Leading International Marathi News Daily

सोमवार , ९ फेब्रुवारी २००९

दिवस ब्लफमास्टर्सचे..
निवडणुकांचे वेध लागले आहेत..पक्षा-पक्षांतल्या वाटाघाटींचा मोसम आहे..आपली ताकद फुगवून दाखवत जास्तीत जास्त जागा पदरी पाडून घेण्यासाठी मित्रपक्षांना गंडवू पाहणाऱ्या ब्लफमास्टर्सचे दिवस आहेत..
लोकसभा निवडणुकांपूर्वीच्या युतीच्या मोसमात वाटाघाटीत गुंतलेला प्रत्येक राजकीय पक्ष रामलिंगम राजूने फुगविलेल्या आकडय़ांप्रमाणे आपली ताकद फुगवून दाखवत जास्तीत जास्त जागा पदरी पाडून घेण्यासाठी मित्रपक्षांना गंडविण्याच्या प्रयत्नात आहे. निवडणुकांच्या मैदानात उतरण्यापूर्वी काँग्रेस, भाजप वा अन्य कोणत्या आघाडीत सामील होणे सोयीची ठरेल, याची चाचपणी प्रत्येक पक्ष आपापल्या परीने करतो आहे. हिंदूुत्व आणि धर्मनिरपेक्षता या मुद्यांवरून देशात झालेल्या राजकीय ध्रुवीकरणामुळे अनेक पक्षांना काँग्रेस किंवा भाजपशी युती करणे शक्य नाही, पण आता त्यांना आपल्या मित्रपक्षांची साथ देणे कठीण झाले आहे. या घुसमटीचा ताण युतीतील बडय़ा पक्षांना सहन करणे भाग पडत आहे.
आपल्या अवास्तव ताकदीच्या थापा मारून मित्रपक्षांच्या व्होट बँकेवर डल्ला मारण्याचा प्रयत्न केवळ राजकीय पक्षांनीच चालविलेला नाही, तर लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर अनेक पक्षांमधील ‘ब्लफमास्टर्स’ आपले नेतृत्व पुढे दामटून स्वतच्या पक्षाची व्होट बँक एन्कॅश करण्यासाठी सरसावले आहेत. त्याची जाणीव त्यांच्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांनाही आहे. दोन पक्षांमधील वाटाघाटीला राजकीय कूटनीतीचे स्वरूप आले आहे, तर पक्षांतर्गत कुरघोडीला कुटिलनीतीचे. एकाचवेळी प्रतिस्पर्धी पक्ष, युती करणारे मित्रपक्ष आणि पक्षांतर्गत काडीबाज यांचे मनसुबे उधळण्यासाठी लागणारा अष्टावधानीपणा सर्वच पक्षप्रमुखांना बाळगावा लागणार आहे. हे चित्र जवळपास प्रत्येकच राज्यात दिसत आहे. ताकदीने लहान असलेला पक्ष आपल्या बडय़ा पक्षाची आणि व कुवतीने छोटा असलेला नेता आपल्या मोठय़ा नेत्याची परीक्षाच घेतो आहे. या परीक्षेत जे उत्तीर्ण होतील, त्यांनाच मतदारांच्या अंतिम कसोटीला सामोरे जाणे शक्य होणार आहे. समजा, या परीक्षेत नशिबाने साऱ्याच राजकीय ब्लफमास्टर्सची साथ दिली तर? मग देशाचे काही खरे नाही, असेच म्हणावे लागेल.
लोकसभा निवडणुकांची औपचारिक घोषणा व्हायला जवळजवळ तीन आठवडे शिल्लक आहेत. तोपर्यंत एकमेकांचे पाय ओढण्याची ही अदृश्य अशी राजकीय स्पर्धा शिगेला पोहोचलेली असेल. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील पहिल्या, भाजपच्या नेतृत्वाखालील दुसऱ्या आणि डाव्यांच्या नेतृत्वाखालील तिसऱ्या आघाडीत सध्या आपला राजकीय स्वार्थ साधून घेण्यासाठी एकमेकांचे पाय ओढणारे ‘खेकडे’ अतिसक्रिय झाले आहेत. मे महिन्यानंतर उगवणाऱ्या राजकीय भवितव्याची पायभरणी करण्याची हीच सर्वात उपयुक्त वेळ असल्याचे या धूर्तानी पुरेपूर हेरले आहे.
निवडणुकांचा बिगुल वाजण्यापूर्वी अशा संधीसाधूपणाचे व दबावतंत्राचे प्रयोग सर्वत्र अतिशय ‘खेळीमेळी’च्या वातावरणात आणि ‘सभ्य’ भाषेत सुरू आहेत. निवडणुकांची घोषणा होताच या खेळीमेळीची जागा गळेकापू स्पर्धा घेईल आणि सभ्य भाषेच्या जागी अश्लाघ्य आरोप व अर्वाच्य शब्दांना उधाण येईल. सत्ताधारी काँग्रेस आघाडीला ग्रहण लावण्यासाठी युपीएतील काही घटक पक्ष पुढे सरसावले आहेत. त्यांचे दुर्दैव एवढेच की सध्या प्रतिस्पर्धी भाजप-रालोआच्या आघाडीचे भविष्य म्हणावे तसे उज्ज्वल दिसत नाही. पण त्यामुळे काँग्रेसचे मित्र म्हणविणारे निराश झालेले नाही. निवडणुकांनंतर ऐनवेळी एकत्र येणाऱ्या अनामिक तिसऱ्या आघाडीच्या समीकरणांकडे त्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. संख्याबळ हा मे महिन्यातील परवलीचा शब्द ठरणार असल्यामुळे आज आपल्या सहकारी पक्षाच्या वा नेत्याच्या राजकीय मजबुरीचा फायदा उठविण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करीत आहे.
महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे साहेब गेल्या दोन दशकांपासून जोपासलेले पंतप्रधानपदाचे स्वप्न काँग्रेसच्या जिवावर प्रत्यक्षात उतरविण्याच्या उद्देशाने अंतिम कूटनीतीसाठी सज्ज झाले आहेत. पण सत्तेच्या स्पर्धेतील मुख्य प्रतिस्पर्धी भाजपला लागलेल्या गळतीमुळे उत्साहित झालेल्या काँग्रेसपुढे त्यांचे मांडे मनातल्या मनातच जिरू पाहात आहेत. महाराष्ट्रात कसेही करून काँग्रेसकडून लोकसभेच्या किमान २४ जागा लाटण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. २००४ साली झालेल्या जागावाटपावरून युपीएच्या अन्य पक्षांमध्ये विशेष चर्चाही नाही. पण पंतप्रधानपद मिळविण्याची हीच सुवर्णसंधी आहे, याची कल्पना असल्यामुळे साहेब काँग्रेसवर पूर्ण दबाव आणण्याच्या मनस्थितीत आहेत. लोकसभा निवडणुकांच्या वेळी आयपीएलची दुसरी आवृत्ती सुरू करून राहुल गांधींच्या तरुण नेतृत्वाला क्रिकेटच्या लोकप्रियतेद्वारे आव्हान देण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. पाच वर्षांपूर्वी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी अशा दबावतंत्राला बधल्याही असत्या आणि राज्यात राष्ट्रवादीची ‘वाढलेली’ ताकद त्यांनी मान्यही केली असती. पण आता तशी स्थिती राहिलेली दिसत नाही. साहेब आणि त्यांच्या महत्त्वाकांक्षेच्या आड राहुल गांधी फॅक्टर येण्याची शक्यता आहे. आज राहुल गांधींचा शब्द सोनिया गांधी यांच्याइतकाच प्रभावी व निर्णायक ठरू लागला आहे. काँग्रेसच्या दीर्घकालीन उद्देशात मित्रपक्षांचा अडथळा उद्भवणार असेल तर त्यांच्याविरोधात नुकसान पत्करून ‘विध्वंसक’ राजकारण करण्याची तयारी ठेवली पाहिजे, असा इशारा राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत दिला आहे. अशा स्थितीत २४-२४ म्हणजे फिफ्टी-फिफ्टीची मागणी अमान्य झाली तर साहेबांच्या पक्षाला त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी राज्यात स्वबळावर ट्वेंटी-२० ची निवडणुकीची आयपीएल खेळण्याची तयारी ठेवावी लागेल. आपल्याला काँग्रेस कधीही पंतप्रधान होण्यासाठी पाठिंबा देणार नाही, याची शरद पवार यांना कल्पना आहे. त्यामुळे काँग्रेसशी निवडणूकपूर्व युती करून जास्तीत जास्त जागाजिंकायच्या आणि इतर मतदारसंघांमध्ये शिवसेनेला मदत करायची. निकालानंतर शिवसेनेला सोबत घेऊन शक्यतोवर राज्यातच ३०-३५ चा आकडा गाठायचा, असे साहेबांचे गणित आहे. निवडणूक निकालानंतर याच आकडय़ाच्या जोरावर काही छोटय़ा पक्षांना वश करून ५० च्या आकडय़ापर्यंत जायचे आणि मग डावे पक्ष, जयललिता, चंद्राबाबू नायडू, मायावती यांना सोबत घेऊन पंतप्रधानपदाची खुर्ची पटकावयाची, असे त्यांचे डावपेच आहेत. या रणनीतीत त्यांना शिवसेनेची मदत होऊ शकते. कारण गेल्या दहा वर्षांपासून सत्तेत नसलेली शिवसेना भाजपला ‘कंटाळली’ आहे. भाजप राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे अन्य गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, हिमाचल, उत्तराखंडमधील स्वबळावरील सत्तेमुळे भाजपवर उपासमारीची वेळ येणार नाही. पण केवळ मुंबई महापालिकेच्या जोरावर आता शिवसेना आणखी पाच वर्षे राज्यात विरोधी पक्षाचे राजकारण करू शकणार नाही. त्यामुळेच शिवसेनेने अधिक जागांची मागणी करीत, बेळगाव सीमाप्रश्नावर आक्रमक भूमिका घेत भाजपवर मुद्दाम दबाव आणायला सुरुवात केली आहे. पण याचा अर्थ साहेबांच्या पक्षाशी शिवसेनेचे सूत जमेलच, असेही नाही. त्यासाठी शिवसेनेशी उघड युती करण्याची िहमत राष्ट्रवादीला दाखवावी लागेल. त्यामुळे पक्षात फूट पडेल आणि काँग्रेसच्या