Leading International Marathi News Daily

सोमवार , ९ फेब्रुवारी २००९

क्रीडा

श्रीलंकेला दिलासा; भारताविरुद्ध एकमेव विजय
कोलंबो, ८ फेब्रुवारी / वृत्तसंस्था
श्रीलंकेने अखेर मालिकेत दिलासा देणारा विजय मिळवला आणि भारताविरुद्ध एकदिवसीय मालिकेत ५-० ने मानहानीकारक पराभव टाळला. श्रीलंकेने आज शेवटच्या लढतीत ६८ धावांनी मिळवलेल्या विजयासह प्रतिष्ठा कायम राखत भारताची सलग नऊ विजयांची मालिकाही त्यांना खंडित करता आली. मालिकेत प्रथमच नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेने तिलकरत्ने दिलशान व कुमार संगकाराच्या तडाखेबंद फलंदाजीच्या जोरावर ५० षटकांत ८ बाद ३२० धावा उभारल्या आणि भारताचा डाव ४८.५ षटकात २५२ धावांवर संपुष्टात आणला. मंगळवारी होणाऱ्या एकमेव ट्वेन्टी-२० सामन्याने भारताच्या श्रीलंका दौऱ्याची सांगता होणार आहे.

इंग्लंडचा फडशा; वेस्ट इंडिजचा १ डाव २३ धावांनी विजय; टेलरचे ५ बळी
जमैका, ८ फेब्रुवारी / वृत्तसंस्था
वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज जेरोम टेलरने कारकिर्दीतली सर्वोत्तम कामगिरी केली आणि काल चौथ्या दिवशी सबिना पार्कवर त्याच्या भेदक माऱ्याने घडलेल्या नाटय़मय घडामोडीनंतर इंग्लंडची पुरती दाणादाण उडाली. १९८०च्या दशकातील विंडीज संघाच्या सुवर्णमय दिवसांना साजेशी कामगिरी काल त्यांनी केली. टेलरच्या या कामगिरीमुळे वेस्ट इंडिज संघाला गेल्या वर्षी याच मैदानावर झालेल्या दारुण पराभवाची सव्याज परतफेडही करता आली. स्टीव्हन हार्मिसनने १२ धावांत ७ बळी मिळवत विंडीजचा तेव्हा खुर्दा उडवला होता. त्याला चोख प्रत्युत्तर देताना टेलरने काल ९ षटकांत केवळ ११ धावात ५ बळी मिळवले आणि इंग्लंडचा दुसऱ्या डावात ५१ धावात खुर्दा उडवला. यजमान वेस्ट इंडिजने १ डाव व २३ धावांनी सलामीची कसोटीजिंकून ४ कसोटी सामन्यांच्या या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. अर्थात सामनावीराचा मानकरीही जेरोम टेलरच ठरला. डावखुरा फिरकीपटू सुलेमान बेनने त्याला या विजयात तोलामोलाची साथ दिली.

दक्षिणेपुढे ‘मिशन इम्पॉसिबल’
विजयासाठी अखेरच्या दिवशी ४४६ धावांची गरज

चेन्नई ८ फेब्रुवारी/ वृत्तसंस्था
उपान्त्य सामना सहज जिंकणारा दक्षिण विभाग दुलीप करंडक स्पर्धेतील अंतिम फेरीत मात्र पश्चिम विभागाच्या हातून पराभूत होणार हे आज जवळपास स्पष्ट झाले आहे. पहिल्या डावात आघाडी मिळवू न शकलेल्या दक्षिण विभागाला पश्चिमेला पराभूत करण्यापासून गत्यंतर नसले, तरी विजयासाठी त्यांच्यापुढे सामन्याच्या शेवटच्या दिवशी ४४६ धावांचे मोठे आव्हान असल्याने त्यांचा पराभव निश्चीत समजण्यात येत आहे. पहिल्या डावात २६० धावांची आघाडी घेतल्यानंतर आज पश्चिम विभागाने त्यांचा दुसरा डाव ४१७ धावांवर घोषित करून दक्षिण विभागापुढे ६७८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिणेचे तीन फलंदाज जलद गतीने धावा करण्याच्या नादात २३२ धावांवर तंबूत परतले असून त्यांच्यासाठी विजयाची वाट खडतर असेल हे नक्की.

राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत महाराष्ट्राला कांस्य
औरंगाबाद, ८ फेब्रुवारी/खास प्रतिनिधी

भुवनेश्वर येथे झालेल्या ३४ व्या राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत औरंगाबादच्या मिहिका मुळे हिने महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करताना सांघिक गटात कांस्य पदक पटकाविले. महाराष्ट्राच्या या संघात मिहिका या शिवाय गौतमी डांगे (नाशिक), सावेरी राठोड (नागपूर) व क्षितिजा गोंधळेकर (कोल्हापूर) यांचा समावेश होता. या स्पर्धेत ३३ राज्यांच्या संघांनी सहभाग नोंदविला होता. महाराष्ट्राने उपउपान्त्य फेरीत चंदीगडचा तर उपान्त्यपूर्व फेरीत पंजाबचा पराभव केला मात्र उपान्त्य फेरीत तामिळनाडू्च्या संघाकडून महाराष्ट्राला पराभव स्वीकारावा लागला. तामिळनाडूने या स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले. मिहिका मुळे ही होलिक्रॉस शाळेची दहाव्या इयत्तेची विद्यार्थिनी आहे.

ऑस्ट्रेलियाचा न्यूझीलंडवर ३२ धावांनी विजय
सिडनी, ८ फेब्रुवारी/पीटीआय

लागोपाठ पाच सामन्यांपासून पराभूत होत असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाने आपली पराभवाची मालिका भेदत आज एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडवर ३२ धावांनी विजय मिळविला.
ऑस्ट्रेलियाचा कप्तान रिकी पॉंटिंगचा अप्रतिम खेळ आणि ब्रॅड हॅडीनच्या १०९ धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ९ गडय़ांच्या मोबदल्यात ३०१ धावा केल्या. या आव्हानाला सामोरे जाताना न्यूझीलंडचा संघ ४७.३ षटकांमध्ये २६९ धावांमध्ये गारद झाला. न्यूझीलंडच्या ग्रँट एलियट याची एकाकी ११५ धावांची खेळीही न्यूझीलंडला विजय मिळवून देऊ शकली नाही. न्यूझीलंडने आपल्या डावाची दमदार सुरूवात करण्याचा प्रयत्न केला. पण धावा वाढविण्याच्या घाईमध्ये न्यूझीलंडने पहिले दोन खेळाडू अवघ्या ६ षटकांमध्ये गमावले. एलियटला सुरूवातीला पीटर फुल्टनची साथ लाभली. त्या जोरावर न्यूझीलंडला चाळिसाव्या षटकापर्यंत ७ बाद २२५ अशी धावसंख्या उभी करता आली. सामन्यातील दहा षटके बाकी असतानाही ऑस्ट्रेलियाला विजयाबाबत पूर्ण खात्री वाटत नव्हती. पण ४५ व्या षटकात एलियटला बाद करण्यात जेम्स होप्सला यश आले आणि ऑस्ट्रेलियाचा विजय निश्चित झाला.