Leading International Marathi News Daily

सोमवार , ९ फेब्रुवारी २००९

विविध

दहशतवाद्यांच्या बालेकिल्ल्यांवर आरपार हल्ले शक्य-लष्करप्रमुख
नवी दिल्ली, ८ फेब्रुवारी/वृत्तसंस्था

२६ नोव्हेंबरला मुंबई शहरावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे तळ लष्करी आरपार हल्ले करून उद्ध्वस्त करणे शक्य होईल काय या महत्त्वाच्या प्रश्नावर भारतीय लष्करप्रमुख दीपक कपूर यांनी असे आरपार लष्करी हल्ले शक्य असल्याचे ठामपणे सांगितले. मात्र तसा निर्णय अमलात आणावयाचा अथवा नाही हा प्रश्न मात्र पूर्णपणे वेगळा आहे, असेही त्यांनी परखडपणे सांगितले. असे आरपार लष्करी हल्ले करणे अजिबात अवघड नाही. हवेतून, किंवा तोफखान्याद्वारा किंवा अन्य मार्गाने हे हल्ले कसे करता येतील याचा आराखडा निश्चितच तयार करावा लागेल. पण हल्ले करताच येणार नाहीत असे नाही, असेही कपूर यांनी सांगितले. जर देशाच्या राजकीय नेतृत्वाने परवानगी दिली तर लष्कर अशा आरपार हल्ल्यांसाठी तयार आहे काय असा प्रश्न लष्करप्रमुखांना विचारला असता ते म्हणाले की काश्मीर आणि नॉर्दन कमांड येथे कायमस्वरूपी लष्कर सज्जच असते आणि तशी सज्जता राष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी आवश्यकही आहे. त्यामुळे लष्कर दहशतवाद्यांच्या तळावर अशा आरपार हल्ल्यांसाठी सज्ज आहे अथवा नाही हा प्रश्नच अप्रस्तूत आहे. कारण आम्ही आमच्यावरील जबाबदारी पूर्णत्वास नेण्यासाठी केव्हाही सज्जच आहोत, असेही त्यांनी वृत्तसंस्थांशी बोलताना स्पष्ट केले. जेव्हा पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यावर रुग्णालयात हृदयशस्त्रक्रिया होणार होती तेव्हा आण्विक हल्ल्यांबाबतचे आदेश अंतिमत: कोण देणार याबाबत संदिग्धता होती. प्रसारमाध्यमांमधून यावर प्रकाशझोत टाकण्यात आला होता. याबाबत छेडले असता कपूर म्हणाले की, जेव्हा प्रसारमाध्यमांमधून हा विषय चर्चिला गेला तेव्हा लोकांसमोर त्यातले गांभीर्य उघड झाले. पण लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये तसा गोंधळ नव्हता. कारण परिस्थितीची आधीच कल्पना असते आणि लष्कर तसे सजग असतेच. हल्ल्यानंतर भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांनी शांत धोरण स्वीकारून पाकिस्तानातील राजकीय नेत्यांना हे दाखवून दिले की हल्ले तुमच्या भूमीवरूनच झाले आहेत आणि हल्ल्यामागचे सूत्रधारही तुमच्या देशातच आहेत. अनेक पुरावे सादर करण्यात आले. मला वाटते की भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांच्या या प्रयत्नांमुळे पाकिस्तानी सरकारला दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्यासाठी बळ मिळत आहे, असेही ते अखेरीस म्हणाले.

‘स्लमडॉग’ ला रायटर्स गिल्डमध्ये सर्वोच्च पुरस्कार
लॉस एंजेलिस, ८ फेब्रुवारी / पी. टी. आय.
ऑस्कर नामांकनांमध्ये आघाडी घेतलेल्या ‘स्लमडॉग मिलिऑनेर’ चित्रपटाने रायटर्स गिल्ड ऑफ अमेरिका पुरस्कारांमधील सर्वोच्च पुरस्कार पटकावून बाजी मारली आहे. २२ फेब्रुवारी रोजी ऑस्कर सोहळा होणार असून त्या पाश्र्वभूमीवर रायटर्स गिल्ड ऑफ अमेरिका पुरस्कार मिळाल्याने महत्त्व प्राप्त झाले आहे. ‘द क्युरिअस केस ऑफ बेंजामिन बटन’ या सिनेमाला सर्वाधिक तर ‘स्लमडॉग..’ ला १० ऑस्कर नामांकने मिळाली आहेत. विकास स्वरूपलिखित ‘क्यू अ‍ॅन्ड ए’ कादंबरीवर ‘स्लमडॉग मिलिऑनेर’ बेतलेला आहे. त्याशिवाय लंडन येथील बाफ्ता पुरस्कारांमध्येही ‘स्लमडॉग..’ला तब्बल ११ नामांकने मिळाली आहेत.

बिल्लू बार्बरमधील ‘बार्बरला’ कात्री
नवी दिल्ली, ८ फेब्रुवारी/पी.टी.आय.

येत्या आठवडय़ात प्रदíशत होत असलेल्या ‘बिल्लू बार्बर’ चित्रपटातील ‘बार्बर’ हा शब्द काढून टाकण्याचा निर्णय अखेर शाहरुख खान यांच्या ‘रेड चिली एंटरटेनमेंट’ने घेतला आहे. देशभरातील नाभिक संघटनांनी ‘बार्बर’ या नावाला आक्षेप घेतला होता. आता चित्रपट ‘बिल्लू’ या नावाने झळकणार असल्याचे शाहरुख खान यांच्या निर्मिती संस्थेने स्पष्ट केले आहे. ‘बिल्लू बार्बर’ या नावामुळे आपल्या समाजाची वाईट प्रतिमा निर्माण होत असल्याचा आरोप नाभिक संघटनांनी करत चित्रपटाच्या नावाला विरोध केला होता. चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान कोणताही वाद निर्माण होऊ नये यासाठी अखेर नमते घेत आज या नावातील ‘बार्बर’ शब्दाला कात्री लावण्यात येण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता चित्रपटाच्या पोस्टर्स आणि होड्रींग्जवर ‘बिल्लू’ हे नाव असेल. तसेच छापून झालेल्या पोस्टर्सवरील ‘बार्बर’ हा शब्द काढून टाकण्यात येईल, असे शाहरुख खान यांनी सांगितले.