Leading International Marathi News Daily

सोमवार , ९ फेब्रुवारी २००९

राज्य

पद्माकर गवई यांचे निधन
नागपूर, ७ फेब्रुवारी / प्रतिनिधी

महाराष्ट्राचे सेवानिवृत्त मुख्य सचिव पदमाकर गणेश उपाख्य पी.जी. गवई यांचे शुक्रवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात मधुसूदन व कुमार हे दोन मुलगे, मृणालिनी, जयश्री या दोन विवाहित मुली आणि आप्तपरिवार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. २४ जानेवारीला प्रकृती खालावल्याने त्यांना शंकरनगरातील सेंट्रल इंडिया कॅन्सर रिसर्च इन्स्टिटय़ूटमध्ये दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी पहाटे २ वाजता त्यांचे निधन झाले. पी. जी. गवई यांचा जन्म ११ जानेवारी १९२६ ला नागपुरात झाला. त्यांचे शिक्षण नागपुरातच झाले. कला शाखेत संस्कृत विषयात त्यांना किंग एडवर्ड स्मृती शिष्यवृत्ती मिळाली होती. त्यांनी कायद्याची पदवीही घेतली होती. किंग एडवर्ड कॉलेजच्या युनियनचे ते संस्थापक अध्यक्ष होते. चार वर्षांचे लष्करी शिक्षण देणाऱ्या युनिव्हर्सिटी ऑफिसर्स ट्रेनिंग कॉर्प्सचे ते सदस्य होते.

शाळेच्या गाडय़ांवर कारवाई
ठाणे,८ फेब्रुवारी/प्रतिनिधी
खासगी रिक्षा, ट्रॅक्स आणि बसमध्ये कोंबून विद्यार्थ्यांची सर्रासपणे वाहतूक केली जाते. ठाण्यातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांच्या अशा बेकायदेशीर वाहतुकीकडे संबंधी यंत्रणा आणि पालकांकडून दुर्लक्ष केले जात आहे. अशा ६ हजार ४०४ मुजोर वाहन चालकांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई होऊनही चालक तोच धडा गिरवून हजारो विद्यार्थ्यांच्या जिविताशी खेळत आहेत.

‘नागपूर का संदेश, भाजप को जनादेश’- व्यंकय्या नायडू
निवडणुकीत विजयासाठी पक्ष संघटना बळकट करण्याचे आवाहन

नागपूर, ८ फेब्रुवारी / प्रतिनिधी

येत्या लोकसभा निवडणुकीत विजयी होण्यासाठी पक्ष संघटना बळकट करून ‘फिल्डिंग’ कशी लावावी, याबाबत देशभरातून आलेल्या प्रतिनिधींना भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी आज अनेक सूचना केल्या. ‘नागपूर का संदेश, भाजप को जनादेश’, अशी घोषणा ज्येष्ठ नेते व्यंकय्या नायडू यांनी यावेळी दिली. लालकृष्ण अडवाणी यांचा ‘आधुनिक लोहपुरुष’ असा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला. भाजपच्या राष्ट्रीय परिषदेत रविवारी राजकीय प्रस्तावानंतर लोकसभा निवडणुकीची तयारी आणि संघटनात्मक विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी नेत्यांनी काँग्रेस आणि केंद्र सरकारवर तोफ डागली. युपीए म्हणजे ‘उल्टापुल्टा अलायंस’ आज विस्कळीत होत असून राष्ट्रीय लोकशाही आघाडी अधिक बळकट होत आहे.

लोकसभा निवडणुकींसाठी नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे प्रभारी
राजनाथ, डॉ. जोशी, स्वराज, नकवी निवडणूक रिंगणात उतरणार; नायडूंचा नकार
नागपूर, ८ फेब्रुवारी/प्रतिनिधी

लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी यांनी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्राचे प्रभारीपद गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर सोपवले आहे. त्याचबरोबर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह, डॉ. मुरली मनोहर जोशी, सुषमा स्वराज, यशवंत सिन्हा, मुख्तार अब्बास नकवी या ज्येष्ठ नेत्यांची उमेदवारीही जाहीर केली. लोकसभा निवडणुकांपूर्वी पक्षाची रणनिती ठरवणे आणि निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या राष्ट्रीय परिषदेच्या समारोपप्रसंगी विविध राज्यातील प्रभारींची घोषणा करण्यात आली.

