Leading International Marathi News Daily

सोमवार , ९ फेब्रुवारी २००९

शहरालगतच्या ‘रिंगरोड’ची नव्या बदलांसह आखणी पूर्ण
९ हजार कोटी खर्च; तेवीसशे हेक्टर भूसंपादन

धनंजय जाधव, पुणे, ८ फेब्रुवारी

शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी महापालिका हद्दीलगत सहा पदरी ‘रिंगरोड’ करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आला असून या रस्त्याची नव्या बदलांसह आखणी पूर्ण झाली आहे. १७० किलोमीटर लांब, तेवीसशे हेक्टर भूसंपादन, चार बोगदे आणि खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात उड्डाणपूल असा हा प्रस्तावित ‘रिंगरोड’ असणार आहे. या रस्त्यासाठी सुमारे नऊ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.पुणे व पिंपरी -महापालिकेच्या हद्दीतून रिंगरोड करण्याचा प्रस्ताव पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मांडला होता. तसेच या रस्त्याच्या भूसंपादनाचा आर्थिक भार दोन्ही महापालिकांनी उचलावा अशी अपेक्षा प्रस्तावात करण्यात आली होती. मात्र त्याला महापालिकेतून कडाडून विरोध करण्यात आला होता.

मंदीतही दोनशे बेरोजगारांना जागेवर नोक ऱ्या
पिंपरी रोजगार मार्गदर्शन केंद्राचा उपक्रम

पिंपरी, ८ फेब्रुवारी / प्रतिनिधी

औद्योगिक मंदीमुळे ब्लॉक क्लोजर,वेतन कपात व थेट कंपनी बंद करण्याच्या घटनांमुळे नैराष्य आलेल्या उद्योगनगरीत रोजगार व स्वयंरोजगार केंद्राने आज चमत्कार घडविला.नोकरीसाठी वणवण फिरणाऱ्या बेरोजगारांचा मेळावा आयोजित करून १९४ जणांना जागेवर नेमणूक पत्र दिली.पिंपरी केंद्रामार्फत मोरवाडी येथील एस.एन.बी.पी. महाविद्यालयात बेरोजगारांच्या मेळाव्याचे आयोजन केले होते.या मेळाव्याला तांत्रिक अर्हतेच्या ८६७ जागांसाठी अंदाजे १३५० इतक्या मोठय़ा प्रमाणावर उमेदवार हजर होते.

थंडीच्या मंदीने ‘गोठविले’ स्वेटरविक्रेत्यांना
श्रीकृष्ण कोल्हे, पुणे, ८ फेब्रुवारी

यंदा हिवाळ्यामध्ये थंडीने जेमतेम एक महिनाच हजेरी लावल्याने स्वेटर, शालविक्रेत्यांना मोठा तोटा सहन करावा लागला असून, अपेक्षेपेक्षा साठ टक्के कमी धंदा झाला आहे. प्रत्येक वर्षी हिवाळा हा नोव्हेंबरच्या मध्यापासून सुरू होतो. परंतु यंदा जानेवारी उजाडला तरी थंडी पडली नाही.

‘शिवतीर्थ रायगड’ प्रदर्शन सुरू
पुणे, ८ फेब्रुवारी/प्रतिनिधी

दुर्गप्रेमी आणि रायगडाचे अभ्यासक सुरेश वाडकर यांच्या ‘शिवतीर्थ रायगड’ या छायाचित्र प्रदर्शनाचे ज्येष्ठ इतिहास संशोधक निनाद बेडेकर यांच्या हस्ते काल उद्घाटन झाले. ‘साहस’ संस्थेतर्फे बालगंधर्व कलादालनात या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून, ते सोमवार (दि. १०) पर्यंत सकाळी ९ ते रात्री ९ दरम्यान सुरू राहणार आहे. या कार्यक्रमास ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर, ज्येष्ठ उद्योगपती राजाभाऊ करंदीकर, स्थायी समितीचे अध्यक्ष श्याम देशपांडे, कामगारमित्र बी. एल. तारी आदी उपस्थित होते.

पिंपळे गुरवला महांकालेश्वराची शुक्रवारी प्राणप्रतिष्ठा
पिंपरी, ८ फेब्रुवारी / प्रतिनिधी

पिंपळे गुरव - दापोडी पुलानजीक गंगोत्रीनगर येथे बांधण्यात आलेल्या श्री महांकालेश्वर शिवमंदिरात प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. छायाचित्रात मंदिरातील शिवलिंग व शेजारी मंदिर.
पवना नदीच्या काठी िपपळे गुरव-दापोडी पुलानजीक गंगोत्रीनगर येथे बांधण्यात आलेल्या श्री महांकालेश्वर शिवमंदिरात १३ फेब्रुवारीला (शुक्रवार) भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.


