Leading International Marathi News Daily                               सोमवार , ९ फेब्रुवारी २००९
राज्य

प्रादेशिक

विविध

क्रीडा

अग्रलेख

लाल किल्ला

लोकमानस

व्यक्तिवेध

राशिभविष्य

प्रतिक्रिया

मागील अंक

वृत्तांत


निवडणुकांचे पडघम वाजायला सुरूवात झाली आहे..
उमेदवारांच्या नावांचे झेंडे देखील फडकायला लागले आहेत..
कालचे 'घरभेदे' उद्याचे 'आधारस्तंभ' भासायला लागले आहेत..
जातीपातींची नवी समीकरणे आकाराला येऊ लागली आहेत..
एकीकडे विद्यमान आघाडय़ा बिघडायला लागल्या आहेत,
तर दुसरीकडे नव्या आघाडय़ा जन्म घेताना दिसू लागल्या आहेत..
आघाडी कितवी म्हणावी..
तिसरी, चौथी, पाचवी... की दहावी..
असा प्रश्न पडावा, असं सभोवतालचं वातावरण आहे..
वाट पाहिली जात्येय ती फक्त निवडणूक आयोगाकडून घोषणा होण्याची..
बदलत्या लोकसभा मतदारसंघ क्षेत्रांचा वेध आम्ही वर्षभर घेतोच आहोत..
पण आता आम्हाला हवा आहे, तुमचा अंदाज..
तो सुद्धा तीन सोप्या प्रश्नांच्या उत्तरांमधून..
तुम्ही इतकंच करायचं..
सोबतच्या तीन प्रश्नांची उत्तरं लिहिलेलं कुपन आमच्याकडे लगेच भरून पाठवायचं..
अचूक उत्तरांना बक्षिसं आहेतच..
(कुपन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा)

लंकेने अडविला भारताचा अश्वमेध! संगकारा सामनावीर तर युवराज मालिकावीर
कोलंबो, ८ फेब्रुवारी / वृत्तसंस्था

श्रीलंकेने अखेर मालिकेत दिलासा देणारा विजय मिळवला आणि भारताविरुद्ध एकदिवसीय मालिकेत ५-० ने मानहानीकारक पराभव टाळला. श्रीलंकेने आज शेवटच्या लढतीत ६८ धावांनी मिळवलेल्या विजयासह प्रतिष्ठा कायम राखत भारताची सलग नऊ विजयांची मालिकाही त्यांना खंडित करता आली. मालिकेत प्रथमच नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेने तिलकरत्ने दिलशान व कुमार संगकाराच्या तडाखेबंद फलंदाजीच्या जोरावर ५० षटकांत ८ बाद ३२० धावा उभारल्या आणि भारताचा डाव ४८.५ षटकात २५२ धावांवर संपुष्टात आणला. मंगळवारी होणाऱ्या एकमेव ट्वेन्टी-२० सामन्याने भारताच्या श्रीलंका दौऱ्याची सांगता होणार आहे. भारतीय संघाने या लढतीपूर्वीच मालिकाजिंकली होती पण, या पराभवामुळे निर्भेळ यश संपादन करून आणखी एक नवा पराक्रम करण्याचे पाहुण्या संघाचे मनसुबे उधळले गेले. पाच एकदिवसीय सामन्यांच्या या मालिकेत अखेर भारताला ४-१ ने समाधान मानावे लागले.

कार्तिकीदेवींचा विजय असो..
मुंबई, ८ फेब्रुवारी / प्रतिनिधी

एकीकडे झी सारेगमपच्या पाचही लिट्ल चॅम्प्सना विजयी करणार असल्याची जोरदार हवा तर दुसरीकडे कोण पुढे आहे हे शेवटपर्यंत न सांगून आयोजकांनी वाढविलेली उत्सुकता शिगेला पोहोचलेली असतानाच आळंदीच्या कार्तिकी गायकवाडची अंतिम विजेता म्हणून घोषणा करण्यात आली आणि गेल्या सहा महिन्यांपासून रंगलेल्या लिटल चॅम्प्स सारेगमप स्पर्धेच्या एका महान पर्वाची सांगता झाली. कार्तिकीला दोन लाख रुपये तर प्रथमेश लघाटे, आर्या आंबेकर, रोहित राऊत आणि मुग्धा वैशंपायन या उपविजेत्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले. ..आणि अंतिम विजेती आहे कार्तिकी गायकवाड! ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांनी ही घोषणा केली आणि सर्व उपस्थितांनी एकच जल्लोष केला. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या झी मराठीवरील लिट्ल चॅम्प्स सारेगमप या स्पर्धेची विजेती ठरली कार्तिकी गायकवाड.

