्ताचे संपादक कुमार केतकर यांनी येथे केले. पुणे विद्यापीठाच्या संरक्षण व सामरिकशास्त्र विभागातर्फे आयोजित स्वातंत्र्यवीर सावरकर व्याख्यानादरम्यान ‘माध्यमे आणि भारतामधील दहशतवाद’ या विषयावर केतकर बोलत होते.

‘झुंज ५९ तासांची’ छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन
नाशिकरोड, ७ फेब्रुवारी / वार्ताहर

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी येथील ईगल स्पोर्टस व सोशल क्लबतर्फे आयोजित ‘झुंज ५९ तासांची’ या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन आज सकाळी आ. बबन घोलप, देवळालीचे स्टेशन कमांडर ब्रिगेडिअर जे. के. नायर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, पोलीस उपायुक्त एस. डी. त्र्यंबके यांच्यासह क्लबचे अध्यक्ष मनोज मालपाणी उपस्थित होते. शहिदांना श्रद्धांजली वाहून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. दहशतवादी हल्ल्याची भीषणता कोणत्या ना कोणत्या स्वरूपात अजूनही समोर येणे सुरूच आहे.

राजारामबापू वस्त्रोद्योग उतरणार खुल्या गारमेंट बाजारात जॉन अब्राहमच्या हस्ते १६ रोजी उद्घाटन
सांगली, ७ फेब्रुवारी / गणेश जोशी

संरक्षित क्षेत्रातच सहकारी उद्योग भरारी घेतो, असा सार्वत्रिक समज असतानाच राजारामबापू वस्त्रोद्योग संकुलाने गारमेंटसारख्या स्पर्धात्मक बाजारात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक दर्जाची पुरूषांची अंतर्वस्त्रे ‘जयंत’ या ब्रँडखाली अभिनेता जॉन अब्राहम याच्या हस्ते दि. १६ फेब्रुवारी रोजी बाजारात आणण्याचा सहकार क्षेत्रातील देशातील पहिलाच उपक्रम ठरणार आहे. सध्या सहकारी चळवळ केवळ साखर, दूध, सूत व अर्थ या क्षेत्रापुरतेच मर्यादित ठरली आहे.

अडवाणी व मोदी यांची ‘हेडगेवार भवना’स भेट
नागपूर, ७ फेब्रुवारी / प्रतिनिधी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बालपणी केलेल्या संस्कारातून जीवनाला दिशा मिळाली. त्यामुळे स्वयंसेवक या नात्याने आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार व गोळवळकर गुरुजी यांना अभिवादन करण्यासाठी आलो असल्याचे मत लोकसभेचे विरोधी पक्षनेते लालकृष्ण अडवाणी व गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज येथे व्यक्त केले.

‘यशस्वी भव उपक्रमाचा परीक्षेत निश्चितच फायदा होईल’
ठाणे, ७ फेब्रुवारी/प्रतिनिधी

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासासाठी गेले वर्षभर ‘लोकसत्ता’ने विविध विषयांबाबत दर्जेदार पूरक साहित्य पुरविले, त्याचा अनेक शाळांतील विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. त्यामुळे वार्षिक परीक्षांमध्ये त्याचा निश्चितच फायदा दिसून येईल, असा आशावाद इतिहास विषयाचे तज्ज्ञ राहुल परब यांनी व्यक्त केला. किसननगर येथील बाल विद्यामंदिर व कर्मवीर भाऊराव पाटील शाळेतील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आज पार पडला. त्यावेळी परीक्षेला जाता-जाता कोणती दक्षता घ्यावी, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना परब बोलत होते.

कल्याण पालिका पोटनिवडणुकीकडे सर्वाचेच लक्ष
कल्याण, ७ फेब्रुवारी/वार्ताहर

कल्याण- डोंबिवली महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ११ मधील पोटनिवडणुकीला दिलेली स्थगिती आदेश न्यायालयाने उठविल्याने उद्या होणाऱ्या पोटनिवडणुकीत अवघ्या एक दिवसाच्या प्रचाराने कोणता उमेदवार बाजी मारतो, याकडे सर्वच राजकीय पक्षाचे लक्ष लागले आहे. प्रभाग क्रमांक ११, वडवली येथील अपक्ष नगरसेविका रुपा भोईर यांना दोनपेक्षा अधिक अपत्य असल्याने शिवसेनेच्या पराभूत उमेदवार वनिता पाटील यांनी कल्याण न्यायालयात दावा दाखल करून त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी केली होती. या दाव्याच्या सुनावणी वेळी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविल्यामुळे आपल्यालाच विजयी घोषित करण्याची पुरवणी मागणी त्यांनी केली होती. मात्र न्यायालयाने भोईर यांचे नगरसेवक पद रद्द करण्याचा निर्णय दिला होता. त्यामुळे १८ डिसेंबरला पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती.

कुसुमताई अग्रवाल यांचे निधन
नाशिक, ७ फेब्रुवारी / प्रतिनिधी

सामाजिक व धार्मिक कार्यामध्ये अग्रेसर असलेल्या येथील श्रीमती कुसुमताई दामोदर अग्रवाल (७६) यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. ‘लोकमत’चे वृत्तसंपादक आणि नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण अग्रवाल यांच्या त्या मातोश्री होत. राष्ट्र सेवादलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते दिवंगत दामोदर अग्रवाल यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे. कुसुमताई अग्रवाल यांच्या पार्थिवावर दुपारी गोदावरी तीरावरील अमरधाममध्ये शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

मलंगगड यात्रा उद्या
कल्याण, ७ फेब्रुवारी/वार्ताहर

श्री मलंग मच्छींद्रनाथ महाराजांची यात्रा ९ फेब्रुवारी रोजी होणार असून, शिवसैनिकांनी व हजारो भाविकांनी या यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केले.
कल्याणपासून ११ कि. मी. अंतरावर असलेले श्रीमलंग मच्छींद्रनाथाचे मूळ मंदिर आहे. शिलाहार राजापासून मच्छींद्रनाथ व अमरनाथपर्यंत या देवस्थानाला मोठे महत्त्व आहे. श्री मंलंग यात्रेस शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, खासदार मनोहर जोशी, संजय राऊत, आ. सुभाष देसाईंसह मान्यवर नेते मंडळी येणार आहेत. तरी ९ फेब्रुवारी २००९ रोजी माघी पौर्णिमेच्या उत्सवात सर्व बंधूभगिनींनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिंदे यांनी केले. पत्रकार परिषदेस महापौर रमेश जाधव, उपजिल्हा प्रमुख नरेश म्हस्के, शहर प्रमुख विजय साळवी, सचिन बासरे आदी नेते मंडळी उपस्थित होती.