Leading International Marathi News Daily

सोमवार , ९ फेब्रुवारी २००९

नवनीत

शुद्ध ऐतिहासिक पद्धती स्वीकारून संतचरित्रातील घटनाप्रसंगांचे क्रमश: निवेदन करीत जाणे ठोस प्रमाणे, पुरावे यांच्याअभावी अवघड होते. कोणी एखाद्या बादशहाचा गुलाम फारसनवीस, त्याच्या अनाचार, अत्याचार, अतिरेकाकडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष करीत, वर त्याचेच गोडवे गात, अन्यधर्मीयांबद्दल सरळ सरळ खोटे लिहून ठेवतो. काहींनी केलेल्या नोंदी अपुऱ्या, भडक, एकारलेल्या आणि विस्कळीत वाटतात. दाणे कोणते आणि साले, टरफले कोणती याचा योग्य निर्णय करणे अवघड, अशी अवस्था आहे. म्हणूनच आम्ही गुरू नानकदेवांच्या जीवनचरित्राचे आणि त्याहून महनीय अशा कार्यकर्तृत्वाचे निवेदन करताना अनेक अनाम जनमसाखीकारांच्या गुरुचरित्र कथनपद्धतीस डावलले नाही. कारण ते आपल्यासमोर कोंडय़ासकट बनविलेली जीवनसत्त्वयुक्त भाकरी ठेवतात, अशी आमची प्रामाणिक श्रद्धा आहे. ती कदाचित चव न रुळलेल्या जिभेवर कडवटही लागेल, पण आरोग्यासाठी प्रसंगी कडवट चव अंगी बाणविण्याची आवश्यकता असते, याची आम्हाला जाणीव आहे. गुरू नानकदेव त्या त्या वेळी लोकांना असे भासले? कसे भावले? त्यांच्याविषयीच्या आपुलकीतून पुढे अत्यादराची भावना हळूहळू कशी निर्माण होत गेली असेल? या साऱ्याचे कथारूप तपशील जनमसाखीतून स्वीकारलेले आहेत. जनमसाखीकारांनी दिलेल्यांपैकी काही कथा ज्ञानदेव-नामदेवांशी संबद्ध लोककथांशी नाते सांगणाऱ्या आहेत. उदाहरणार्थ, गुरु नानकदेवांच्या मौंजीबंधनाचा प्रसंग. त्या ठिकाणी आम्ही ज्ञानदेवादी भावंडांच्या मुंजीच्या वेळी अलंकापुरीतील ब्रह्मवृंदात उठलेले वादळ नोंदविले आहे. पैठणहून शुद्धिपत्र मिळवून आणल्यानंतरही ज्ञानदेवांनी मुंज केली नाही. या साऱ्या कथा पाहिल्यास आम्हाला काय जाणवते? नानकदेवांच्याही घरात मुंजीची प्रथा होती. त्यांच्या आई-वडिलांनी विचारपूर्वकच त्यांची मुंज ठरविलेली होती. ऐनवेळी मुंज थांबली. कारण नानकदेवांनी अगदी बालवयातच कोरडय़ा कर्मकांडाला आव्हान दिले. मुंजीमागील मूळच्या विशिष्ट उदात्त कल्पना मात्र त्यांना अमान्य नसाव्यात. त्यांनी कडकपणाने विरोध केला तो पोटार्थी भिक्षुकांना. ज्ञानदेवांनी शुद्धिपत्र मिळवून दाखविले. पण पुन्हा भिक्षुक वृत्तीच्या पुरोहितांकडून प्रत्यक्ष मौंजीबंधनाचा वेगळा संस्कार करून घेतला नाही. आम्हाला या दोन वास्तव प्रसंगांत साम्य जाणवते.
अशोक कामत