जिवावर जमविलेले धर्मनिरपेक्ष मतांचे संचितही गमावावे लागेल. राष्ट्रवादीशी युती तुटल्यास राहुल गांधी म्हणतात त्याप्रमाणे लोकसभेच्या सर्व ४८ किंवा विधानसभेच्या सर्व २८८ जागा लढवून काँग्रेसला विध्वंसक राजकारण खेळण्याची संधी मिळेल. सर्वत्र अस्तित्व असलेल्या काँग्रेसला तिरंगी किंवा शिवसेना-भाजपमधील बेदिली लक्षात घेता चौरंगी लढतीत १९९९ पेक्षा अधिक संधी असेल. जागावाटपाचे २४-२४ चे सूत्र मान्य झाले नाही तर साहेब ही जोखीम पत्करतील काय? असा धोका पत्करण्यापेक्षा काँग्रेसशी युती करून नंतर त्यांच्या जागा पाडण्याचा सोपा पर्याय त्यांच्यापुढे असेल. पक्षाचा उमेदवार नसलेल्या लोकसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना काँग्रेसचे उमेदवार पाडून साहेबांची पंतप्रधानपदाची खुर्ची बळकट करण्याचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे लागणार आहे. पण राष्ट्रवादीचे उमेदवार असलेल्या मतदारसंघांमध्ये काँग्रेसजनही हा उद्योग सहज करू शकतात. शिवाय आपलाच उमेदवार पाडण्याचा दीर्घ अनुभव असलेल्या काँग्रेसजनांना हा खेळ मुळीच अवघड नाही. ब्लॅकमेल करणाऱ्या मित्रपक्षांना धडा शिकविण्याचे राहुल गांधींचे आक्रमक इरादे एव्हाना त्यांच्यापर्यंत पोहोचलेले असतील. राहुल गांधींचा इशारा उत्तर प्रदेशात काँग्रेसशी सुरू असलेल्या जागावाटप चर्चेत अडथळा आणणाऱ्या समाजवादी पार्टीच्याही ब्लफमास्टर्सनाही उद्देशून आहे. सध्या राजकारणातील ब्लफमास्टर्सची चलती आहे.
लालूंना खोडा घालण्यासाठी रामविलास पासवान यांना बिहारमध्ये युपीएचे नेतृत्व करण्याची इच्छा झाली आहे. आपण दलित पंतप्रधानाचे समर्थन करू, असे म्हणत त्यांना लालूंनीही तेवढय़ाच धूर्तपणे उत्तर दिले आहे. मनमोहन सिंग यांची जागा घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्रणव मुखर्जी व अर्जुन सिंहांना सोनिया गांधींनी काँग्रेसच्या मासिकातून ‘संदेश’ दिला आहे. भाजपचे चाणक्य म्हणून आपले वलय निर्माण करणारे अरुण जेटली हे अडवाणींच्या वृद्ध नेतृत्वावर होणाऱ्या शरसंधानामागची प्रेरणा असल्याचा आरोप पक्षाच्या वर्तुळात करण्यात येत आहे. पण भावी पंतप्रधान होण्याची तसेच पक्षाचे नेतृत्व करण्याची प्रबळ इच्छा बाळगणारे जेटली लोकसभा निवडणूक लढण्याचे आव्हान स्वीकारू शकलेले नाहीत. केरळचे मुख्यमंत्री अच्युतानंदन यांनी त्यांचे पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी पी. विजयन यांना लक्ष्य करून माकपमध्ये वादंग निर्माण केले आहे. पण पक्षांतर्गत मतभेदांनी माकप पोखरून निघत असतानाही प्रकाश करात यांनी सपाचे ‘ब्लफमास्टर’ अमरसिंह यांचा मैत्रीचा हात झिडकारला. अमरसिंहांची थापेबाजी मुलायमसिंहांच्याही अंगलट येऊ लागलेली आहे. मायावतींनी केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये बसपाला जागा मागून करातांच्या तिसऱ्या राजकीय पर्यायाची बोलणी सुरू होण्याआधीच खुंटविली आहे. निवडणुकांनंतर पुन्हा डाव्यांशी हातमिळवणी करणार नाही, या अटीवरच ममता बॅनर्जींना पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसशी युती करायची आहे. काँग्रेसचे ब्लफमास्टर्स त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. नाराज होण्यास फारसा वाव नसतानाही निवडणुका जवळ येत असताना करुणानिधींचा रुसवा वाढत चालला आहे. भाजपला मुठीत ठेवण्यासाठी नितीशकुमार, नवीन पटनायक, प्रकाशसिंग बादल विविध क्लृप्त्यांचा अवलंब करीत आहेत. निवडणुकांच्या रणांगणात उतरण्याची वेळ होईपर्यंत राजकारणातील हा ‘सत्यम’चा आविष्कार सुरूच राहणार आहे.
सुनील चावके