Leading International Marathi News Daily

रविवार , ८ फेब्रुवारी २००९

खंत खुणेच्या दगडाची
भगवान मंडलिक

‘तुम्ही कोठे राहता’ तर त्या पुतळ्याच्या बाजूला, पुतळ्याच्या पलीकडे. पण पुतळा म्हणजे काय, तो कशाचा आहे, कधी केला आहे याची थोडी तरी जाणीव, माहिती आपल्याला असते का? अजिबात नाही. फक्त एक ‘खुणेचा दगड’ म्हणून त्या अवाढव्य, आखीव-रेखीव पुतळ्याकडे बघितले जाते. ज्यांच्यासाठी पुतळे तयार केले जातात, ते पुतळ्याखालून दररोज येराझाऱ्या मारत असतात. त्यांना पुतळा म्हणजे काय हेच कळत नाही. मुंबईत किती पुतळे, कोणाचे पुतळे आहेत एवढे जरी कोणाला विचारले तरी ते सांगता येणार नाहीत आणि सांगितले तरी कोणाचे आहेत हेही सांगता येणार नाही, अशी सध्याच्या शिल्पांची, शिल्पकलेची अवस्था आहे, असे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शिल्पकार आणि कल्याणमधील जुने रहिवासी सदाशिव तथा भाऊ साठे खंतावून सांगतात.

राजापूरची इंग्रजी वखार काळाच्या ओघात नामशेष! शिलालेख ठाण्यात
राजापूरला १९९० नंतर प्रथमच मी आलो होतो, ते एका समारंभाच्या निमित्ताने. राजापूरची इंग्रजांची वखार पहावयास मुद्दाम गेलो, त्याला कारणही तसेच होते. ठाण्याचे प्राच्य विद्या अभ्यासिकेचे डॉ. विजय बेडेकर यांनी चार महिन्यांपूर्वी एक शिलालेख दाखविला, तो राजापूरला इंग्रजांनी बांधलेल्या फॅक्टरीचा (वखारीचा) होता. त्यावर इ. स. १६४९ साली वखार बांधण्यात येऊन इ. स. १७०८ साली ती बंद झाली असे कोरले होते. डॉ. बेडेकर हे राजापूरचे, पेशाने डॉक्टर असले तरी इतिहासाचा अभ्यासही दांडगा आहे.

स्वामी विवेकानंद विद्यामंदिर शाळेच्या जागतिक क्रीडादिनाचा अपूर्व सोहळा
आत्माराम नाटेकर

२४ जानेवारी हा ‘जागतिक क्रीडादिन’ राज्य शासनाने या वर्षांपासून ‘राष्ट्रीय बालिका दिन’ म्हणून घोषित केला आहे. या दोन्ही दिनांचे औचित्य साधून डोंबिवलीच्या स्वामी विद्यमंदिरच्या राणा प्रताप शाळेने एका मिनी ऑलिम्पिकचे आयोजन केले होते. सकाळच्या सुखद गारव्यात आरंभ झालेला हा सोहळा सूर्य माथ्यावर येईपर्यंत सुरूच होता. विद्यार्थी, शिक्षक आणि पालक वर्ग या दिमाखदार सोहळ्यात रममाण झाला होता.


जी. एस. एम. मोबाइल फोनची कार्यपद्धती
गेल्यावर्षी रिलायन्स कंपनीने जी. एस. एम. तंत्रज्ञान वापरून मोबाइल फोन सेवा सर्व देशभर सुरू करण्याचा परवाना पदरात पाडला. त्यानंतर देशभरातील ११ हजार छोटय़ा- मोठय़ा शहरांमध्ये आणि गावांमध्ये जी. एस. एम. पद्धतीची मोबाइल सेवा सुरूही केली आणि आता दिल्लीतही रविवार, १ फेब्रुवारी २००९ पासून त्यांनी जी. एस. एम. सेवा सुरू केली आहे. रिलायन्स कंपनी काही वर्षांंपूर्वी मोबाइल फोन सेवेच्या क्षेत्रात उतरली ती सी. डी. एम. ए.चे तंत्रज्ञान अधिक उच्च प्रतीचे आहे, असा दावा करून! आता मात्र त्यांनी सी. डी. एम. ए.ला टाटा केलेला दिसतो आणि आता ते उत्तरोत्तर जी. एस. एम. तंत्रज्ञान वापरून त्यांच्या फोन सेवेचा विस्तार करतील.

