Leading International Marathi News Daily                                 सोमवार , ९ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

भेटी लागी जीवा..
महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस युतीचा नवा अध्याय!
संदीप प्रधान, मुंबई, ८ फेब्रुवारी

महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील युतीचा नवा अध्याय लिहिला जाण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या कालच्या भेटीने पडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेवरून भुजबळ १७ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर ‘मातोश्री’ची पायरी चढले.
महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना १९९९ मध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विदेशी मुळाच्या मुद्दय़ावरून झाली. तोपर्यंत सोनिया गांधी पंतप्रधान होण्यास शिवसेना व भाजप हे पक्षच विरोध करीत होते. सोनिया गांधी यांना राष्ट्रवादीचा विरोध असल्याने शिवसेना-भाजपबरोबर जाऊन काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवावे या मताचे असंख्य नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. भाजपमधील प्रमोद महाजन यांच्यासारखे नेते राष्ट्रवादीने युतीसोबत यावे याकरिता प्रयत्नशील होते. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार यांच्यापासून विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यापर्यंत आणि आर. आर. पाटील यांच्यापासून सुप्रिया सुळे यांच्यापर्यंत अनेकजणांची शिवसेनेच्या नेत्यांबरोबर उठबस आहे. अविनाश भोसले यांच्यासारखे अनेक सत्तेचे कंत्राटदार मॉर्निग ब्रेकफास्ट शिवसेनेच्या नेत्यांबरोबर घेतात तर डिनरला राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर एका टेबलवर असतात. त्यांची हेलिकॉप्टर्स एरियल फोटोग्राफीपासून सभा, संमेलनांपर्यंत दोन्ही पक्षाचे नेते वापरतात. त्यामुळे शिवसेनेबरोबर १० वर्षांपूर्वी जाण्याकरिता राष्ट्रवादीतून फारशी कोणाची आडकाठी नव्हती. अपवाद होता तो फक्त तत्कालीन प्रदेशाध्यक्ष छगन भुजबळ यांचा! युतीच्या सत्तेच्या काळात किणी प्रकरणापासून अनेक वादग्रस्त प्रकरणांवरून भुजबळ आणि बाळासाहेब यांच्यात संघर्ष झाला होता. भुजबळ यांना दुखावून शिवसेनेबरोबर युती करणे त्यावेळी अशक्य होते. आता तेच भुजबळ पवार यांच्या सुचनेवरून शिवसेनाप्रमुखांना भेटले असल्याने भविष्यात नवी नाती, नवी युती आकाराला येण्याची दाट शक्यता दिसत आहे.
नारायण राणे, राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यावर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी जाणीवपूर्वक छगन भुजबळ यांच्याशी असलेला दुरावा कमी करण्याकरिता प्रयत्न केला. ठाकरे यांच्याच आदेशावरून त्यांचे खासगी सचिव मिलिंद नार्वेकर यांनी भुजबळ यांच्याशी संवाद सुरू केला. किणी प्रकरणात आपल्या विरोधात मातोश्रीवरून विरोधकांना माहिती पुरवली जात होती, असा आरोप राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर केला होता. राज यांच्या टीकेचा रोख उद्धव यांच्याकडे आहे. भुजबळ यांचा शिवसेनेशी दोस्ताना ही राज यांच्यावरही कुरघोडी आहे. येत्या विधानसभा निवडणुका बाळासाहेब व शरद पवार यांच्याकरिता अत्यंत महत्वाच्या आहेत. २०१४च्या निवडणूकीत बाळासाहेब ठाकरे यांचे वय ८८ वर्षे असेल तर शरद पवार हे ७४ वर्षांचे असतील. त्यांचे राजकीय वारस अनुक्रमे उद्धव व सुप्रिया यांच्या दृष्टीने हीच निवडणूक महत्वाची आहे. यावेळी शिवसेनेची सत्ता आली नाही तर उद्धव यांच्यापुढे राज हे भविष्यात मोठे आव्हान ठरतील तर सुप्रिया सुळे यांना सत्ता प्राप्त झाली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस ही कप्तानाविना भरकटलेली बोट ठरू शकते. भुजबळ यांच्या मातोश्री भेटीला असे राजकीय संदर्भ प्राप्त झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.