भाजप दहशतवादाचे राजकारण करीत आहे; सोनिया गांधी यांचा आरोप
नवी दिल्ली, ८ फेब्रुवारी/खास प्रतिनिधी

प्रतिस्पर्धी भाजपवर दहशतवादाचे राजकारण करीत असल्याचे खापर फोडताना आज काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी दहशतवादाचा सामना करताना दाखविलेल्या संयमाला भारताचा कमकुवतपणा मानण्याची चूक करू नये, असा इशारा शेजारी राष्ट्रांना दिला. आज सकाळी रामलीला मैदानावर काँग्रेसच्या जिल्हा व ब्लॉक अध्यक्षांच्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन करताना सोनिया गांधी यांनी आगामी लोकसभा निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकले.

दहशतवादी हल्ल्याला मदत करणाऱ्यांवर अद्याप कारवाई का नाही; मोदींची केंद्रावर चौफेर टीका
नागपूर, ८ फेब्रुवारी / प्रतिनिधी

भारतातील मदतीविना मुंबईवर दहशतवादी हल्ला होऊ शकत नाही; अशी मदत करणाऱ्यांवर अद्याप कारवाई का केली नाही, असा खणखणीत सवाल करत, दहशतवाद्यांना त्यांच्याच भाषेत ठोस प्रत्युत्तर द्यावे लागेल, असे ठाम प्रतिपादन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले. लालकृष्ण अडवाणी यांच्याच नेतृत्वाखाली देशातील दहशतवाद संपवणे शक्य आहे, असा दावाही त्यांनी केला. राजकीय प्रस्तावावर केलेल्या घणाघाती भाषणात मोदी यांनी काँग्रेस व केंद्र सरकारवर चौफेर टीका केली. दहशतवादी हल्ला व केंद्राच्या धोरणावर तोफ डागत त्यांनी स्वपक्षावर होणाऱ्या टीकेला उत्तर देणारे मुद्दे उपस्थित केले.

रेल्वेचा अंतरिम अर्थसंकल्प १३ फेब्रुवारीला
नवी दिल्ली, ८ फेब्रुवारी / पी.टी.आय.

लोकसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव येत्या १३ फेब्रुवारीला संसदेत सादर होणाऱ्या अंतरिम रेल्वे अर्थसंकल्पात रेल्वे प्रवाशांसाठी विशेष सवलतींची घोषणा करण्याची शक्यता आहे. जागतिक तेल बाजारपेठेत तेलाच्या किंमतींनी उच्चांक गाठल्यानंतरही लालू प्रसाद यादव यांनी गेल्या चार रेल्वे अर्थसंकल्पात रेल्वे प्रवाशांवर भाडेवाढीचा कोणताही बोजा टाकलेला नाही. गेल्या महिनाभरात पेट्रोलजन्य पदार्थाच्या किंमतीत घट झाली आहे. शिवाय लोकसभा निवडणुकाही तोंडावर आल्याने प्रवाशांना जास्तीत जास्त दिलासा देणारा रेल्वे अर्थसंकल्प सादर करण्यावर लालूंचा भर राहील, अशीच चिन्हे आहेत. मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला लक्षात घेता रेल्वे प्रवाशांची सुरक्षा अधिक वाढवण्याची खबरदारी घेतली जाणार असून यात रेल्वे सुरक्षा दलातील रिक्त जागा भरणे आणि संवेदनशील रेल्वे स्थानकांवरील सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्याचा प्रस्ताव लालूंच्या विचाराधीन आहे.