क्यू नही बनेगा राम मंदिर? - अडवाणी यांचा सवाल
नागपूर, ८ फेब्रुवारी / प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेत अयोध्येत राम मंदिर बांधण्याचा संकल्प केल्यानंतर त्यावर एनडी़एच्या घटक पक्षांनी आक्षेप घेतल्यानंतरही पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदावर लालकृष्ण अडवाणी यांनीही आज राम मंदिराचा मुद्दा उचलून धरला, या मुद्याला विरोध करणाऱ्यांना त्यांनी ‘क्यू नही बनेगा राम मंदिर’ असा सवाल केला.
दोन दिवसांपासून सुरु असेल्या राष्ट्रीय परिषदेचा समारोप आज अडवाणी यांच्या भाषणाने झाला.

अयोध्येत राम मंदिर आणि विजय संकल्पाने भाजपच्या राष्ट्रीय परिषदेचा समारोप
नागपूर, ८ फेब्रुवारी / प्रतिनिधी

अयोध्येत राम मंदिर उभारणी तसेच, लोकसभा निवडणुकीत विजयाच्या संकल्पाने भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेचा रविवारी दुपारी समारोप झाला. भारतीय जनता पक्षाची राष्ट्रीय परिषद अमरावती मार्गावरील सुभेदार मैदानावर झाली. लोकसभा निवडणुकीत सत्ता प्राप्तीचा शंखनाद या परिषेदत करण्यात आला, हे विशेष. त्याआधी शुक्रवारी राणी कोठीत राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. शनिवार व रविवार असे दोन दिवस राष्ट्रीय परिषद झाली. पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह, नरेंद्र मोदी, शिवराजसिंह चव्हाण, प्रेमकुमार धुमल, बी.सी. खंडुरी, बी. एस. येडीयुरप्पा हे मुख्यमंत्री, ज्येष्ठ नेते मुरलीमनोहर जोशी, यशवंत सिन्हा, व्यंकय्या नायडू, अरुण जेटली, विनय कटियार, मुख्तार अब्बास नकवी, प्रकाश जावडेकर, राजीव प्रताप रुडी, सुषमा स्वराज, सुमित्रा राजे या राष्ट्रीय नेत्यांसह, राज्यसभेच्या माजी उपाध्यक्ष नजमा हेपतुल्ला, माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे हे प्रामुख्याने या परिषदेला उपस्थित होते. छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंह त्यांच्या मातोश्रींचे निधन झाल्याने ते येऊ शकले नाहीत. राजकीय, कृषी व आर्थिक प्रस्तावांवर या परिषदेत चर्चा झाली. राम मंदिराचा विसर पडलेला नाही, हे सांगत राम मंदिर उभारणीची गरज भासल्यास त्यासाठी कायदाही तयार करण्याचा मनोदय या परिषदेत व्यक्त करण्यात आला. लोकसभा निवडणुकीत सत्ता प्राप्त करण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला.

मुख्यमंत्रीपदात स्वारस्य नाही - मुंडे
नागपूर, ८ फेब्रुवारी/ प्रतिनिधी

मुख्यमंत्री होण्यास स्वारस्य नाही. भारतीय जनता पक्षात या पदासाठी अनेक सक्षम नेते आहेत, असे भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष गोपीनाथ मुंडे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. बीड मतदारसंघातून ही निवडणूक लढवण्याची इच्छा पक्षाकडे इच्छा व्यक्त केली आहे. अंतिम निर्णय पक्षाने घ्यायचा आहे, असे मुंडे म्हणाले. पांडुरंग फुंडकर, एकनाथ खडसे व प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी हे नेते या पदासाठी सक्षम आहेत. यापैकी कोणाला मुख्यमंत्री करायचे हे पक्षाला ठरवायचे आहे, असे मुंडे म्हणाले. मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध नाही. मात्र, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आरक्षणाच्या मुद्यावरून मराठय़ांची दिशाभूल करीत आहे, असा आरोप त्यांनी केला.

