Leading International Marathi News Daily                                 सोमवार , ९ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

भाजप दहशतवादाचे राजकारण करीत आहे; सोनिया गांधी यांचा आरोप
नवी दिल्ली, ८ फेब्रुवारी/खास प्रतिनिधी

प्रतिस्पर्धी भाजपवर दहशतवादाचे राजकारण करीत असल्याचे खापर फोडताना आज काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी दहशतवादाचा सामना करताना दाखविलेल्या संयमाला भारताचा कमकुवतपणा मानण्याची चूक करू नये, असा इशारा शेजारी राष्ट्रांना दिला. आज सकाळी रामलीला मैदानावर काँग्रेसच्या जिल्हा व ब्लॉक अध्यक्षांच्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन करताना सोनिया गांधी यांनी आगामी लोकसभा निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकले.
विरोधकांप्रमाणे काँग्रेस पक्ष दहशतवादाविरुद्धच्या लढय़ाचे राजकीय भांडवल करीत नाही. पण दहशतवादाला चालना देणाऱ्या देशांना सडेतोड उत्तर दिले जाईल, अशी आक्रमक भूमिका सोनिया गांधी यांनी घेतली. मुंबई आणि आसाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यांनी आम्ही किती गंभीर परिस्थितीतून वाटचाल करीत आहोत, याचे स्मरण करून दिले आहे. पण दहशतवादाविरुद्धच्या लढय़ात भारताचा विजय होईल,अशी आशा सोनियांनी व्यक्त केली. भाजपवर दहशतवादाचे राजकारण करण्याचा व जनतेच्या धार्मिक भावना भडकाविण्याचा आरोप केला. भाजपप्रणित रालोआने देशाच्या धर्मनिरपेक्षता, समाजव्यवस्था आणि अर्थकारणाची गंभीर हानी केल्याचा ठपकाही त्यांनी ठेवला. भाजप-रालोआची सत्ता असताना कंदहार प्रकरण, अक्षरधाम आणि संसदेवरील हल्ल्याच्या वेळी काँग्रेसने पूर्ण सहकार्य केले. पण भाजपने गेल्या पाच वर्षांत असे सहकार्य करणे तर दूरच, पदोपदी जनतेच्या भावना भडकावून आणि संसदेच्या कामकाजात अडथळे निर्माण करून अनेक महत्त्वाचे कायदे पारित करण्यात विलंब लावला, अशी टीका त्यांनी केली.
ह्रदयात आम आदमीची चिंता असलेला काँग्रेस हाच एकमेव पक्ष आहे. प्रत्येक व्यक्तीला सुरक्षा, समृद्धी आणि सन्मान प्रदान करून सांप्रदायिक सद्भाव व देशाचे ऐक्य मजबूत व्हावे म्हणून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांंनी देशातील जनतेचा नव्याने जनादेश प्राप्त करण्यासाठी कोणताही त्याग व संघर्ष करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन सोनिया गांधी यांनी केले. प्रतिस्पर्धी पक्षापेक्षा अनेकदा काँग्रेसच्या पराभवास काँग्रेसजनच कारणीभूत ठरले असल्याची आठवणही यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांंना करून दिली.