वाजपेयी यांचा उपचाराला प्रतिसाद; अद्याप व्हेंटिलेटवरच
नवी दिल्ली, ८ फेब्रुवारी / पी.टी.आय.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती स्थिर असून ते उपचाराला योग्य प्रतिसाद देत असले तरी त्यांना अद्यापही व्हेंटिलेटवरच ठेवण्यात आल्याचे अखिल भारतीय आर्युविज्ञान संस्थेच्या डॉक्टरांनी आज सांगितले. वाजपेयी यांच्या प्रकृतीवर डॉक्टर २४ तास लक्ष ठेऊन असून त्यांच्या छातीतील कफ तसेच तापाचे प्रमाण कमी होत असल्याचे सांगण्यात आले. वाजपेयी यांची स्थिती गंभीर नसून ते सर्व उपचारांना योग्य प्रतिसाद देत आहेत तसेच त्यांचा यकृत आणि किडनीचे कार्य सामान्यपणे सुरू असल्याचे ‘एम्स’ च्या डॉक्टरंनी सांगितले. वाजपेयी यांना जंतुसंसर्गाचा त्रास होत असल्याने त्यावर मात करण्यासाठी जैविक प्रतिबंधक औषधे देण्यात आली आहेत त्याचा परिणाम येत्या दोन ते तीन दिवसात निश्चित दिसेल असा विश्वास डॉक्टरांनी व्यक्त केला. वाजपेयी यांना झालेला न्युमोनिया पूर्ण नाहीसा होण्याची आम्ही वाट पाहात असून त्यांनतर अन्य उपचारांचा विचार केला जाईल असे ते म्हणाले.

भेटी लागी जीवा..
महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस युतीचा नवा अध्याय!
संदीप प्रधान, मुंबई, ८ फेब्रुवारी

महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील युतीचा नवा अध्याय लिहिला जाण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या कालच्या भेटीने पडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेवरून भुजबळ १७ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर ‘मातोश्री’ची पायरी चढले.

‘नागपूर का संदेश, भाजप को जनादेश’
केंद्रात सत्ता आल्यास अफझल गुरुला फाशी

सर्वोच्च न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतरही त्याची अंमलबजावणी का होत नाही. केंद्रात भाजपची सत्ता आल्यास अफझल गुरुला १०० दिवसात फाशी देण्याची शिफारस राष्ट्रपतींना करू. रामराज्याची संकल्पना पूर्ण करायची असेल तर अयोध्येत राम मंदिर बांधावेच लागेल.

राणी चेनम्मा-एक्स्प्रेसचे आठ डबे घसरले
बंगळुरू, ८ फेब्रुवारी / पी.टी.आय.

बंगळुरूहून कोल्हापूरला जाणाऱ्या राणी चेनम्मा एक्स्प्रेसचे आठ डबे शनिवारी रात्री उशिरा रुळावरून घसरले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना हवेरीपासून जवळच असलेल्या देवारगुडा आणि ब्याडगी या दोन स्थानकांदरम्यान घडली. या रेल्वेचे दोन अनारक्षित ,प्रत्येकी दोन वातानुकुलित आणि तीन आरक्षित तसेच एक मालवाहू असे आठ डबे घसरले. घटनास्थळी रेल्वे तसेच पोलिसांनी धाव घेऊन प्रवाशांना या डब्यातून बाहेर काढले. सर्व प्रवाशांना विशेष बसने हुबळीमार्गे कोल्हापूरकडे रवाना करण्यात आले. दरम्यान या मार्गावरील अन्य गाडय़ा अन्यत्र वळविण्यात आल्या अथवा काही रद्द करण्यात आल्याचे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

पाकिस्तानचा अहवाल तयार; पाच जणांवर खटला?
नवी दिल्ली, ८ फेब्रुवारी/पी.टी.आय.

मुंबईत २६ नोव्हेंबर रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पुराव्यांवर पाकिस्तान सरकारने आपला अहवाल तयार केला असून उद्या त्याची छाननी होणार आहे. या हल्ल्याशी संबंधित कसाबसह पाचजणांविरुद्ध खटला चालविण्यात येणार असल्याचे वृत्त ‘जिओ’ वृत्तवाहिनीने दिले आहे.
पाकिस्तानी गृहखात्याच्या अहवालानुसार हल्ल्याचा कट भारत किंवा पाकिस्तानी भूमीवर रचला गेलेला नाही तर तो युरोपीय राष्ट्रात रचला गेलेला आहे आणि इंटरनेटच्या माध्यमातून कट-कारस्थानी परस्परांच्या संपर्कात राहिले. कसाबसह पाचजणांविरुद्ध पाकिस्तानात खटला चालविला जाणार असून पाकिस्तानी कायद्यानुसार त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल. खटला चालविण्यासाठी कसाबची भारताकडून मागणी केली जाणार आहे. मात्र या संदर्भात उद्या अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर निश्चित काय तो निर्णय घेतला जाणार आहे.

 

लोकसत्ता दिवाळी अंक २००८


प्रत्येक शुक्रवारी


दिवाळी २००८