Leading International Marathi News Daily                               मंगळवार, १० फेब्रुवारी २००९
राज्य

प्रादेशिक

विविध

व्यापार - उद्योग

क्रीडा

अग्रलेख

विशेष लेख

लोकमानस

व्यक्तिवेध

राशिभविष्य

प्रतिक्रिया

मागील अंक

वृत्तांत


निवडणुकांचे पडघम वाजायला सुरूवात झाली आहे..
उमेदवारांच्या नावांचे झेंडे देखील फडकायला लागले आहेत..
कालचे 'घरभेदे' उद्याचे 'आधारस्तंभ' भासायला लागले आहेत..
जातीपातींची नवी समीकरणे आकाराला येऊ लागली आहेत..
एकीकडे विद्यमान आघाडय़ा बिघडायला लागल्या आहेत,
तर दुसरीकडे नव्या आघाडय़ा जन्म घेताना दिसू लागल्या आहेत..
आघाडी कितवी म्हणावी..
तिसरी, चौथी, पाचवी... की दहावी..
असा प्रश्न पडावा, असं सभोवतालचं वातावरण आहे..
वाट पाहिली जात्येय ती फक्त निवडणूक आयोगाकडून घोषणा होण्याची..
बदलत्या लोकसभा मतदारसंघ क्षेत्रांचा वेध आम्ही वर्षभर घेतोच आहोत..
पण आता आम्हाला हवा आहे, तुमचा अंदाज..
तो सुद्धा तीन सोप्या प्रश्नांच्या उत्तरांमधून..
तुम्ही इतकंच करायचं..
सोबतच्या तीन प्रश्नांची उत्तरं लिहिलेलं कुपन आमच्याकडे लगेच भरून पाठवायचं..
अचूक उत्तरांना बक्षिसं आहेतच..
(कुपन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा)

राष्ट्रपतींच्या ताफ्यातील हेलिकॉप्टर आणि एअर इंडियाचे विमान आमने-सामने
मुंबई, ९ फेब्रुवारी / प्रतिनिधी
वेळ सकाळी साडेनऊची.. एअर इंडियाचे गोवा-मुंबई-दिल्ली आयसी-८६६ हे प्रवासी विमान सुमारे दीडशे प्रवाशांना घेऊन मुंबईहून दिल्लीकडे जाण्यासाठी उड्डाण घेत असतानाच समोरून भारतीय हवाई दलाचे एक चॉपर हेलिकॉप्टर धावपट्टीवर उतरताना पायलटने पाहिले.. आता काय होणार या चिंतने सर्वाच्या काळजाचा ठोका चुकला असतानाच केवळ पायलटच्या प्रसंगावधानामुळे विमानतळावर होऊ घातलेला अनर्थ टळला. पायलटने ‘इमर्जन्सी ब्रेक’ लावून विमानाचे उड्डाण थांबविले नसते तर आज मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना घडली असती.

पोलीस बनण्यासाठी केवळ साडेपाच महिन्यांचे प्रशिक्षण!
अभिजित घोरपडे
पुणे, ९ फेब्रुवारी

पोलीस दलात भरती होणाऱ्या जवानांना ‘पोलीस’ बनविण्यासाठी केवळ साडेपाच महिन्यांचे प्रशिक्षण; त्यातही दीड-दोन महिन्यांचा बंदोबस्ताचा काळ.. प्रशिक्षण असे घाईघाईने उरकण्यात येत असल्याने सध्या अर्धेकच्चे पोलीस तयार होत असून, त्यांचा एकूणच ‘पोलिसिंग’साठी किती उपयोग होणार, याबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. विशेष म्हणजे पोलीस दलात प्रवेशासाठी अकरा महिन्यांच्या परीपूर्ण प्रशिक्षणाची व्यवस्था असताना गेल्या वर्षांपासून पोलीस प्रशिक्षण विद्यालयांमधील हा कालावधी साडेपाच महिन्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. याशिवाय या जवानांना जिल्हा मुख्यालयातील प्रशिक्षणकाळातही इतरच कामे करावी लागत आहेत. त्यामुळे भविष्यातील पोलीस दलाला आकार देणाऱ्या व्यवस्थेचा दर्जा अगदीच खालावत आहे.

