Leading International Marathi News Daily                                  रविवार , ८ फेब्रुवारी २००९
विविध
(सविस्तर वृत्त)

प्रिंट मिडियासाठी सरकार जाहीर करणार खास पॅकेज
नवी दिल्ली ७ फेब्रुवारी/पीटीआय

मंदीमुळे आर्थिक पेचात सापडलेल्या प्रसार माध्यमांसाठी लवकरच पॅकेज जाहीर केले जाईल, असे ठोस

 

आश्वासन केंद्र सरकारने आज दिले. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी आज माहिती व प्रसारण राज्यमंत्री आनंद शर्मा यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी हे सूचित केले.
शर्मा यांनी वार्ताहरांना सांगितले की, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आपल्याला भेटले व त्यांनी या उद्योगापुढे मंदीमुळे उभ्या ठाकलेल्या समस्यांची कल्पना दिली. त्यामुळे परिस्थिती सुधारण्यासाठी सरकार लवकरच पॅकेज जाहीर करणार आहे.
हिंदुस्थान टाइम्स समूहाच्या संपादक संचालक व अध्यक्षा शोभना भारतीय, इंडियन एक्स्प्रेसचे मुख्य संपादक शेखर गुप्ता, बिझीनेस स्टॅंडर्डचे प्रकाशक व संपादक टी. एन. निनन यांनी माहिती व प्रसारण राज्यमंत्री आनंद शर्मा यांची भेट घेतली. प्रसारमाध्यमांपुढील कठीण परिस्थितीबाबत सरकार संवेदनशील आहे असे नमूद करून शर्मा म्हणाले की, माहिती व प्रसारण मंत्रालयाने एक पॅकेज तयार केले असून त्याच्या शिफारशी अर्थ मंत्रालयाकडे पाठविल्या आहेत व लवकरच पॅकेज जाहीर करण्यात येईल.
या पॅकेजमध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमांना समाविष्ट केले आहे काय असे विचारले असता शर्मा म्हणाले की, हे पॅकेज प्रिंट मीडियासाठी आहे तरी त्यातील काही शिफारशी इलेक्ट्रॉनिक मीडियालाही लागू आहेत. पॅकेजचा तपशील सांगण्यास मात्र शर्मा यांनी नकार दिला. जागतिक आर्थिक पेचामुळे प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमांपुढे कठीण आव्हान असून जाहिरातींचे उत्पन्न घटले आहे. वृत्तपत्र कागदाचा खर्चही वाढला आहे.