Leading International Marathi News Daily                                  रविवार , ८ फेब्रुवारी २००९
विविध
(सविस्तर वृत्त)

वाजपेयी अजूनही व्हेंटिलेटरवर
नवी दिल्ली, ७ फेब्रुवारी / पी.टी.आय.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना दुसऱ्या दिवशीही कृत्रिम श्वसन यंत्रणेवर ठेवण्यात आले.

 

श्वासनलिकेतील संसर्ग वाढल्याने वाजपेयी यांना श्वास घेणे कठिण झाले होते. त्यामुळे त्यांना शुक्रवारी सकाळी कृत्रिम श्वसन यंत्रणेवर ठेवण्यात आले. वाजपेयी यांची स्थिती स्थिर असून रक्तदाब तसेच यकृत तसेच किडनीचे कार्य सामान्य असल्याची माहिती अ.भा. आयुर्विज्ञान संस्थेच्या डॉ. संपतकुमार यांनी दिली.
छातीत वेदना होत असल्याने वाजपेयी यांनी मंगळवारी ‘एम्स’ मध्ये दाखल करण्यात आले होते. पण नंतर न्युमोनिया होऊन तसेच जंतुसंसर्ग होऊन छातीत कफ वाढल्याने वाजपेयी यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला होता. वाजपेयी यांना ‘एम्स’ च्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर डॉक्टरांची तुकडी लक्ष ठेऊन असल्याची माहिती देण्यात आली.
दरम्यान वाजपेयी यांच्या प्रकृतीची चौकशी लालकृष्ण अडवाणी तसेच भाजपाचे अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी केली. सध्या हे दोघेही भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीसाठी नागपूर येथे आले आहेत. कॉँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि लोकसभेचे सभापती सोमनाथ चटर्जी यांनीही आज ‘एम्स’ मध्ये जाऊन वाजपेयी यांच्या प्रकृतीबाबत माहिती घेतली. वाजपेयी अतिदक्षता विभागात असल्याने सोनिया गांधी यांनी त्यांच्या मानसकन्येशी संवाद साधला. सोनिया गांधी यांनी यावेळी डॉक्टरांशी चर्चाही केली.
सोमनाथ चटर्जी यांनी वाजपेयी हे लढवय्ये असल्याने खडखडीत बरे होऊन लवकरच बाहेर पडतील असा विश्वास व्यक्त केला.
नेत्यांची प्रार्थना
नागपूरमध्ये पत्रकारांनी गाठले असता, ‘सकाळीच एम्सच्या डॉक्टरांशी बोलणे झाले आहे. अटलजी व्हेंटिलेटरवर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत’ असे अडवाणी म्हणाले. ‘अटलजी आमचे आधारस्तंभ आहेत. त्यांच्या प्रकृतीला आराम पडो, अशी आम्ही सर्वच ईश्वराजवळ प्रार्थना करीत आहोत’, असे सुषमा स्वराज म्हणाल्या.