Leading International Marathi News Daily

रविवार , ८ फेब्रुवारी २००९

क्रीडा

विजयाचा ‘पंच’ देण्यास भारतीय संघ उत्सुक प्रक्षेपण : निओ क्रिकेट
कोलंबो, ७ फेब्रुवारी / पीटीआय
वेळ : सकाळी १० पासून
श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघ निर्भेळ यश संपादन करून आयसीसी ‘वन डे’ क्रमवारीच्या अव्वल स्थानासाठी त्यांचा दावा अधिक मजबूत करतो का, याची उत्सुकता शिगेला गेली आहे. जागतिक क्रमवारीतील जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाचे दुसरे स्थान पटकावणाऱ्या भारतीय संघाचे मनोबल गगनाला भिडले असून उद्या, दिवसा होणाऱ्या मालिकेतील पाचव्या व शेवटच्या लढतीसह श्रीलंकेविरुद्ध निर्भेळ यश मिळवण्याचा ‘टीम इंडिया’चा निर्धारही पक्का आहे. भारतीय संघाचा कर्णधार महेंद्र सिंग धोनीसाठी ही मालिकाच स्वप्नवत ठरली आहे. सलग नऊ एकदिवसीय विजयांचा नवा विक्रम प्रस्थापित करणारा तो पहिलाच भारतीय कर्णधार ठरला असून उद्या, शेवटच्या लढतीतही ही विजयी घोडदौड कायम राखण्यास तो कमालीचा उत्सुक आहे. त्याचवेळी धोनीचे लक्ष जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थानावरही राहणार आहे. शेवटच्या लढतीत मिळवलेल्या विजयाने धोनीची सेना अव्वल स्थानाच्या आणखी एक पाऊल जवळ जाणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या १२५ गुणांसह अव्वल स्थानावर असून भारतीय संघ (१२२) केवळ तीन गुणांनी त्यांच्या मागे आहे. त्यामुळेच प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी कालच २००९ मध्ये भारतीय संघाचे अव्वल स्थानावर विराजमान होण्याचे लक्ष्य असल्याचे जाहीर केले आहे.

पश्चिम विभागाची विजयाकडे वाटचाल; रहाणेचे शतक हुकले पवार, पोवार ‘पॉवरफुल’
चेन्नई, ७ फेब्रुवारी / वृत्तसंस्था

भारतातील स्थानिक क्रिकेटच्या हंगामातील आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीची छाप पाडणाऱ्या अजिंक्य रहाणेने दुसऱ्या डावातही ९८ धावांची खेळी करून दुलिप करंडक क्रिकेट स्पर्धेत पश्चिम विभागाला विजयाच्या दिशेने नेले. पहिल्या डावात दक्षिण विभागाला १९९ धावांत गुंडाळून पश्चिम विभागाने आपल्या दुसऱ्या डावात ४ बाद २३२ अशी भक्कम स्थिती गाठून विजयाच्या दिशेने पाऊल टाकले आहे. पश्चिम विभागाकडे आता पहिल्या डावातील २६० धावांच्या आघाडीसह एकूण ४९२ धावांची मोठी आघाडी आहे.

नवोदित नॅशच्या झुंजार खेळीने विंडीजला आघाडी
जमैका, ७ फेब्रुवारी / वृत्तसंस्था

ख्रिस गेल आणि रामनरेश सारवान यांनी झुंजार शतके झळकावत दुसऱ्या गडय़ासाठी केलेल्या दमदार द्विशतकी भागीदारीनंतर यजमान वेस्ट इंडिजची पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडविरुद्ध अचानक उडालेली घसरगुंडी मूळ ऑस्ट्रेलियन असलेल्या ब्रेंडन नॅशने थोपवली. ऑस्ट्रेलियात जन्मलेल्या पण, विंडीजचे प्रथमच प्रतिनिधित्व करत असलेल्या बेनने यष्टिरक्षक फलंदाज दिनेश रामदिनच्या साथीने महत्त्वपूर्ण भागीदारी करत वेस्ट इंडिजला पहिल्या डावात महत्त्वपूर्ण आघाडीही मिळवून दिली.

आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडूंवर अन्याय - युनूस खान
कराची, ७ फेब्रुवारी/ वृत्तसंस्था
इंडियन प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वासाठी शुक्रवारी खेळाडूंच्या लागलेल्या बोलीत इंग्लंडच्या खेळाम्डूंसाठी लागलेल्या प्रचंड रकमेच्या बोली पाहता पाकिस्तानच्या खेळाडूंना या स्पर्धेत फारच कमी पैसे मिळाले अशा शब्दांत पाकिस्तानचा कर्णधार युनूस खान याने नाराजी व्यक्त केली आहे. इंग्लंडचे खेळाडू या स्पर्धेत कमी काळ खेळणार असले तरी त्यांच्यासाठी प्रचंड रकमेच्या बोली लावल्या गेल्याबद्दल युनूस खान याने आश्चर्य व्यक्त केले आहे.

विश्वनाथ यांना सी.के. नायडू जीवनगौरव पुरस्कार
नवी दिल्ली, ७ फेब्रुवारी/वृत्तसंस्था

आपल्या शैलीदार फलंदाजीने एक काळ क्रिकेटविश्व गाजवून सोडणारे गुंडाप्पा विश्वनाथ यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सी.के. नायडू जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्याचे ठरविले आहे. २००७-२००८ वर्षांसाठीचा हा पुरस्कार आहे. मुंबई येथे १८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या समारंभात विश्वनाथ यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. गौरवचिन्ह आणि १५ लाख रु. असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत विश्वनाथ हे फलंदाजीचे प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहेत.

उत्तेजक सेवनप्रकरणी बॉक्सर मनजितवर दोन वर्षांची बंदी; बलजितही दोषी
नवी दिल्ली, ७ फेब्रुवारी / पीटीआय

एकीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय बॉक्सिंगची छाप पडत असताना दुसरीकडे भारतीय बॉक्सिंगला उत्तेजक सेवनासारख्या घातक सवयीचा विळखा तर पडत नाही, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. २००७ला लिव्हरपुल येथे झालेल्या राष्ट्रकुल बॉक्सिंग स्पर्धेत रौप्यपदक जिंकणारा मनजितसिंग याला उत्तेजक सेवनाबद्दल दोन वर्षांच्या बंदीच्या कारवाईला सामोरे जावे लागले असून बलजितसिंग याच्या ‘अ’ नमुन्यात उत्तेजक सापडल्याचे निदान झाले आहे.

पीटरसन खुश हुआ
लंडन, ७ फेब्रुवारी / वृत्तसंस्था

इंडियन प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वासाठी आपल्या नावावर सर्वाधिक रकमेची बोली लागल्याबद्दल इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसन याने आनंद व्यक्त केला आहे. साडेनऊ दशलक्ष डॉलर एवढी माझी मूळ किंमत होती. त्यामुळेच मूळ रकमेपेक्षा माझ्या नावावर एवढय़ा मोठय़ा रकमेची बोली लावली गेली यावर माझा अजून विश्वासच बसत नाही, असे पीटरसन याने सांगितले.

विंडीजच्या नॅशची झुंजार खेळी; इंग्लंड २ बाद ११
जमैका, ७ फेब्रुवारी / वृत्तसंस्था

कर्णधार ख्रिस गेल (१०४) आणि रामनरेश सरवान (१०७) यांच्या शतकांमुळे तसेच शिवनारायण चंद्रपॉलच्या ५५ धावांच्या खेळीमुळे वेस्ट इंडिजने पहिल्या डावात इंग्लंडवर ७४ धावांची आघाडी घेतली. तर दुसऱ्या डावात उपाहाराला इंग्लंडचे दोन फलंदाज बाद करून सामन्यावर पकड मिळविली आहे. पहिल्या डावात इंग्लंडने ३१८ धावांपर्यंत मजल मारली होती. त्याला प्रत्युत्तर देताना वेस्ट इंडिजने ३९२ धावा केल्या. इंग्लंडला मात्र दुसऱ्या डावात अपेक्षित सुरुवात करता आली नाही.

