Leading International Marathi News Daily                                 सोमवार , ९ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

कार्तिकीदेवींचा विजय असो..
मुंबई, ८ फेब्रुवारी / प्रतिनिधी

एकीकडे झी सारेगमपच्या पाचही लिट्ल चॅम्प्सना विजयी करणार असल्याची जोरदार हवा तर दुसरीकडे कोण पुढे आहे हे शेवटपर्यंत न सांगून आयोजकांनी वाढविलेली उत्सुकता शिगेला पोहोचलेली असतानाच आळंदीच्या कार्तिकी गायकवाडची अंतिम विजेता म्हणून घोषणा करण्यात आली आणि गेल्या सहा महिन्यांपासून रंगलेल्या लिटल चॅम्प्स सारेगमप स्पर्धेच्या एका महान पर्वाची सांगता झाली. कार्तिकीला दोन लाख रुपये तर प्रथमेश लघाटे, आर्या आंबेकर, रोहित राऊत आणि मुग्धा वैशंपायन या उपविजेत्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले.
..आणि अंतिम विजेती आहे कार्तिकी गायकवाड! ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांनी ही घोषणा केली आणि सर्व उपस्थितांनी एकच जल्लोष केला. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या झी मराठीवरील लिट्ल चॅम्प्स सारेगमप या स्पर्धेची विजेती ठरली कार्तिकी गायकवाड. आज पार पडलेल्या अंतिम फेरीत कार्तिकीने बाजी मारली. अंतिम फेरीत पाचही जणांचा समावेश करण्यापूर्वी कार्तिकी गायकवाड स्पर्धेबाहेर फेकली गेली होती. मात्र ‘कॉल बॅक’ फेरीत कार्तिकीच्या धडाकेबाज कामगिरीची परिक्षकांना दखल घ्यावी लागली आणि तिचा अंतिम फेरीत समावेश झाला.
गेले काही महिने गाजत असलेल्या या स्पर्धेची अंतिम फेरी आज गोरेगाव येथील राज्य राखीव दलाच्या मैदानावर पार पडली. या फेरीसाठी नेहमीच्या परीक्षकांसह इतर पाच मान्यवरांना पाचारण करण्यात आले होते. त्यात आशा खाडिलकर, सुरेश वाडकर, श्रीधर फडके, संजीव अभ्यंकर, देवकी पंडित यांचा समावेश होता. एसएमएस आणि मान्यवर परीक्षकांच्या ५०-५० टक्के मतांवर अंतिम विजेता ठरविण्यात आला.
अंतिम विजेता आणि उपविजेत्यांना रोख रक्कम न देता राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र देण्यात आले. या विजेत्यांच्या पुढील शिक्षण आणि संगीताच्या वाटचालीसाठी दोन लाख रुपये देण्याची घोषणा झी वाहिन्याच्या वतीने करण्यात आली. ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांनी स्पर्धेकांचे तोंड भरून कौतुक करताना त्यांनी या स्पर्धेकांनी इथेच न थांबता भविष्यात मोठी कामगिरी करावी आणि शास्त्रीय संगीताचा पाया मतबूत करावा, असा आशीर्वाद दिला. ‘आयडीया’कंपनीचे प्रदीप श्रीवास्तव यांनीही स्पर्धेकांना शुभेच्छा दिल्या. लवकरच या पंचरत्नांच्या गाण्यांचा एक अल्बम झी मराठी आणि युनिव्हर्सल म्युझिक कंपनीच्या वतीने सादर करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली.
शेवटच्या तीन तासामध्ये १५ लाखांहून अधिक एसएमएस आले. कार्तिकीने पत्रकारांना सांगितले की, मी विजयी झाले म्हणजे मी फार मोठी आहे, असे नाही तर आम्ही सर्वच विजेते आहोत. मुग्धा म्हणाली की, कार्तिकी विजयी झाली म्हणजे हा माझाही विजय आहे. आमच्यातील नाते आम्ही कायम ठेवणार आहोत, असे आर्याने सांगितले. कोणीजिंकले तरी आम्ही सर्व एकत्रच आहोत, असे रोहित म्हणाला. या स्पर्धेकांच्या पालकांनीही मनोगत व्यक्त केले.
स्पर्धेत आतापर्यंत सहभागी झालेले ५० जणही आज इथे उपस्थित होते. त्या सर्वानी मिळून ‘ मराठी पाऊल पडते पुढे..’ हे गाणे सादर केले आणि या अंतिम फेरीची सुरूवात झाली. त्यानंतर पाचही स्पर्धेकांनी झकास गाणी सादर केली. प्रथमेश लघाटे, मुग्धा वैशंपायन, आर्या आंबेकर, रोहित राऊत या उपविजेत्यांनी सादर केलेल्या गाण्यांना प्रेक्षकांनी मनमुराद दाद दिली.