Leading International Marathi News Daily

रविवार , ८ फेब्रुवारी २००९

विविध

वाजपेयी अजूनही व्हेंटिलेटरवर
नवी दिल्ली, ७ फेब्रुवारी / पी.टी.आय.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना दुसऱ्या दिवशीही कृत्रिम श्वसन यंत्रणेवर ठेवण्यात आले. श्वासनलिकेतील संसर्ग वाढल्याने वाजपेयी यांना श्वास घेणे कठिण झाले होते. त्यामुळे त्यांना शुक्रवारी सकाळी कृत्रिम श्वसन यंत्रणेवर ठेवण्यात आले. वाजपेयी यांची स्थिती स्थिर असून रक्तदाब तसेच यकृत तसेच किडनीचे कार्य सामान्य असल्याची माहिती अ.भा. आयुर्विज्ञान संस्थेच्या डॉ. संपतकुमार यांनी दिली. छातीत वेदना होत असल्याने वाजपेयी यांनी मंगळवारी ‘एम्स’ मध्ये दाखल करण्यात आले होते. पण नंतर न्युमोनिया होऊन तसेच जंतुसंसर्ग होऊन छातीत कफ वाढल्याने वाजपेयी यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला होता. वाजपेयी यांना ‘एम्स’ च्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर डॉक्टरांची तुकडी लक्ष ठेऊन असल्याची माहिती देण्यात आली.

प्रिंट मिडियासाठी सरकार जाहीर करणार खास पॅकेज
नवी दिल्ली ७ फेब्रुवारी/पीटीआय

मंदीमुळे आर्थिक पेचात सापडलेल्या प्रसार माध्यमांसाठी लवकरच पॅकेज जाहीर केले जाईल, असे ठोस आश्वासन केंद्र सरकारने आज दिले. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी आज माहिती व प्रसारण राज्यमंत्री आनंद शर्मा यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी हे सूचित केले. शर्मा यांनी वार्ताहरांना सांगितले की, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आपल्याला भेटले व त्यांनी या उद्योगापुढे मंदीमुळे उभ्या ठाकलेल्या समस्यांची कल्पना दिली. त्यामुळे परिस्थिती सुधारण्यासाठी सरकार लवकरच पॅकेज जाहीर करणार आहे.

ए. क्यू. खान यांच्या सुटकेमुळे अमेरिकेला चिंता
वॉशिंग्टन, ७ फेब्रुवारी/पीटीआय

पाकिस्तान सरकारने अणुशास्त्रज्ञ डॉ. अब्दुल कादीर खान यांची नजरकैदेतून सुटका केल्यामुळे अमेरिकेने चिंता व्यक्त केली आहे. तसेच डॉ. खान पुन्हा अण्वस्त्रप्रसारामध्ये गुंतणार नाहीत, याची हमीही पाकिस्तानकडून मागितली आहे. डॉ. अब्दुल कादीर खान यांची पाच वर्षांंच्या नजरकैदेतून एका पाकिस्तानी न्यायालयाने काल सुटका केली होती. या वर्षी जानेवारी महिन्यातच अमेरिकेने खान आणि त्यांच्या अण्वस्त्रप्रसार करणाऱ्या जाळ्यावर र्निबध लादले होते. आता डॉ. खान पुन्हा अण्वस्त्रप्रसार सुरू करणार नाहीत याची हमी पाकिस्तानने द्यावी असे अमेरिकन प्रशासनाने म्हटले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन म्हणाल्या की, पाकिस्तानच्या या निर्णयामुळे अमेरिकेची ्र चिंता वाढली आहे. व्हाईट हाऊसचे प्रवक्ते रॉबर्ट गिब्ज यांनी पत्रकारांना सांगितले की, पाकिस्तानकडून अमेरिकेला अद्याप कोणतेही आश्वासन मिळालेले नाही.