कल्पनातीत..
प्रशांत असलेकर

‘ज्येष्ठ संगीतकार शंकर जयकिशन यांनी तुला ऑडिशनसाठी (स्वरपरीक्षेसाठी) उद्या त्यांच्या स्टुडिओत बोलवलंय’ ही बातमी ऐकून १९ वर्षांच्या तरुण कल्पना नाईकचा आनंद गगनात मावेना. संगीतकार शंकर जयकिशन यांच्याकडून निमंत्रण येणं म्हणजे तिच्या यशाचं शिखर होतं. कल्पना नाईक ही एक कथ्थक नृत्यांगना होती. शिवाय तिला गायनाचंही अंग होतं. तिची आई शास्त्रीय गायिका होती.तिचा रोजचा रियाझ ऐकून कल्पनाचीही गायनाची एक बैठक तयार झाली होती. वयाच्या सातव्या वर्षांपासून कल्पना गिरगावातल्या सार्वजनिक गणेशोत्सवांमध्ये गायची.संगीतकार शंकर जयकिशन यांच्या वाद्यवृंदातले एक साथीदार तिच्या चाळीतच राहायचे. त्यांचा एक खासगी ऑर्केस्ट्रा होता.

पंख आनंदाचे..
राजन जोशी

सूर्योदयापूर्वीची लाल फाक, झुंजुमंजुची वेळ आणि रामाचा प्रहर. अशा वेळेत घनदाट पार्कमध्ये प्रवेश केला, पण दाट धुक्याची अभेद्य भिंत पुढे सरकू देईना. पक्ष्यांचे नंदनवन आणि त्यांचे साम्राज्य पाहण्याची प्रचंड हुरहूर मनाला लागून राहिली होती. त्यामुळे धुक्याची पर्वा न करता मी आणि माझा गाईड आम्ही पार्कमधील आमचा पुढचा प्रवास सुरू ठेवला. नीरव शांतता, हलकेच पानाचा कंप कानावर पडत होता, पण कोठेच कोणाचे दर्शन घडत नव्हते. पार्कमध्ये जसा आत प्रवेश करत गेलो, तसा सूर्यनारायण वर आला होता. सुरू झाले होते विविध रंगी- ढंगी आकार, किलबिल, कुहुकुहू, चिवचिवाट, चित्कार असलेल्या पक्ष्यांचे दर्शन. या नयन मनोहरी दृश्याने, थंडीत गारठलो असताना चहाची आठवण येण्याऐवजी कोणता पक्षी पाहू नि कोणता नको, हा पाहू की तो पाहू, यामुळे मन अक्षरश: सैरावैरा धावू लागले होते.

