Leading International Marathi News Daily

सोमवार , ९ फेब्रुवारी २००९

अग्रलेख

‘राम करे ऐसा हो जाए..’
आगामी सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्ष प्रचंड मतांनी विजयी होऊन लालकृष्ण अडवाणी हे पुढले पंतप्रधान असतील का, याची चिंता काँग्रेस नेत्यांनी करायचे सोडून दिले आहे. अडवाणींच्या पक्षांतर्गत विरोधकांनाही ती आता राहिलेली नाही. ती खुद्द अडवाणींना वाटत नाही आणि रामाला तर त्याहून नाही. अयोध्येत रामाचे मंदिर बांधले जाणारच, ही घोषणा निवडणुकीच्या तोंडावर करण्यात आल्याने आता भाजपला पुन्हा एकदा आपले ते पहिले दिवस पाहावे लागणार की काय, याचीच काळजी लागून राहिली आहे. त्यातून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी अडवाणी हेच पुढले पंतप्रधान असतील, असे म्हटल्याने त्यात थोडी भरच पडली आहे. नागपुरात पार पडलेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या आणि राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीनंतर जाहीर सभा झाली. तीत बोलताना अडवाणी यांनी ‘देश परमवैभवाला जावा हेच आमचे चिंतन आहे,’ असे म्हटले, पण त्याआधीच्या परिषदेत भाजपचे अध्यक्ष राजनाथसिंह यांच्यासह बरेच जण डोळे मिटून घेऊन बसले होते. एका इलेक्ट्रॉनिक वृत्तवाहिनीने हे नेते झोपले असल्याचा आरोप केला आणि साक्षात ती दृश्ये दाखवलीहीे. तसा आरोप होणार याची कल्पना असल्यानेच अडवाणींनी देशाच्या परमवैभवाची भाषा केली. अशा वैभवाचे स्वप्न पहायचे तर डोळे मिटून बसणे भागच असते. तेव्हा डोळे मिटून ‘राम करे ऐसा हो जाए..’ अशी प्रार्थना केली तर बिघडले कुठे, असा त्यांचा प्रश्न असू शकतो. राष्ट्रीय परिषदेत रामाचा उल्लेख केला जाणार, हे ओळखून की काय, बाबरी मशीद जमीनदोस्त करायला कारणीभूत असणारे कल्याणसिंग यांनी पक्षाचा दुसऱ्यांदा त्याग केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक के. सुदर्शन यांनी याच सुमारास बाबरी मशीद पाडण्यास तेव्हाचे सरकार जबाबदार होते, असे म्हटले. ‘नरो वा कुंजरो वा’ची भाषा संघजनांनी उच्चारायची नाही, तर कुणी? म्हटले तर केंद्रात तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांचे सरकार बाबरी मशीद पाडायला जबाबदार होते, असा त्याचा अर्थ घेतला जाऊ शकतो; किंवा उत्तर प्रदेशात तेव्हा असणारे कल्याणसिंगांचे सरकार कारणीभूत आहे, असे मानले जाऊ शकते. म्हटले तर त्या घटनेचे पक्षाला श्रेय, म्हटले तर कल्याणसिंगांना जवळ करू पाहणाऱ्यांना इशारा! शिवाय कल्याणसिंगांना तिसऱ्यांदा भाजपमध्ये परतायची ती सोय असेल, ते वेगळेच! मागल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या काळात ‘फील गुड’च्या घोषणेने निर्माण केलेले गोंधळाचे वातावरण लक्षात घेऊन अडवाणींनी या खेपेला, ‘समृद्ध भारत- सुरक्षित भारत’ अशी घोषणा दिली आहे. भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या कारकीर्दीत समृद्धीने कोणते दिवे लावले ते आपण अनुभवलेच आहे. सुरक्षित भारताचे म्हणाल तर संसदेवर दहशतवाद्यांनी केलेला हल्ला त्यांच्याच कारकीर्दीत आणि अडवाणी स्वत: केंद्रीय गृहमंत्रिपदावर असताना झाला. गुजरातेत अक्षरधामवर केला गेलेला हल्ला त्यांच्याच काळात झाला. दहशतवादी कारवायांबद्दल काश्मीरमध्ये पकडलेले तिघे दहशतवादी मौलाना मसूद अझहर, मुश्ताक अहमद झरगर आणि अहमद ओमर सईद शेख यांना आपल्याबरोबर खास विमानातून अफगाणिस्तानात कंदाहारला नेऊन सोडणारे जसवंतसिंह भाजप सरकारचे परराष्ट्रमंत्री होते. त्या वेळी कंदाहारच्या दहशतवादी तालिबानांनी २०० कोटी डॉलरचीही मागणी केली होती, तिची पूर्तता केली की नाही, हे जसवंतसिंह यांनी आपल्या ‘अ कॉल टू ऑनर’ या आत्मचरित्रात लिहिलेले नाही. हेच तिघे दहशतवादी केवळ भारताच्याच नव्हे तर अमेरिकेसह सर्व जगाविरद्ध अतिरेकी कारवायांमध्ये गुंतले होते. वर्ल्ड ट्रेड सेंटरवर विमान धडकवणारा इजिप्शियन दहशतवादी महमद अट्टा याला एक लाख डॉलरची बॅग पोहोचवणारा सईद शेख होता. डॅनिअल पर्ल या अमेरिकन पत्रकाराचा खुनीही सईद शेख हाच होता. सध्या तो पाकिस्तानच्या तुरुंगात आहे. कारगिलचे युद्ध घडले तेही भाजपच्याच