Leading International Marathi News Daily

सोमवार , ९ फेब्रुवारी २००९

प्रादेशिक

दहशतवाद संपुष्टात आणण्यासाठी विपश्यनेची गरज! राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे प्रतिपादन
मुंबई, ८ फेब्रुवारी / प्रतिनिधी

जगभरात विविध लोकसमूहांमधील परस्परविरोधी भेदभावनेमुळे दहशतवाद आणि हिंसाचार वाढीस लागला आहे. अनेक कुटुंबांना उद्ध्वस्त करणाऱ्या अशा कृत्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी शांततेची गरज आहे. विपश्यनेच्या मार्गाने शांतीचा प्रसार होऊ शकेल, असा आशावाद राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी व्यक्त केला. गोराई येथे उभारण्यात आलेल्या भव्य पॅगोडाचे राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते रविवारी उद्घाटन झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी राज्यपाल एस. सी. जमीर, केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, रॉबर्ट वडेरा, प्रियांका गांधी-वडेरा, आचार्य सत्यनारायण गोयंका, हर्षवर्धन पाटील, चंद्रकांत हंडोरे, किरण बेदी, डॉ. भालचंद्र मुणगेकर, प्रफुल्ल पटेल, रामदास आठवले, शुभा राऊळ, विजयसिंह मोहिते-पाटील, नवाब मलिक, रत्नाकर गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

दहशतवादी आणि त्यांच्या म्होरक्यांतील संभाषण पुराव्यांबाबत
मुंबई पोलीस घेणार एफबीआयची मदत

मुंबई, ८ फेब्रुवारी / प्रतिनिधी

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचाच हात असल्याचे ठोस पुरावे गोळ्या करण्यात सध्या व्यग्र असलेल्या मुंबई पोलिसांनी आता आणखी एका ठोस पुराव्यासाठी ‘एफबीआय’ची मदत घेण्याचे ठरवले आहे. मुंबईवर दहशतवादी हल्ला करणारे दहशतवादी हल्ल्याच्या वेळी ‘व्हॉईस ऑफ इंटरनेट प्रोटोकॉल’ या व्यवस्थेद्वारे पाकिस्तानात बसलेल्या त्यांच्या म्होरक्यांसोबत संपर्कात होते. त्यांच्यात झालेल्या संभाषणाच्या पुरांव्याच्या तपशीलाबाबतच मुंबई पोलीस एफबीआयची मदत घेणार आहेत.

प्रा. प्रकाश खांडगे यांना डॉक्टरेट
मुंबई, ८ फेब्रुवारी / प्रतिनिधी

मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे प्रमुख प्रा. प्रकाश खांडगे यांना अलिकडेच 'जागरण : एक विधिनाटय़ इतिहास, वाङ्मय, प्रयोग' या विषयावर सादर केलेल्या प्रबंधाला पीएच.डी. पदवी जाहीर करण्यात आली आहे. प्रा. खांडगे गेली ३० वर्षे खंडोबाच्या जागरण या विधिनाटय़ावर संशोधन करीत आहेत. गुरुदेव टागोर तौलनिक अभ्यास विभाग, मुंबई विद्यापीठ या विभागाचे प्रमुख डॉ. हरिश्चंद्र थोरात हे प्रा. खांडगे यांचे मार्गदर्शक होते. मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागातर्फे प्रा. खांडगे यांनी प्रबंध सादर केला होता. डॉ. रा. चिं. ढेरे, डॉ. प्रभाकर मांडे, डॉ. गुंथर सोन्थायझर आदी मान्यवरांचे सहकार्य आपणास लाभल्याचे प्रा. खांडगे यांनी स्पष्ट केले.

‘साइज झीरो’ नक्को गं बाई -करिना
मुंबई, ८ फेब्रुवारी / प्रतिनिधी

तमाम ‘बेब’ ना तिचा हेवा वाटत होता. फिगर असावी तर अश्शी! अगदी झीरो साइज. तिच्यासारखी फिगर व्हावी यासाठी अनेक तरुणींनीही ‘करिना पॅटर्न’ अवलंबिला आणि ‘झीरो साइज’ चा एकच बोलबाला झाला. करिना कपूर हिने ‘टशन’ चित्रपटासाठी ‘झीरो साइज’ फिगर आणली अनेकांनी त्यावेळी नाके मुरडली पण ही बया मात्र ‘मी बाई अश्शीच’ म्हणत होती. आता तिला काय उपरती झाली माहीत नाही सध्या ती म्हणते ‘साइज झीरो’? नक्को ग बाई. सगळ्यावर एकच उपाय तो म्हणजे ‘योगा’ शरीर स्वस्थ आणि निरोगी राहते ते फक्त योगाचा व्यायाम केल्यामुळे.

बॉलीवुडलाही बसला मंदीचा फटका; ‘यशराज फिल्म्स’ने वीस कर्मचाऱ्यांना काढले
मुंबई, ८ फेब्रुवारी/पी.टी.आय.

जागतिक मंदीचा फटका हवाई वाहतूक, वस्त्रोद्योग, वित्त आणि माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रांना बसला असतानाच बॉलीवुडलाही या मंदीचे चटके जाणवू लागले आहेत. याचाच परिणाम म्हणून यशराज फिल्म्स या आघाडीच्या कंपनीने खर्चकपातीचा भाग म्हणून सुमारे वीस कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. ‘कंपनी यापुढे आपल्याला कामावर ठेवू शकत नाही’ असे सांगून या कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आले असल्याची माहिती यापैकी एका कर्मचाऱ्याने दिली. हे कर्मचारी गेल्या पाच वर्षांंपासून कंपनीत होते. कामावरून काढण्यात आलेल्यांमध्ये काही कार्यकारी निर्मात्यांचा समावेश आहे. दरम्यान, या नोकरकपातीबाबत यशराज फिल्म्सच्या प्रवक्तयाने काहीही सांगण्यास नकार दिला. यशराज फिल्म्स ही बॉलीवुडमधील आघाडीची व जुनी कंपनी आहे. या संस्थेचा ‘रब ने बना दी जोडी’ हा शाहरुख खानची भूमिका असलेला चित्रपट अलीकडेच प्रदर्शित झाला असून त्याला बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळाले. या संस्थेचा ‘न्यूयॉर्क’ आता प्रदर्शनाच्या वाटेवर असून जॉन अब्राहम व कतरिना कैफ ही जोडी असलेल्या या चित्रपटाची जोरदार हवा निर्माण झाली आहे.