पाकिस्तानचा पुन्हा कांगावा
इस्लामाबाद, ९ फेब्रुवारी/वृत्तसंस्था

पाकिस्तानचे पंतप्रधान युसुफ रजा गिलानी हे उद्या, मंगळवारी मुंबई हल्ल्यांबाबत भारताने पाकिस्तानकडे सादर केलेल्या पुराव्यांवर प्रथमच भाष्य करणार असल्याची माहिती पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिली असली तरी भारताने दिलेल्या पुरेशा पुराव्यांअभावी या हल्ल्यांबाबतची चौकशी करणे फार मुश्किल झाले असल्याचा सूर पंतप्रधान गिलानी यांच्या लष्कराचे अधिकारी आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसोबत सोमवारी झालेल्या बैठकीत आळवण्यात आला आहे. या हल्ल्यांबाबत पाकिस्तानात अखेर खटला दाखल होईल ही भारताची अपेक्षा अपूर्ण राहण्याचीच शक्यता असून पुरसे पुरावे नसल्याचे कारण देऊन पाकिस्तान भारतीय सरकारकडे आणखी काही प्रश्न उपस्थित करण्याचीच शक्यता आहे.

स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांना आज ‘भारतरत्न’ देणार
पुणे, ९ फेब्रुवारी/खास प्रतिनिधी

स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांना देशातील सर्वोच्च नागरी ‘भारतरत्न’ पुरस्काराने उद्या, मंगळवारी त्यांच्या राहत्या घरी सन्मानित करण्यात येणार आहे. पंडितजींच्या प्रकृतिअस्वास्थ्यामुळे केंद्रीय गृहमंत्रालयाने हा निर्णय घेतला असून, केंद्रीय अतिरिक्त गृह सचिव ए. एफ. अहमद यांच्या हस्ते हा सोहळा होणार आहे. देशातील हा सर्वोच्च नागरी सन्मान राजधानी दिल्लीमधील राष्ट्रपती भवनामध्ये समारंभपूर्वक दिला जातो; परंतु पंडितजींची प्रकृती बरी नसल्याने त्यांना घरीच हा पुरस्कार दिला जाणार आहे.

काँग्रेसचे पवारांशी पटेना आणि पवारांवाचून करमेना !
संतोष प्रधान
मुंबई, ९ फेब्रुवारी

राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या दबावापुढे काँग्रेसचे राष्ट्रीय नेतृत्त्व नेहमीच झुकते, अशी टीका सातत्याने केली जात असतानाच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी अशोक चव्हाण यांची झालेली निवड, निवडणूकपूर्व राष्ट्रीय स्तरावर आघाडी करण्याची फेटाळली गेलेली पवारांची सूचना, तसेच महाराष्ट्रातील जागावाटपावरून काँग्रेसने घेतलेली आक्रमक भूमिका यावरून काँग्रेस नेतृत्वाने आता पवारांशी फटकून वागायला सुरुवात केली असल्याचे संकेत मिळत आहेत. या पाश्र्वभूमीवर पवारही काँग्रेसला जेरीस आणण्याची संधी सोडणार नाहीत, अशी एकूणच चिन्हे आहेत.

श्रीराम सेनेपासून देशाला धोका - चिदंबरम
कोल्लम, ९ फेब्रुवारी/पीटीआय

श्रीराम सेनेपासून देशाला धोका निर्माण झाला आहे. या संघटनेने साऱ्या मर्यादा ओलांडल्या आहेत असे केंद्रीय गृहमंत्री पी. चिदम्बरम यांनी आज येथे पत्रकारांना सांगितले. श्रीराम सेनेच्या हालचालींवर केंद्र सरकारचे बारीक लक्ष ठेवून आहे. या संघटनेवर कर्नाटक सरकार कठोर कारवाई करेल अशी केंद्राची अपेक्षा आहे असेही चिदम्बरम पुढे म्हणाले. श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी संस्कृतीरक्षणाच्या नावाखाली मंगलोर येथे गेल्या २४ जानेवारी रोजी पबमध्ये घुसून तेथील युवती, महिलांना बेदम मारहाण केली होती.

‘श्रीराम सेने’वर बंदी घालण्यास संघ अनुकूल
बंगळुरू, ९ फेब्रुवारी/ पीटीआय

श्रीराम सेनेवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच श्रीराम सेनेवर बंदी घालण्याचा निर्णय सरकारने घेतला तर त्यास आपला विरोध असणार नाही, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्पष्ट केले आहे. संघाच्या दक्षिण-मध्य विभागाचे सचीव के. नरहरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, माणसांवर हल्ला करणे हे निंदाजनक असल्याचे संघाचे मत आहे. संघाचा व श्रीराम सेनेचा कोणताही संबंध नाही.