शनिभोवतालची कडी कशापासून तयार झाली आहेत? इतर कोणत्या ग्रहांभोवती अशी कडी आहेत का?
आपल्या सूर्यमालेतील प्रत्येक ग्रहाचे एक वैशिष्टय़ सांगा, असे म्हटले तर शनिचे वैशिष्टय़ म्हणून त्याची कडी सांगितली जातील. साध्या दुर्बिणीतून ही कडी आपल्याला पाहता येतात. मात्र दुर्बिणीतून ज्याप्रमाणे ही कडी सलग दिसतात तशी ती नसून, लहानमोठय़ा असंख्य दगडधोंडय़ांपासून ती बनली आहेत. काही मिलिमीटरपासून ते कित्येक किलोमीटर आकाराचे हे जणू उपग्रहच शनिभोवती रिंगण घालत आहेत. त्यांच्यात धुळीचे आणि बर्फाच्या कणांचेही मोठे प्रमाण आढळून येते. ही कडी तयार झाली आहेत ती भरती-ओहोटीच्या बलांमुळे. पृथ्वीवरील वेगवेगळय़ा भागांवर चंद्राचे गुरुत्वाकर्षण बल वेगवेगळे असते आणि त्यामुळे पाणी कमी-अधिक प्रमाणात खेचले जाऊन भरती-ओहोटी निर्माण होते. तसेच चंद्रावरसुद्धा पृथ्वीमुळे भरती-ओहोटी निर्माण होते. मात्र चंद्रावर पाणी नसून तिथली जमीनच वर-खाली होते. आता जर चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ आला तर भरती-ओहोटीची पातळी आणखी वाढेल आणि एका ठरावीक अंतराच्या आत जर चंद्र आला तर या भरती-ओहोटीचा ताण इतका वाढेल की त्यामुळे चंद्राचे तुकडे पडतील. या मर्यादेला रोशची मर्यादा (रोश लिमिट) असे म्हणतात. ही मर्यादा साधारणपणे कोणत्याही ग्रहाच्या त्रिज्येच्या अडीचपट असते. शनिची कडीसुद्धा याच मर्यादेच्या आत आढळतात. शनिच्या रोश मर्यादेच्या आत आलेल्या उपग्रहांच्या, इतस्तत: फिरताना खेचून घेतलेल्या लघुग्रहांच्या तसेच धूमकेतूंच्या तुकडय़ांमुळे ही कडी निर्माण झाली. गुरू, युरेनस व नेपच्यून या प्रचंड आकाराच्या ग्रहांभोवतीसुद्धा कडी आढळली आहेत. यातील गुरूभोवतालच्या कडय़ांची व्हॉयेजर-१ या यानाने, तर युरेनस व नेपच्यून भोवतालच्या कडय़ांची व्हॉयेजर-२ या यानाने प्रत्यक्ष छायाचित्रेही घेतली आहेत.
महेश शेट्टी
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

‘अभिनव भारत’च्या वतीने ज्यांच्या कविता छापल्याने बाबाराव सावरकरांवर देशद्रोहाचा आरोप होऊन अंदमानात काळय़ा पाण्याची शिक्षा ठोठावली गेली ते गोविंद त्रिंबक दरेकर महाराष्ट्राला ‘कवी गोविंद’ या नावाने परिचित आहेत. कवी गोविंद यांचा जन्म नाशिक येथे ९ फेब्रुवारी १८७४ रोजी झाला. लहानपणी ताप अंगात मुरल्याने कमरेपर्यंतचे त्यांचे शरीर लुळे पडले. काव्याची उपजत जाण आणि परिसरातील तमाशाचे वातावरण यामुळे ‘हौशिने करा मसि गेंद गेंद । घडवा हो बाजुबंद।’ अशा शृंगारिक लावण्या त्यांनी लिहिल्या आणि तेच त्यांच्या उपजीविकेचे साधन बनले. नाशिकच्या नगरकर गल्लीत ते राहायला गेले असता क्रांतिकारक बाबाराव सावरकरांशी परिचय झाला आणि त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ‘मित्रमेळा’ या क्रांतिकारी संघटनेत गोविंद सामील झाले. स्वातंत्र्याचा पाळणा, स्वातंत्र्य लक्ष्मीस्तवन, भारत प्रशस्ती या स्वातंत्र्यप्रेमाने ओसंडून भरलेल्या त्यांच्या जहाल कविता इंग्रजांनी जप्त केल्या. त्यांचे ‘रणवीणा स्वातंत्र्य कोणा मिळाले’ हे पद्य ‘अभिनव भारत’ या संघटनेचे ब्रीद बनले होते आणि म्हणूनच ‘स्वातंत्र्य शाहीर’ ही उपाधी त्यांना अधिक सार्थ ठरते. टिळकांची भूपाळी, सुंदर मी होणार या त्यांच्या गाजलेल्या काही कविता.‘आनंदी आनंद जाहला, मरता मी हसणार, हासत मरणे गोविंदाचा प्रेमबंध ठरणार, सुंदर मी होणार’ अशी काव्यरचना करून आपल्या मृत्यूचेही स्वागत त्यांनी केले. २८ फेब्रुवारी १९२६ रोजी हा कवी अनंतात विलीन झाला.
संजय शा. वझरेकर

