Leading International Marathi News Daily

सोमवार , ९ फेब्रुवारी २००९

राष्ट्रवादीसह काँग्रेसच्या पापाचा घडा फोडा -उद्धव ठाकरे
सातारा, ८ फेब्रुवारी/प्रतिनिधी

काँग्रेस व राष्ट्रवादीने चार वर्षे नुसत्या खुच्र्या उबवल्या. निवडणुका येताच त्यांना बचत गटाच्या महिला दिसतात, सहावा वेतन आयोग कर्मचाऱ्यांना दिला जातो, जनतेने या लबाड लांडग्यांना फसू नये, त्यांच्या पापाचा घडा भरला आहे. तो फोडून शिवसेनेचा भगवा फडकवा, असे आवाहन शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केले. प्रमुख शत्रू राष्ट्रवादी आहे. त्याच्यासोबतच काँग्रेसचा कोथळा बाहेर काढायचा आहे. राष्ट्रवादीला संपवून सातारा शिवसेनेचा अजिंक्यतारा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शिक्षकांनी उपेक्षित समाजाची दखल घ्यावी -शरद पवार
सातारा, ८ फेब्रुवारी/प्रतिनिधी

सातारा जिल्हा परिषदेतर्फे सातारा येथे शनिवारी झालेल्या जिल्ह्य़ातील प्राथमिक, माध्यमिक शिक्षक आणि गुणवंतांच्या गौरव सोहळ्यात बोलताना केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार. व्यासपीठावर गृहमंत्री जयंत पाटील, केंद्रीय मंत्री पृथ्वीराज चव्हाण, महसूलमंत्री पतंगराव कदम, जलसंधारण मंत्री रामराजे नाईक- निंबाळकर, खासदार श्रीनिवास पाटील आदी. शिक्षणाचा केंद्रबिंदू शिक्षक आहे. त्याकडे दुर्लक्ष नको. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे. मात्र शिक्षकांनी आपल्यापेक्षा उपेक्षित समाज बाहेर आहे, याची दखल घ्यावी. शिक्षणाबाबतची आस्था यत्किंचितही कमी होणार नाही, यासाठी बांधिलकी जपावी, असे आवाहन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी येथे केले.

सोलापूर महोत्सवास आजपासून प्रारंभ
सोलापूर, ८ फेब्रुवारी/प्रतिनिधी

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि सोलापूर जिल्हा प्रशासन यांच्यावतीने येत्या ९ ते ११ फेब्रुवारीपर्यंत होणाऱ्या तिसऱ्या सोलापूर महोत्सवाची तयारी पूर्ण करण्यात आली असून उदित नारायण यांच्या संगीत रजनी कार्यक्रमाने या महोत्सवाचा शुभारंभ तर सारेगमपचे लिटिल चॅम्प्सच्या कार्यक्रमाने या महोत्सवाची सांगता होणार आहे.पार्क मैदानावर येत्या ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.४५ वाजता या महोत्सवाचे उद्घाटन जिल्ह्य़ाचे पालकमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते आणि ग्रामविकास राज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

इंदिरा गांधी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये उद्या प्रयोगशाळा व कार्यशाळेचे उद्घाटन
सोलापूर, ८ फेब्रुवारी/प्रतिनिधी

कै. सुशीलाताई गायकवाड बहुउद्देशीय संस्था संचलित भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या संस्थेतील नवीन संगणक प्रयोगशाळा, अद्ययावत यांत्रिकी कार्यशाळेचे उद्घाटन आणि नवीन ग्रंथालय इमारतीचा पायाभरणी समारंभ येत्या १० फेब्रुवारी रोजी होणार आहे.