हॉलडंच्या जर्मनीवरील विजयामुळे भारत अंतिम फेरीत पंजाब सुवर्णचषक हॉकी
चंदीगढ, ७ फेब्रुवारी / पीटीआय

युरोपियन चॅम्पियन असलेल्या हॉलंडने विश्वविजेत्या जर्मनीचा ७-१ असा मानहानीकारक पराभव केल्यामुळे पंजाब सुवर्णचषक हॉकी स्पर्धेत भारताचा अंतिम फेरीतील प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. भारताची आता अंतिम फेरीत हॉलंडशी झुंज होणार आहे.
हॉलंडने या स्पर्धेत आतापर्यंत एकही लढत गमावलेली नाही. तसेच १४ गुणांसह पहिले स्थानही मिळविले आहे. भारताच्या खात्यात ८ गुण आहेत.

फेडरेशन चषक टेनिसमध्ये भारताची दुसऱ्या गटात घसरण; सर्व लढतीत हार
पर्थ, ७ फेब्रुवारी / पीटीआय

फेडरेशन चषक आशिया/ओशनिया गटात न्यूझीलंडनंतर तैपेईकडून ०-३ असा दारुण पराभव स्वीकारावा लागल्यामुळे भारतीय टेनिस संघाची घसरण झाली असून भारतीय संघ आता दुसऱ्या गटात ढकलला गेला आहे. भारतीय संघ २००४मध्ये गट १ मध्ये दाखल झाला होता, पण या स्पर्धेत एकही लढत जिंकता न आल्यामुळे तो दुसऱ्या गटात फेकला गेला आहे. भारताची सानिया मिर्झाने या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतल्यामुळे भारताची बाजू कमकुवत झाली होती. त्याचा फटका भारतीय संघाला बसला. तैपेईविरुद्धच्या पहिल्या सामन्यात रश्मी चक्रवर्तीला २-६, ५-७ अशी मात मिळाली. तर अंकिता भांब्री चॅन चिनवैईकडून ५-७, १-६ अशी पराभूत झाली. या दोन पराभवांमुळे भारताची पहिल्या गटात राहण्याची शक्यता मावळली. दुहेरीत भांब्री भगिनींना ४-६, २-६ असा पराभव स्वीकारावा लागला. सानियाच्या अनुपस्थितीबरोबरच सुनीता राव आणि शिखा उबेरॉय यादेखील भारतीय संघातून खेळू शकल्या नाहीत. केंद्र सरकारने नुकतेच जे धोरण जाहीर केले, त्यानुसार परदेशात जन्मलेल्या खेळाडूंना भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली जाणार नाही, असे स्पष्ट झाले. त्यामुळे राव व उबेरॉय यांची संधी हुकली. संघाचे प्रशिक्षक एन्रिको पिपेर्नो यांनी संघाच्या या कामगिरीबद्दल नाराजी प्रकट केली. राष्ट्रकुल स्पर्धेसाठी १५ ते १६ महिन्यांचा कालावधी शिल्लक असून प्रचंड सराव करून भारताच्या एका उत्तम संघाची बांधणी करावी लागेल, असे ते म्हणाले.

युकी भांब्रीला टेनिस महासंघातर्फे पाच लाखांचे पारितोषिक
नवी दिल्ली, ७ फेब्रुवारी / पीटीआय

ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत ज्युनियर गटाचे विजेतेपद पटकाविणाऱ्या युकी भांब्रीला अखिल भारतीय टेनिस महासंघातर्फे आज पाच लाख रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. महासंघाचे महासचिव अनिल खन्ना यांनी युकीला आज पाच लाखांचा धनादेश दिला. या कार्यक्रमाला भारताचे माजी डेव्हिस चषक टेनिसपटू सुमंत मिश्रा, बलरामसिंग, विशाल उप्पल उपस्थित होते. महासंघाने युकीसह त्याचे प्रशिक्षक आदित्य सचदेव यांनाही ५० हजार रुपयांचे पारितोषिक देऊन सन्मानित केले. गेली सहा वर्षे सचदेव युकीला मार्गदर्शन करीत आहेत. दिल्ली सरकारतर्फेही युकीला ५ लाखांचे बक्षीस देण्यात आले होते. युकीने आपल्याला दिलेल्या या बहुमानाबद्दल महासंघाचे आभार मानले आहेत.