जगनाडे महाराजांवरील टपाल तिकिटाचे राष्ट्रपतींच्या हस्ते आज गोंदियात प्रकाशन
गोंदिया, ८ फेब्रुवारी / वार्ताहर

जगनाडे महाराजांवरील टपाल तिकिटाचे प्रकाशन आणि मनोहरभाई पटेल स्मृती सुवर्णपदकांचे वितरण राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते उद्या, ९ फे ब्रुवारीला गोंदियात होणार आहे. केंद्र सरकारच्या दूरसंचार मंत्रालयाने जगनाडे महाराजांवर टपाल तिकीट प्रकाशित करण्याला नुकतीच मंजुरी दिली. प्रांतिक तेली समाज महासभेने यासाठी पाठपुरावा केला. नागपुरात आयोजित मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे तेली समाजाचे अध्यक्ष रामदास तडस यांनी तिकिटासंदर्भात निवेदन दिले होते. शरद पवारांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री प्रफु ल्ल पटेल यांना पाठपुरावा करण्याबाबत सूचना केली. प्रफुल्ल पटेल यांनी केंद्रीय दूरसंचार मंत्री ए. राजा यांना भेटून संत जगनाडे महाराजांच्या टपाल तिकिटावर मान्यता मिळवून घेतली. मनोहरभाई पटेल स्मृती सुवर्णपदकांचे वितरण राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते ९ फेब्रुवारीला मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयात करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल राहणार आहेत.

कोणत्याही धर्माच्या आराध्य देवतांवर टीका करणे अयोग्य - राजनाथसिंह
नागपूर, ८ फेब्रुवारी / प्रतिनिधी

लोकसभा निवडणुका दृष्टीपथास येताच काँग्रेस आणि भाजपमध्ये टीकेच्या फैरी सुरू झाल्या आहेत. राम मंदिर मुद्यावरून काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी भाजपवर टीका करताच आज त्याला भाजपचे अध्यक्ष राजनाथसिंह यांनी राष्ट्रीय परिषदेत प्रत्युत्तर दिले. दिल्लीत काँग्रेसच्या एका मेळाव्यात सोनिया गांधी यांनी भाजपवर टीका केली असल्याची माहिती राजनाथसिंह यांनी राष्ट्रीय परिषदेत लोकसभा निवडणुकीच्या तयारीवर चर्चा सुरू असताना हस्तक्षेप करून दिली. रामाबद्दल अपशब्द बोलू नका. आराध्य देवाची आराधना करण्याचा सर्वाना अधिकार आहे. रामनामाचा जप करूनच आज सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप समोर आहे. यामुळे कोणत्याही धर्माच्या आराध्य देवतावर टीका करणे योग्य नाही, असेही सिंह म्हणाले. लोकसभेसाठी १०० उमेदवार जाहीर केले आहेत. या महिन्याच्या अखेपर्यंत पूर्ण उमेदवार जाहीर करण्यासाठी राज्य निवडणूक समितीने बैठका घ्याव्या, अशी सूचना करून राजनाथसिंह म्हणाले, आपल्या संघटन शक्तीचा विचार करताना राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मित्रपक्षाच्या शक्तीचाही विचार करा. राष्ट्रीय लोकशाही आघाडीला आता सत्तेपासून थांबवू शकत नाही. विजयी होण्याचा दृढ संकल्प करून समोर जा, आपल्याला निश्चित यश मिळेल. दहशतवाद आम्ही आव्हान म्हणून स्वीकारला आहे. काँग्रेसच्या काळातच तो फोफावला. यापुढे लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही आघाडीचे सरकार दहशतवादाला उखडून फेकेल, असा दावाही राजनाथसिंह यांनी केला.