विद्यानिकेतन शाळेत रंगले आजी-आजोबा संमेलन
डोंबिवली/प्रतिनिधी - निसर्गाची नीरव शांतता, गर्द निळी झाडी आणि त्यात कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या प्रेमगीत आणि भावगीतांचा पाऊस. या रम्य वातावरणात सहाशे आजी-आजोबा भल्या सकाळीच येऊन विहार करीत होते विद्यानिकेतन शाळेच्या आजी-आजोबा संमेलनात. हे सगळं कमी म्हणून की काय, ज्येष्ठ पत्रकार अंबरिश मिश्र, अनिल हर्डिकर यांचे चपखल, तोडीच्या निवेदनाने कार्यक्रमात रंगत आणली होती. शाळेचे मुख्य प्रवर्तक विवेक पंडित आणि सहकाऱ्यांनी आयोजित केलेल्या या देखण्या कार्यक्रमात पाडगावकरांची गीते झाडाझाडांवर आजी-आजोबांच्या देखत हिंदोळे घेत होती. त्यात हिंदोळ्यांना झोके देण्याचा प्रयत्न हळूच आजी-आजोबांकडून सुरू होता. विवेक पंडित यांनी सांगितले, आजी-आजोबा ही घरातील संस्कार मंदिरे आहेत. या संस्कारातून तयार झालेली मुले जेव्हा शाळेत येतात, तेव्हा या मुलांच्या वागण्या-बोलण्यातून त्यांच्यामधील संस्कार दिसत असतो. या मुलांना संस्काराच्या मुशीतून घडविणाऱ्या आजी-आजोबांना आपली नातवंडे शाळेत काय करतात हे कळावे, शाळा, आजी-आजोबा, शिक्षक आणि मुले यांचा एक सुरेख संगम आजी-आजोबांना एका व्यासपीठावर पाहण्यास मिळावा, आपण आपल्या मुलांना, नातवंडांना जे संस्काराच्या रूपाने देतो ते बीज किती जोपासले जातंय, वाढविले जातंय, हे आजींना कळण्यासाठी या उपक्रमाचे सहा वर्षांपासून आयोजन केले जात आहे. या संमेलनासाठी शाळेतील काही शिक्षिका नववारी, काही नव्या साडय़ा नेसून आल्या होत्या. मुले आजी-आजोबांची पाणी, नाश्ता सेवा करण्यात दंग होती. मंगेश पाडगावकर यांनी मोबाइलवरून संदेश देऊन सांगितले की, माणसाच्या मनात कनवाळूपणाचा, मायेचा एक झरा असतो. हा झरा समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम विद्यानिकेतन शाळेचे प्रवर्तक विवेक पंडित यांनी चालू केले आहे, ही कौतुकास्पद बाब आहे. माणुसकी कमी होत चालली आहे, या पाश्र्वभूमीवर अशाप्रकारची संमेलने ही काळाची गरज आहे. आजी-आजोबांच्या विविध प्रकारच्या खेळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या.

नूतन ज्ञानमंदिरातील गुणवंतांचा सत्कार
कल्याण/प्रतिनिधी

कल्याण पूर्वेतील नूतन ज्ञानमंदिरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा नुकताच आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बक्षीस वितरण कार्यक्रमास समाजसेवक गणपत गायकवाड, शालेय समिती अध्यक्ष ल. द. जोशी, मुख्याध्यापिका गागरे, उपमुख्याध्यापक बेंडाळे उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी अभ्यास, क्रीडा क्षेत्रात मिळविलेल्या यशाबद्दल आमदार कथोरे यांनी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचे कौतुक केले. अधिकाधिक विद्यार्थी गुणवत्तेच्या प्रवाहात कसे येतील, टीव्हीपासून कसे परावृत्त होतील, यादृष्टीने सर्वानीच विचार करणे आवश्यक आहे, असे कथोरे म्हणाले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंगसूळकर, भालेराव, भुजबळ, जाधव, गरवारे यांनी प्रयत्न केले.

कल्याणमधील चौकात पोलीस संपर्काचे फलक लावण्याची मागणी
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण शहरातील महत्त्वाचे चौक, रस्त्यांवर नागरिकांना पोलीस, संस्थांशी तात्काळ संपर्क साधण्यासाठी महत्त्वाचे दूरध्वनी, पत्ते असलेले फलक लावण्याची मागणी ‘शारदा भास्कर शेट्टी मेमोरिअल ट्रस्ट’चे अध्यक्ष भास्कर शेट्टी यांनी ठाणे पोलीस आयुक्तांकडे केली आहे. कल्याण शहराला खाडीकिनारा आहे, येथील लोकसंख्या वाढत आहे, एक ऐतिहासिक शहर म्हणून कल्याणचा नावलौकिक आहे. अशा परिस्थितीत शहराचे सांस्कृतिक वैभव टिकून ठेवण्यासाठी, आणीबाणीच्या प्रसंगी नागरिकांना पोलीस यंत्रणा, संस्थांशी संपर्क साधता यावा म्हणून महत्त्वाचे दूरध्वनी फलकावर लावले तर पोलीस आणि नागरिकांमधील दुरावा दूर होण्यास मदत होईल, असे पोलीसमित्र भास्कर शेट्टी यांनी आयुक्तांना कळविले आहे.