शिरूरमधील कितीही नेते सत्ताधाऱ्यांनी फोडले तरी त्याची भीती नाही - आढळराव पाटील
शिरूर, ८ फेब्रुवारी/वार्ताहर

शिरूर लोकसभा मतदारसंघात येणारी निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे. यामुळे शिरूरमधील कितीही नेते सत्ताधाऱ्यांनी फोडले तरी मला त्याची भीती नाही असे मत खासदार शिवाजीराव आढळराव यांनी तांदळी ता. शिरूर येथे व्यक्त केले.तांदळी येथे शिवसेनेच्या वतीने शाखा उद्घाटन व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी शिवसेनेचे पुणे जिल्हा उपप्रमुख नामदेव तांबे, शिरूर तालुकाप्रमुख अनिल काशिद, शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब घाडगे, आळंदीचे नगरसेवक रमेश गोगावले, शिरूर तालुका भाजपाचे अध्यक्ष भगवान शेळके, माजी पंचायत समिती सदस्य अरुण भुजबळ, शिवसेनेचे नेते अनिल कोल्हे, उपतालुका प्रमुख पोपट शेलार, किरण देशमुख, शहरप्रमुख संजय देशमुख आदी उपस्थित होते.

‘बेटिंग’ करणाऱ्या चौदाजणांना अटक
पुणे, ८ फेब्रुवारी / प्रतिनिधी

बेकायदेशीर लॉटरीच्या दुकानात ‘बेटींग’ करणाऱ्या चौदाजणांना गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पन्नास हजार रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला. सातारा रस्त्यावरील अशोक कॉम्प्लेक्स येथे आज दुपारी अडीचच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. अमित सुरेश तांबे (वय २६, रा. महर्षिनगर), सागर रमेश गायकवाड (वय २६, रा. घोरपडे पेठ), साजिद इस्माईल शेख (वय २४, रा. दांडेकर पूल), आनंद दिनेशचंद्र गुप्ता (वय २३), अशोक शंकर केसरी (वय ४५, दोघे रा. दिनदयाळ नगर, भारती विद्यापीठजवळ), यशवंत दयाप्रसाद ठाकूर (वय २६, रा. कासेवाडी), अभेद बालमुकुंद साहू (वय १९, रा. पद्मावती), संतोष विश्र्वनाथ नामदेव (वय २८, रा. बालाजीनगर, धनकवडी), संतोष पांडुरंग घाटकर (वय ३३, रा. संतोषनगर, कात्रज), प्रशांत बादल पाईन (वय ३४, रा. आंबेगाव), धर्मा बन्सी शिंदे (वय ३०, रा. गंज पेठ), सतीश किसन पासलकर (वय ५३, रा. सहकारनगर), सचिन रामचंद्र पाटोळे (वय २७, रा. गंज पेठ) असे या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या चौदाजणांची नावे आहेत. त्यांचा साथीदार विजू गोविंद पवार (रा. धनकवडी) हा फरारी आहे. या चौदाजणांविरूद्ध दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे अन्वेषण शाखेसह दत्तवाडी पोलिसांनी संयुक्तरीत्या हा कारवाई केली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक कुंडलिक कायगुडे पुढील तपास करीत आहेत.