सत्तेच्या काळात. त्यांच्याच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष टेबलावरून पैसे घेताना आढळले, तर संरक्षणाच्या कंत्राटासाठी तेव्हाच्या संरक्षणमंत्र्यांच्या घरातूनच केल्या गेलेल्या पैशाच्या थेट मागणीला कॅमेऱ्यात बंदिस्त केले गेले. समृद्धी होती, पण ती नेमकी कुणाची, असा प्रश्न पडावा, इतकी घसरगुंडी हरघडीला होत होती. नंतरच्या काळात सगळे भाजपवासी शहाणे झाले, असे म्हणावे तर तेही नाही. संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याबद्दल ज्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले, त्यांच्यातही पुन्हा भाजपच्या सदस्यांचे स्थान अग्रभागी. येत्या सार्वत्रिक निवडणुकीत पहिल्यांदाच संयुक्त पुरोगामी आघाडी विरुद्ध राष्ट्रीय लोकशाही आघाडी, अशी दोन आघाडय़ांमधली लढत होणार असल्याचे अडवाणींनी म्हटले आहे. मागल्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी अस्तित्वात असली तरी संयुक्त पुरोगामी आघाडीची निर्मिती निवडणुकांनंतरच झाली. आता अडवाणी स्वत:च्या ज्या आघाडीबद्दल म्हणत आहेत, ती निवडणुकांपर्यंत तशी राहते की नाही आणि संयुक्त पुरोगामी आघाडीची आताची अवस्थाही तशी राहते किंवा नाही, हे तरी कुणाला माहीत आहे. आपणच खरे धर्मनिरपेक्ष आहोत, काँग्रेसवाले ढोंगी धर्मनिरपेक्षतावादी आहेत, असे सांगायलाही त्यांनी कमी केले नाही, हे विशेष! त्यांनी रामनामाचा जप पुन्हा सुरू केल्याने आता राष्ट्रीय लोकशाही आघाडी टिकेलच अशी शक्यता नाही. जे काही उरले सुरले पक्ष या आघाडीच्या छत्राखाली आहेत, त्यांच्यात आतापासूनच चलबिचल सुरू झाली आहे. त्यांच्या आघाडीचे संयोजक जॉर्ज फर्नाडिस यांनी अलीकडेच आपल्या आघाडीशी उभा दावा मांडला आहे. ते स्वत: आणि त्यांचा पक्ष नेमके काय करतील, हे सांगता येणे अवघड आहे. निवडणुका जाहीर झाल्या की या पळापळीचे खरे स्वरूप स्पष्ट होईल. तरीही अडवाणी हे भाजपला भविष्यातला उगवता सूर्य म्हणणार असतील, तर म्हणोत बापडे, हे भविष्य नक्कीच नजिकच्या काळातले नाही. आपल्या पक्षाचे भविष्य त्यांना दिसत नाही म्हणून तर पुन्हा एकदा रामाला त्यांनी प्रचारात आणायचे ठरवले आहे. आपण सत्तेवर आल्यास अयोध्येत त्याच जागी राम मंदिर बांधू, अशी घोषणा राजनाथसिंह यांनी केली आहे. त्यांचा पक्ष पाच वर्षांपूर्वी सत्तेवर होता, तेव्हा त्यांना तिथे राम मंदिर बांधता का आले नाही? मंदिरासाठीची त्यांची आस्था आणि निष्ठा तेव्हा कुठे गेली होती? जरुर तर घटनादुरुस्ती करू, असे सांगणारे तेव्हा गप्प का होते? आपल्या आघाडीत काही नतद्रष्ट लोकांचा भरणा होता, त्यामुळे आपले हात बांधले गेलले होते, असेच जर त्यांना आता सांगायचे असेल तर मग आता हे सगळे त्यांच्या आघाडीत तरी नाहीत किंवा ते परतायची शक्यता नाही, असे त्यांना जाहीर करावे लागेल. योग्य त्या संधीची आपण वाट पाहात आहोत, असे राजनाथसिंह जरी म्हणाले असले तरी त्यांना ती मिळेल अशी शक्यता नाही, ‘मंदिर वहीं बनाएंगे’ किंवा ‘जय श्रीराम’ या घोषणांपलीकडे अडवाणींचा रथही फार पुढे जाईल, असे वाटत नाही. अडवाणींपुढे जी आव्हाने उभी आहेत, त्यात त्यांच्या पक्षातल्यांचे आव्हान मोठे आहे. त्यांच्यापैकी अनेकांना पंतप्रधानपदाचा हा मुकुट आपल्या डोक्यावर असण्यापेक्षा तो अडवाणींच्या डोक्यावर दिसता कामा नये, असे वाटते. मोदी यांनी अडवाणी हेच या पदासाठी लायक आहेत, असे म्हटले असले तरी प्रत्यक्षात त्यांनाही त्या जागेवर बसवू पाहणारे कमी नाहीत. कदाचित अडवाणींनी म्हणूनच मोदींना चुचकारले आहे. अडवाणींच्या विरोधात असणारे हे सगळे वाजपेयींच्याच गोटातले आहेत, असेही नाही. त्यांचे आणि वाजपेयींचे या विषयावर एकमत आहे. संघाने अडवाणींबद्दल धरलेला राग कमी झाला असला तरी तो त्यांनी सोडून दिलेला नाही. संघाची ताकद सद्य:स्थितीत कुणालाही निवडून आणण्याइतपत राहिलेली नसली तरी ती भाजप नेत्यांच्या पायात पाय घालण्याइतपत नक्कीच आहे. यावर अर्थातच बहुतेकांचे एकमत आहे. खुद्द भाजपच्या बडय़ा मंडळींचेही तेच मत आहे, म्हणून तर त्यांनी नागपूरचा हा आखाडा आपल्या बैठकीसाठी निश्चित केला. त्यांच्या चिंतनाचा हाही एक अर्थ आहे.