विनापरवाना स्फोटके नेणाऱ्यांना अटक
सांगली, ८ फेब्रुवारी / प्रतिनिधी

जीपमधून विनापरवाना स्फोटके घेऊन जाणाऱ्या तिघा तरूणांना पलूस पोलिसांनी जुना सातारा रस्त्यावरील आंधळी फाटय़ानजीक अटक केली. या तिघांकडून एक लाख रूपये किमतीच्या ५५ जिलेटिन कांडय़ा, डिटोनेटर, कॉम्प्रेसर मशिन व स्फोट घडवून आणणाऱ्या बॅटऱ्या असे साहित्य हस्तगत केले आहे. अटक करण्यात आलेल्यात विठ्ठल भानुदास जाधव (रा. आंधळी), सुरेश गणपती पडिवार (सावंतपूर) व राजेंद्र मधुकर पोतदार (रा. पलूस) या तिघांचा समावेश आहे. आज सकाळी काही तरूण स्फोटके विनापरवाना घेऊन जाणार असल्याची माहिती पलूस पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक चव्हाण यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या नेतृत्वाखालील पोलीस हेडकॉन्स्टेबल बळीराम घुळे व सतीश माने यांच्या पथकाने जुना सातारा रस्त्यावरील आंधळी फाटय़ानजीक तपासणी केली असता विठ्ठल जाधव, सुरेश पडिवार व राजेंद्र पोतदार हे तिघेजण जीप (क्रमांक एमजीएच ८५२७) मधून विनापरवाना स्फोटके घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले. या तिघांकडून एक लाख रूपये किमतीच्या ५५ जिलेटिन कांडय़ा, डिटोनेटर, कॉम्प्रेसर मशिन व स्फोट घडवून आणणाऱ्या बॅटऱ्या असे साहित्य हस्तगत करण्यात आले. या प्रकरणी पलूस पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली असून अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सुहास काळे करीत आहेत.

सोलापुरात ७५ अपंगांवर मोफत शस्त्रक्रियेचा उपक्रम
सोलापूर, ८ फेब्रुवारी/प्रतिनिधी

मेसॉनिक लॉज जस्टिस व पीस या संस्थेच्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त सोलापुरात ७५ अपंग मुलांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती लॉजचे सोलापूरचे अध्यक्ष डॉ. शेखर चिडगुपकर यांनी दिली. मेसॉनिक लॉज जस्टिस व पीस, सोलापूर आणि के.ई.एम. हॉस्पिटल अ‍ॅन्ड रिसर्च सेंटर, पुणे यांच्यावतीने अपंगत्व निवारण शस्त्रक्रिया शिबिराचे औपचारिक उद्घाटन येत्या १९ फेब्रुवारी रोजी चिडगुपकर हॉस्पिटल (सम्राट चौक) येथे डोराब बाजान (जबलपूर) यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. येत्या ७ ते १७ फेब्रुवारीपर्यंत दररोज सकाळी १० ते १२ पर्यंत चिडगुपकर हॉस्पिटल येथे ० ते १४ वर्षे वयोगटातील अपंग मुलांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यामधील गरजू मुलांची शस्त्रक्रिया त्यांची वेळ ठरवून करण्यात येईल. ही शस्त्रक्रिया व औषधोपचार मोफत असल्याचे त्यांनी सांगितले. ही शस्त्रक्रिया इम्पॅक्ट फाउंडेशन या संस्थेच्या मदतीने करण्यात येणार आहे. जन्मतच अपंग व पोलिओसारख्या रोगामुळे अधू झालेल्या रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. चिडगुपकर यांनी केले.

कुटुंब व्यवस्था टिकवली पाहिजे - न्या. नेरे
फलटण, ८ फेब्रुवारी/वार्ताहर

कायद्याचा दुरुपयोग झाल्याने समाज व्यवस्था बिघडते, त्यामुळे नैतिकतेवर आधारित समाज टिकविण्यासाठी समाजाबरोबरच कुटुंब व्यवस्था सुधारली पाहिजे असे प्रतिपादन दिवाणी न्यायाधीश चंद्रमोहन मोरे यांनी केले. साखरवाडी (ता. फलटण) येथे फलटण तालुका विधी सेवा समिती, विधिज्ञ संघ फलटण व साखरवाडी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम योजनेंतर्गत विधी साक्षरता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी सहदिवाणी न्यायाधीश नयोमी कररा व देवानंद सूर्यवंशी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयसिंह जाधव, फलटण वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. बी. एम. शिंदे, सरपंच कौशल्या पवार, माजी सभापती शंकरराव माडकर आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांची भाषणे झाली. तसेच साखरवाडी ग्रामपंचायत निर्मलग्राम झाल्याबद्दल व गावाला तंटामुक्त गाव पुरस्कार मिळाल्याबद्दल या मोहिमेत सहभागी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

