Leading International Marathi News Daily                                 सोमवार , ९ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

दहशतवादी हल्ल्याला मदत करणाऱ्यांवर अद्याप कारवाई का नाही
मोदींची केंद्रावर चौफेर टीका
नागपूर, ८ फेब्रुवारी / प्रतिनिधी

भारतातील मदतीविना मुंबईवर दहशतवादी हल्ला होऊ शकत नाही; अशी मदत करणाऱ्यांवर अद्याप कारवाई का केली नाही, असा खणखणीत सवाल करत, दहशतवाद्यांना त्यांच्याच भाषेत ठोस प्रत्युत्तर द्यावे लागेल, असे ठाम प्रतिपादन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले. लालकृष्ण अडवाणी यांच्याच नेतृत्वाखाली देशातील दहशतवाद संपवणे शक्य आहे, असा दावाही त्यांनी केला.
राजकीय प्रस्तावावर केलेल्या घणाघाती भाषणात मोदी यांनी काँग्रेस व केंद्र सरकारवर चौफेर टीका केली. दहशतवादी हल्ला व केंद्राच्या धोरणावर तोफ डागत त्यांनी स्वपक्षावर होणाऱ्या टीकेला उत्तर देणारे मुद्दे उपस्थित केले. गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्या भाषणाकडे सर्वाचे लक्ष लागले होते. मुंबईवरील हल्ला हा पाकिस्तानने केलेला आहे. पण, देशातून मदत मिळाल्याविना तो शक्य नाही. ‘व्होट बँके’च्या राजकारणातून अशी मदत करण्यांवर कारवाई करण्यापासून यंत्रणेला मज्जाव करण्यात येत आहे, असा आरोप त्यांनी केला. काँग्रेस, संपुआचे धोरण हे मतांसाठी आहे. गुजरातमध्ये अशा हल्ल्यानंतर कठोर पावले उचलून आरोपींना आत डांबले. पहिल्यांदा याविरोधात कोणीही आवाज उठवला नाही. यामुळे दहशतवाद्यांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर द्यावे लागेल, असे मोदी यांनी सांगताच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
अमेरिकेतील परिवर्तनाची आज जगभर चर्चा होत आहे. जॉर्ज बुश, बिल क्लिंटन यांची सत्ता आलटून पालटून येत गेली. याला कंटाळलेल्या जनतेने परिवर्तन घडवून आणले, असा ओझरता संदर्भ देऊन नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्ला चढवला. केंद्रात आतापर्यंत ३७ वर्षे एकाच कुटुंबाच्या हाती सत्तेची सूत्रे होती. आताही पाच वर्षे त्यांच्याकडे सत्ता आहे. एका कुटुंबाच्या भविष्यासाठी देशाच्या भविष्याला धोका निर्माण करण्यात येत आहे. देशातील नागरिकांना घराणेशाहीपासून मुक्तता व परिवर्तन हवे. देशात सर्वात तरुण खासदार आणि आमदार भाजपकडे आहेत. काँग्रेस आणि भाजपच्या मुख्यमंत्र्यांचे सरसरी वय काढल्यास भाजपकडेच तरुण मुख्यमंत्री दिसतील. यामुळे काँग्रेसच्या फुग्यातील हवा काढून टाका, असे आवाहनही त्यांनी केले. अडवाणी हे देशातील एकमेव नेते आहे. प्रदीर्घ अनुभव असणाऱ्या अडवाणी यांना पंतप्रधान होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. देशाला सध्याच्या स्थितीतून बाहेर काढण्यासाठी त्यांच्यासारख्या सामथ्र्यवान नेतृत्वाची गरज आहे म्हणूनच त्यांना पंतप्रधान करण्यासाठी जीवाचे रान करू, असे मोदी म्हणाले.