ट्रक उलटून दोन ठार;पाचजण गंभीर जखमी
पुणे, ८ फेब्रुवारी / प्रतिनिधी

कात्रज येथे नवीन बोगद्याजवळ ट्रक उलटल्यामुळे झालेल्या अपघातात दोन कामगार मृत्युमुखी पडले तर पाचजण गंभीर जखमी झाले. जांभुळवाडी पुलावर आज सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास हा अपघात झाला. मनसुख जगत (वय २५), विनोदकुमार सखालाल (वय २५, दोघे रा. कर्वेनगर, मूळ रा. झारखंड) असे मृत्युमुखी पडलेल्या दोघा कामगारांचे नाव आहे. टिकाराम श्रीपुनीतराम गोवारिया (वय २०), लालजी निशाद राज (वय १८), राजेशकुमार दयाराम ठाकूर (वय ३०) आणि तिजाराम महेशराम ठाकूर (वय ३२), दीपक कुमार (वय २६, सर्व रा. कर्वेनगर) असे या अपघातात जखमी झालेल्या पाचजणांची नावे आहेत. हवेली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रजकडून आंबेगावच्या दिशेने हा ट्रक चालला होता. रस्त्याच्या कामासाठी वापरण्यात येणारे ‘इंटरलॉकिंग ब्लॉक्स’ ट्रकमध्ये भरले होते व हे सर्व कामगार त्यावर बसले होते. जांभुळवाडी पुलावर ट्रक आल्यानंतर एका वळणावर चालकाचा ताबा सुटला. ट्रक उलटल्यामुळे सर्व कामगार ब्लॉक्सखाली अडकले. अपघातामध्ये एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा रुग्णालयात उपचारासाठी नेताना मृत्युमुखी पडला. अन्य पाचजणांना ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

टिंगरेंच्या विरोधातील याचिका फेटाळली
पुणे, ८ फेब्रुवारी / प्रतिनिधी

नगरसेविका रेखा टिंगरे यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका लघुवाद न्यायालयाने फेटाळली असून या निर्णयामुळे त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले आहे. धानोरी (वॉर्ड क्र. १) मधून काँग्रेसतर्फे रेखा चंद्रकांत टिंगरे यांनी निवडणूक लढवली होती. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या रेखा दत्तात्रय टिंगरे या उमेदवार होत्या. या निवडणुकीत काँग्रेसच्या टिंगरे ९९ मतांनी विजयी झाल्या. या निकालाच्या विरोधात राष्ट्रवादीच्या टिंगरे यांनी लघुवाद न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यात त्यांनी विद्यमान नगरसेविका रेखा टिंगरे, तसेच महापालिका आयुक्त व निवडणूक निर्णय अधिकारी आदींना प्रतिवादी केले होते. नगरसेविका टिंगरे यांनी मतदारांना प्रलोभने दाखवली, वस्तू वाटल्या, विरोधकांना दमबाजी केली, मृत व गैरहजर मतदारांच्या नावावर मतदान घडवून आणले आदी आरोप या याचिकेत करण्यात आले होते. हे सर्व आरोप निराधार ठरवून सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने ही याचिका फेटाळल्याचा निर्णय दिला.

गोंदवलेकर मठात चोरी; तरूणाला अटक
पुणे, ८ फेब्रुवारी / प्रतिनिधी

शनिवार पेठेतील गोंदवलेकर महाराज मठातून साडेसात हजार रुपये किमतीच्या वस्तू चोरणाऱ्या तरूणाला फरासखाना पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून वीस हजाराचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला. अनिल यशवंत अवसरे (वय २३, रा. गणेश पेठ) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तरूणाचे नाव आहे. अवसरे याच्याविरूद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यातही घरफोडीप्रकरणी एक गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी याविषयी दिलेल्या माहितीनुसार, फरासखाना ठाण्यातील पोलीस नाईक उमेश राऊत यांना खबर मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक गजानन पवार यांच्या पोलीस पथकाने गणेश पेठेतून अवसरे याला अटक केली. उपनिरीक्षक पवार हे या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.