ऑस्ट्रेलियातील वणव्यामध्ये १३५ ठार
घातपाताचा संशय
मेलबोर्न, ९ फेब्रुवारी/पी.टी.आय.

ऑस्ट्रेलियातील ‘व्हिक्टोरिया’ हे राज्य तेथे लागलेल्या आगीच्या वणव्यामध्ये बेचिराख होण्याच्या मार्गावर असून एकूण १३५ नागरिक आगीत होरपळून मरण पावले आहेत. मात्र हा वणवा पध्दतशीरपणे लावण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला असून घातपाताचा संशयही व्यक्त केला आहे. शनिवारी रात्री व्हिक्टोरिया राज्यामध्ये वाढलेले तापमान आणि वादळी वाऱ्यांमुळे ठिकठिकाणी आगी लागल्या. ३१ आगी अजूनही शमलेल्या नाहीत. या आगीमुळे अनेक वसाहती उद्ध्वस्त झाल्या असून जळालेली घरे, बंगले आणि बेघर झालेली कुटुंबे असे करुण दृश्य सर्वत्र दिसत आहे. या वणव्यात जी कुटुंबे बेघर झाली आहेत त्यांचे पूर्ण पुनर्वसन करण्याचा संकल्प ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान केविन रुड यांनी जाहीर केला असला तरी या आगी पध्दतशीरपणे लावण्यात आल्याच्या साशंकतेतून नागरिकांमध्ये प्रचंड चीडही निर्माण झाली आहे. ‘हेल्स फ्युरी’ म्हणजे नरकाचा रुद्रावतार असे या दुर्घटनेचे वर्णन पंतप्रधान रुडी यांनी केले आहे. व्हिक्टोरिया राज्याच्या पाठी सर्व ऑस्ट्रेलिया असून या सर्व बेघर झालेल्या नागरिकांचे आम्ही पुनर्वसन करणार आहोत, असे आश्वासन रुडी यांनी दिले. या आगींमध्ये मोठय़ा प्रमाणावर घरे जळाली असून तीन लाख ३० हजार हेक्टर जमीनही भाजून निघाली आहे. दरम्यान, या आगींमधील मृत नागरिकांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

मराठा समाजाला राजकीयदृष्टय़ा आरक्षणाची गरज काय - पवार
बेल्हे, ९ फेब्रुवारी/वार्ताहर

पुणे जिल्ह्य़ात अठरापैकी तेरा आमदार मराठा समाजाचे असताना राजकीय दृष्टीने मराठा समाजाला आरक्षणाची गरज काय,असा सवाल केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आज आळेफाटा येथे केला. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत बोलताना इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता, मराठा समाजातील अल्प भूधारक शेतकऱ्यांच्या (गरीब) कुटुंबातील व्यक्तीकरिता शैक्षणिक व सरकारी सेवेतील नोकरीबाबत आरक्षण करण्याविषयी राज्य शासनाला सूचना करणार असल्याचे ते म्हणाले.

झाकीर हुसेन यांना ग्रॅमी अ‍ॅवॉर्ड!
लॉस एंजेलिस, ९ फेब्रुवारी / पीटीआय

लंडनमध्ये ‘बाफ्टा’ पुरस्कार सोहळ्यात ‘स्लमडॉग मिलेनिअर’ ‘सप्तसुरां’च्या हिंदोळ्यांवर हेलकावे घेत असताना तबलानवाज झाकीर हुसेन यांना ‘ग्लोबल ड्रम प्रोजेक्ट’ या संयुक्त अल्बमसाठी अमेरिकेतील लॉस एंजलिस येथे रविवारी झालेल्या समारंभात ग्रॅमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘कन्टेम्पररी वर्ल्ड म्युझिक अल्बम’ या गटातील ग्रॅमी पुरस्कार झाकीर हुसेन यांना देण्यात आला. ‘ग्लोबल ड्रम प्रोजेक्ट’ या हा अल्बममध्ये झाकीर हुसेन यांच्यासोबत मिकी हार्ट, नायजेरियन कलाकार सिकिरू अ‍ॅडेपोजू आणि पोर्तो रिकाचे जाझ कलावंत गिओव्हान्नी हिडाल्गो यांनी वादन केले आहे.