अन्तोनच्या घरातून समुद्र फार छान दिसायचा. त्याची गाज ऐकू यायची. वाळूत किल्ले करायला, गोटय़ा आणि चेंडू खेळायला शनिवार, रविवार आला की मित्रांची गर्दी व्हायची. अन्तोनला गोटय़ा खेळायला फार आवडायचे. त्याचा नेम अचूक असायचा. गोटय़ा खेळण्यात त्याचा हात धरणारा त्याच्या मित्रांत कुणी नव्हता. बाबा त्याला म्हणायचे,‘‘अरे, अशा सारख्या गोटय़ा खेळत बसलास तर अभ्यासाचे कसे होणार रे तुझ्या?’’ घराभोवतालच्या बागेतले गवत काढणे हा बाबांचा सुटीच्या दिवसाचा आनंदाचा उद्योग. त्या दिवशी सकाळी ते तणतणत बागेतून घरात आले- ‘नुसता उच्छाद मांडलाय या खेकडय़ांनी.’ आईने विचारलं,‘‘काय झालं एवढं चिडायला?’’ ‘अगं, त्या खेकडय़ांनी बागेत केवढी बिळं केली आहेत. तिथं ते नारळाएवढी घरं थाटताहेत.’ किनाऱ्यावर राहणारे इतर लोकही खेकडय़ांमुळे त्रासले होते. संध्याकाळी सगळे एकत्र भेटले तेव्हा चर्चेचा विषय ‘मोठ्ठे खेकडे आणि त्यांच्यामुळे होणारा त्रास’ हाच होता. त्या रात्री अन्तोनच्या बाबांना नीट झोप आली नाही. ते सकाळी उठून बागेत गेले. प्रत्येक बिळात त्यांनी दोन-दोन बादल्या पाणी ओतले. काही उपयोग झाला नाही. उलट दुसऱ्या दिवशी संख्या वाढली. ते ओरडून बागेतूनच अन्तोनच्या आईला म्हणाले, ‘‘गवतावर आणि बिळात विषारी औषधच फवारावं लागणार वाटतंय.’’ अन्तोन धावत घरातून बागेत आला. बाबांना म्हणाला, ‘‘नका मारू औषध. मी घालवतो त्यांना. फक्त उद्याचा दिवस वाट पाहा.’’ बाबांनाही त्या बिचाऱ्या खेकडय़ांना मारणं नको वाटत होतं. पण नाईलाजच झाला होता. ‘पाहू या तरी हा काय करतो. अनायासे गेले तर बरंच,’ त्यांनी विचार केला. अन्तोनने त्याचा मित्र बस्त्याँवला ‘मिशन खेकडे’साठी बोलावले. तो आणखी काही मित्रांना घेऊन आला. साऱ्यांनी मिळून खेकडय़ांच्या बिळात मोठाल्या गोटय़ा टाकल्या. खेकडय़ांना धोका वाटला. हे कोण प्राणी. त्यांनी गोटय़ा पकडून बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या नांगीतून त्या पुन:पुन्हा सटकायच्या. बराच प्रयत्न करूनही खटपट वाया गेली. खेकडे एक एक करून बिळातून बाहेर पडले आणि समुद्राच्या दिशेने चालू लागले. समुद्राची लाट आली आणि त्यात ते चाळीस-पन्नास खेकडे दिसेनासे झाले. सगळय़ा मुलांनी आनंदाने गोंधळ केला. त्या दिवशी अन्तोनच्या बाबांनी त्यांच्या लाँचवरून अन्तोन आणि त्याच्या मित्रांना बक्षीस म्हणून समुद्रातून फिरवून आणले.
थोडा धीर धरून कल्पकता वापरून येणाऱ्या अडचणींवर मात करता येते. त्यासाठी तातडीने अघोरी उपाययोजना करण्याची आवश्यकता नसते.
आजचा संकल्प- मला येणारी अडचण मी कल्पकता वापरून सोडवेन.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com