मिरजेत येत्या गुरुवारी बेरोजगार कर्ज मेळावा
मिरज, ८ फेब्रुवारी / वार्ताहर

सुशिक्षित बेरोजगार युवा संघटनेच्या वतीने गुरुवार दि. १२ फेब्रुवारी रोजी मिरज येथे कर्ज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. रंगशारदा सभागृहात होणाऱ्या या मेळाव्यास जिल्हा उद्योग केंद्रासह विविध शासकीय महामंडळांचे अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. जिल्हाध्यक्ष महादेव दबडे यांनी या मेळाव्याचे संयोजन करीत असताना बेरोजगारांना स्वयंरोजगाराचे उद्दिष्ट डोळय़ांसमोर ठेवल्याचे सांगितले. कर्जप्रकरण, प्रकल्प अहवाल कसे तयार करायचे, उद्योगाची निवड कशी करायची, याची प्राथमिक माहिती तज्ज्ञांकडून या मेळाव्यात दिली जाणार आहे. खादी ग्रामोद्योग, संत रोहिदास महामंडळ, वसंतराव नाईक विकास महामंडळ, महात्मा फुले महामंडळ व अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ आदींचे जिल्हा व्यवस्थापक या मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय मिरज पंचायत समितीचे सभापती अनिल आमटवणे, सदस्य बाळासाहेब होनमोरे, उपमहापौर शेखर इनामदार यांच्यासह अनेक पदाधिकारी या मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत.

शाहीर ईश्वरा धुळुबुळु यांचे निधन
मिरज, ८ फेब्रुवारी / वार्ताहर

जुन्या पिढीतील ख्यातनाम शाहीर भेदिक गायक ईश्वरा कृष्णा धुळुबुळु यांचे रविवारी पहाटे निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. मराठीतील प्रथितयश कवी व यंदाच्या औदुंबर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भीमराव धुळुबुळु यांचे ते वडील होत. ईश्वरा धुळुबुळु यांनी महात्मा गांधी यांच्या दारूबंदी चळवळीवर गाणी लिहून त्याचे गावागावांत सादरीकरण केले होते. प्रारंभीच्या काळात ते प्रसिद्ध मल्लही होते. तत्कालीन पटवर्धन सरकारने त्यांना पदक देऊन त्यांचा गौरव केला होता. मिरज नगरपालिका व सांगली महापालिकेनेही त्यांचा सन्मान केला होता. शाहीर म्हणून त्यांची मिरज शहर व तालुक्यात ख्याती होती. महाराष्ट्र साहित्य परिषदेनेही त्यांच्या लोककलेचा यथोचित गौरव केला होता. सांगलीचे माजी महापौर विजय धुळुबुळु हे त्यांचे पुतणे होत. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

डॉ. ए. व्ही. मोहोळकर यांना कोरियातील शिष्यवृत्ती
कोल्हापूर, ८ फेब्रुवारी / प्रतिनिधी

येथील गोपाळ कृष्ण गोखले महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. ए. व्ही. मोहोळकर यांची केंद्र सरकारच्या सायन्स व टेक्नॉलॉजी या विभागामार्फत कोरिया येथील चन्नम नॅशनल युनिव्हर्सिटी येथे संशोधन करण्यासाठी बॉईजकॉस्ट या शिष्टवृत्तीसाठी निवड झाली आहे. देशभरातून ७३ तरुण शास्त्रज्ञांची या शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे. महाराष्ट्रातून दोन शास्त्रज्ञ निवडले असून त्यापैकी डॉ. मोहोळकर हे एक आहेत. दक्षिण कोरिया येथे प्राध्यापक डॉ. जे. एच. किम या जगद्विख्यात शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ते एक वर्ष संशोधन करणार आहेत. डॉ. मोहोळकर गेली १५ वर्षे फिजिक्स या विषयाचे प्राध्यापक म्हणून गोपाळ कृष्ण गोखले महाविद्यालयात कार्यरत आहेत. त्यांनी केलेल्या संशोधनावर १७ शोधनिबंध आंतरराष्ट्रीय मासिकांमधून प्रसिद्ध झाले असून त्यांनी २० आंतरराष्ट्रीय कार्यशाळांमध्ये भाग घेतलेला आहे. महाविद्यालयीन स्तरावर शिवाजी विद्यापीठ क्षेत्रामध्ये प्रथमच त्यांनी यूजीसीचा रीसर्च प्रोजेक्ट पूर्ण केला आहे.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी हे यश मिळविलेले आहे.

कोल्हापूर जिल्हाधिकारीपदी लक्ष्मीकांत देशमुख यांची नियुक्ती
कोल्हापूर, ८ फेब्रुवारी / विशेष प्रतिनिधी

क्रीडा व युवक सेवा संचलनालयाचे संचालक लक्ष्मीकांत देशमुख यांची कोल्हापूरचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीचे आदेश शनिवारी सायंकाळी प्राप्त झाले. कोल्हापूरसारख्या शाहूंच्या नगरीत आपणाला काम करण्याची संधी मिळणे हा आपला सन्मान आहे, असे मनोगत व्यक्त करणारे देशमुख सोमवारी आपल्या पदाची सूत्रे हाती घेणार आहेत. लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू झाल्याने जे अधिकारी स्वत:च्या गावात अथवा शहरात कार्यरत आहेत, अशा अधिकाऱ्यांची बदली अन्यत्र करण्यात येते आहे. गतसप्ताहात नायब तहसीलदारांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. यापाठोपाठ आता जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्याही झाल्या आहेत.