उकाडा वाढला; उन्हाळ्याकडे वाटचाल
पुणे, ८ फेब्रुवारी / खास प्रतिनिधी

तापमान वाढल्याने राज्याच्या बहुतांश भागात उन्हाच्या झळा जाणवू लागल्या असून, आता राज्याची उन्हाळ्याकडे वाटचाल सुरू झाली आहे. येत्या काही दिवसांत तापमानात घट होण्याची शक्यता नाही. उलट तापमानात हळूहळू वाढच होत राहील, असा अंदाज वेधशाळेतर्फे वर्तविण्यात आला आहे.
कोकणापासून विदर्भापर्यंत सर्वच ठिकाणी आज दुपारी उन्हाचा चटका अनुभवायला मिळाला. अकोला, महाबळेश्वर या ठिकाणी तर कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत तब्बल पाच अंशांनी अधिक होते. त्यामुळे उन्हाच्या झळा घामाघूम करत होत्या. दुपारच्या तापमानात वाढ झालेली असतानाच, रात्रीचे तापमानही सरासरीच्या वर गेले. पश्चिम महाराष्ट्रात पुण्यासह सोलापूर, कोल्हापूर तसेच मराठवाडय़ात औरंगाबाद व परभणी येथे रात्रीचे तापमान सरासरीपेक्षा बरेच जास्त नोंदवले गेले. सध्या आकाश निरभ्र असूनही सर्वच तापमानात वाढ झाल्याने आता राज्याची उन्हाळ्याकडे वाटचाल सुरू झाल्याचे वेधशाळेच्या सूत्रांनी सांगितले. येत्या काही दिवसांतही तापमानात वाढच होत जातील, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे. राज्यात आज दुपारी नोंदवले गेलेले कमाल तापमान पुढीलप्रमाणे (सर्व आकडे अंश सेल्सिअसमध्ये आहेत, कंसात त्याची सरासरीशी तुलना दिली आहे)- पुणे ३३.८ (३), सातारा ३४.४, सांगली ३४.४ (२), कोल्हापूर ३३.७ (२), महाबळेश्वर ३१ (५), जळगाव ३४.३ (२), नाशिक ३३.५ (२), पणजी ३२.३ (०), मुंबई ३०.२ (१), रत्नागिरी ३१.५ (०), डहाणू २८.४, परभणी ३४.५ (२), अकोला ३७ (५), नागपूर ३४.२ (३).

वीज कंपनीच्या भरारी पथकाकडून वर्षभरात १२ कोटीची वसुली
पुणे, ८ फेब्रुवारी/प्रतिनिधी

वीज कंपनीच्या पुणे परिक्षेत्रात वीजचोरी पकडण्यासाठी कार्यरत असलेल्या भरारी पथकाने मागील वर्षभरात ८५० वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आणली असून, चोरी व अनियमततेबाबत तब्बल १२ कोटी ४४ लाख रुपयांची वसुली केली आहे. भरारी पथकाच्या वर्षभरातील कार्याचा नुकताच आढावा घेण्यात आला. त्यानुसार संबंधितांच्या कामगिरीबाबत कंपनीच्या दक्षता सुरक्षा विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक हेमंत नगराळे यांच्या सूचनेनुसार सत्कारही करण्यात आला. १५ भरारी पथकांच्या कामांचा आढावा घेण्यात आला. त्यात कोल्हापूर, सांगली व परभणी या पथकांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. पुणे परिक्षेत्रात सवरेत्कृष्ट ठरलेल्या पुणे शहर भरारी पथकास फिरता चषक देण्यात आला. पुणे परिक्षेत्राचे उपसंचालक शिवाजी इंदलकर यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले. दक्षता संचालनालयाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र पुरोहित त्यावेळी उपस्थित होते. पुढील काळात मराठवाडा व पुणे परिसरामध्ये अशा प्रकारच्या मोहिमा मोठय़ा प्रमाणावर राबविण्यात येणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

भारतीय विद्यार्थी सेनेची शिक्षकांवर कारवाईची मागणी
पुणे, ८ फेब्रुवारी / प्रतिनिधी

खडकवासला येथील यशवंत विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांला झालेल्या मारहाणीचा भारतीय विद्यार्थी सेनेने निषेध केला आहे. याप्रकरणी दोषी शिक्षकांवर निलंबनाची कारवाई आठ दिवसात करावी अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. विद्यालयामध्ये आठवी इयत्तेत शिकणाऱ्या पुनीत देवरामहरी बोके या विद्यार्थ्यांला बुधवारी मारहाण झाली. त्याला मारहाण करणाऱ्या शिक्षकांवर निलंबनाची कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. सेनेचे माजी विभागप्रमुख शेखर मते, उपविभाग प्रमुख विजय मते, तंटामुक्त समितीचे सदस्य अभिजित मते तसेच कार्यकर्ते निलेश विश्वास मते, अमोल दशरथ मते, श्याम मते, अजय मते, रवींद्र भोसले, गणेश धरपाळे, दिलीप कुंजीर यांनी विद्यालयाच्या प्राध्यपकांची भेट घेऊन त्यांना कारवाई करण्याविषयी निवेदन दिले.

ज्येष्ठ बॅँक आधिकारी मनोहर पेंडसे यांचे निधन
पुणे, ८ फेब्रुवारी/प्रतिनिधी

सामाजिक कार्यकर्ते मनोहर व्यंकटेश पेंडसे (वय ७५) यांचे दीर्घ आजाराने नुकतेच निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी व तीन चिरंजीव असा परिवार आहे. पेंडसे यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या विविध पदांवर काम केले आहे.