नक्षलवादी हल्ल्यात आठ पोलीस ठार
नावदा, ९ फेब्रुवारी / पी.टी.आय.

गडचिरोलीतील नक्षलवाद्यांनी काही दिवसांपूर्वी घडवलेल्या पोलिसांच्या नरसंहाराच्या वृत्ताची शाई अद्याप वाळली नसतानाच बिहारच्या नावदा जिल्ह्य़ात नक्षलवाद्यांनी आठ पोलिसांचे निर्घृण हत्याकांड घडवून आणले. भाकप माओवादी संघटनेच्या नक्षलवाद्यांनी हा हल्ला केल्याची माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालक नीलमणी यांनी येथे दिली. बिहार-झारखंड सीमेवरील नक्षलवादग्रस्त नावदा जिल्ह्य़ातील माहुलीतंद खेडय़ातील कौवाकोल पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. संत रविदास जयंतीनिमित्त या भागाती सुरक्षा वाढवून विशेष पोलीस पथक नक्षलवाद्यांच्या मागावर पाठवण्यात आले होते. नक्षलवाद्यांना याचा सुगावा लागल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यावरच हल्ला चढवून अंदाधुंद गोळीबार केला. यात आठ पोलिसांचा जागीच मृत्यू झाला तर फौजदार रामेश्वर राम गंभीर जखमी झाले. पोलिसांजवळील शस्त्रे नक्षलवाद्यांनी पळवून नेली.

अफगाणिस्तानातील अपहृत भारतीयाची हत्या
नवी दिल्ली, ९ फेब्रुवारी / पीटीआय

चार महिन्यांपूर्वी अफगाणिस्तानातून अपहरण करण्यात आलेल्या भारतीय नागरिकाची खंडणी न मिळाल्याने ‘मुजाहिद्दीन’ संघटनेच्या दहशतवाद्यांनी हत्या केली. ३८ वर्षीय सायमन परमानंदन हा इटालियन फूड कंपनी ‘फियानो’त शेफ म्हणून नोकरीला होता. त्याचे १३ ऑक्टोबर २००८ रोजी ‘मुजाहिद्दीन’ या दहशतवादी संघटनेने अपहरण करून दीड लाख अमेरिकन डॉलर्सची खंडणी मागितली होती.परमानंदन तामिळनाडूच्या विल्लूपूरमचा रहिवासी आहे.

आर्थिक विकासदराला मंदीचे ग्रहण
चालू वित्तीय वर्षांत ७.१ टक्के दराचा अंदाज
नवी दिल्ली, ९ फेब्रुवारी/खास प्रतिनिधी

जागतिक आर्थिक मंदीचे ग्रहण लागल्यामुळे औद्योगिक, उत्पादन, कृषी, सेवा आणि वित्तीय सेवा क्षेत्रांमध्ये चौफेर घसरण होत असल्याचे स्पष्ट झाले असून चालू वित्तीय वर्षांत आर्थिक विकासाचा दर अंदाजे ७.१ टक्के इतका राहण्याची शक्यता आहे. गेल्या पाच वर्षांत प्रथमच आर्थिक विकासाचा दर सात टक्क्यांच्या जवळपास घसरला आहे. केंद्रीय सांख्यिकी संघटनेने व्यक्त केलेला हा अंदाज खरा ठरल्यास मागच्या वित्तीय वर्षांच्या तुलनेत आर्थिक विकासाच्या दरात १.९ टक्क्यांनी घसरण होईल. पण सध्याच्या आर्थिक मंदीच्या वातावरणात विकासाचा हा दर आशा पल्लवित करणारा असल्याचे मत केंद्रीय वित्त सचिव अरुण रामनाथन यांनी व्यक्त केले. खनिकर्म क्षेत्राचा अपवाद वगळता आर्थिक विकासात हातभार लावणाऱ्या सर्वच क्षेत्रांमध्ये चालू वित्तीय वर्षांत घसरण होत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. औद्योगिक आणि उत्पादन क्षेत्रापाठोपाठ कृषी क्षेत्रात विकासाचा दर घसरला आहे. सेवा तसेच वित्तीय सेवा क्षेत्रातही घसरगुंडी उडत असल्याचे केंद्रीय सांख्यिकी संघटनेने दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

 

लोकसत्ता दिवाळी अंक २००८


प्रत्येक शुक्रवारी


दिवाळी २००८