विवाहितेची मुलींसह आत्महत्या
इचलकरंजी, ८ फेब्रुवारी/वार्ताहर

दानोळी (ता. शिरोळ) येथील विवाहितेने आजारास कंटाळून दोन मुलींसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. राजश्री नागेश संकपाळ (वय ३०), सोनाली नागेश संकपाळ व निकिता नागेश संकपाळ (वय ३) अशी त्यांची नावे आहेत. शनिवारी दुपारी आत्महत्येचा प्रकार घडला असला तरी सायंकाळनंतर अंधार पडल्याने शोध मोहीम पुढे चालविता आली नाही असे जयसिंगपूर पोलिसांनी सांगितले. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, की नागेश संकपाळ हा दानोळी गावामध्ये पारंपरिक नाभिक व्यवसाय करतो. १४ वर्षांपूर्वी त्याचा विवाह हरिपूर (ता. मिरज) येथील राजश्रीशी झाला होता. त्यांना सोनाली व निकिता अशा दोन मुली आहेत. सोनाली ही केंद्रीय कन्या शाळेत चौथीत निर्माता ही अंगणवाडीत शिकते.

माधुरी सोनवालकर ‘डी.एड.’ परीक्षेत प्रथम
फलटण, ८ फेब्रुवारी/वार्ताहर

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था फलटण येथील माधुरी काशिनाथ सोनवालकर हिने द्वितीय वर्ष डी.एड. परीक्षेमध्ये ८५.७७ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचा प्रथम वर्षांचा निकाल ९६.८४ टक्के लागला असून द्वितीय वर्षांचा निकाल १०० टक्के लागला आहे. द्वितीय वर्ष डी.एड.मध्ये माधुरी सोनवलकर हिने प्रथम मंजुषा मोहन पवार हिने द्वितीय तर दीपाली बाळासो घोरपडे हिने तृतीय क्रमांक पटकाविला आहे.प्रथम वर्ष डी.एड.मध्ये आरती नामदेव भोसले हिने प्रथम, धनश्री हरिदास पिसे हिने द्वितीय दीपाली उत्तम बनकर हिने तृतीय क्रमांक पटकाविला आहे.

धनगर समाजाचा आज मोर्चा
फलटण, ८ फेब्रुवारी/वार्ताहर

समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळावे या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य धनगर समाज आरक्षण कृती समिती मार्फत फलटण उपविभागीय कार्यालयावर सोम. दि. ९ फेब्र. रोजी सकाळी ११ वा. मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कर्नाटक राज्याचे धनगर समाजाचे अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, निवृत्त आयपीएस अधिकारी मधुकरराव शिंदे यांचे मार्गदर्शन होणार आहे.रेणके आयोगाने केलेल्या शिफारशीची अंमलबजावणी करावी, सोलापूर विद्यापीठास पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकरांचे नाव देण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात येणार आहे.

सोनाबाई पाटील यांचे निधन
सांगली, ८ फेब्रुवारी / प्रतिनिधी

सांगलीवाडी येथील श्रीमती सोनाबाई तुकाराम पाटील (वय ९०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार दिनकर पाटील यांच्या त्या मातोश्री होत. श्रीमती सोनाबाई पाटील यांच्यावर शनिवारी रात्री उशिरा सांगलीवाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आर. आर. पाटील, आमदार हाफिज धत्तुरे, महापौर मैनुद्दीन बागवान, स्थायी समितीचे सभापती हरिदास पाटील, सभागृहनेते सुरेश आवटी, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती वैभव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष नगरसेवक इद्रिस नायकवडी, प्रा. नितीन सावगावे, दादासाहेब लांडगे, शीतल पाटील, नंदकुमार देशमुख, किरण सूर्यवंशी, धनंजय सूर्यवंशी, शहाजी कोकरे, प्रमोद सूर्यवंशी, राजेश नाईक, संतोष देवळेकर, राजू गवळी, पृथ्वीराज पवार, विजय हाबळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ताजुद्दीन तांबोळी व मिरज तालुकाध्यक्ष राजू पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. श्रीमती सोनाबाई पाटील यांच्या पश्चात तीन मुलगे, पाच मुली, सुना, जावई व नातवंडे असा मोठा परिवार आहे.