Leading International Marathi News Daily

बुधवार, ११ फेब्रुवारी २००९

लोकमानस

राजकारण्यांनी धडा घ्यावा
‘कलियुगाचे आव्हान’ हा ‘त्रिकालवेध’ सदरातील लेख (३१जानेवारी) वाचनीयच आहे. ‘जागतिक युद्ध’ अटळ असल्याचा त्यातला सूर वस्तुस्थितीचे कथन करतो. मात्र लेखात दोन महायुद्धांच्या विध्वंसक परिणामांबाबतच्या विवेचनात, ‘हिटलर आणि स्टॅलिन दोघांनी युद्ध नसतानाच्या २० वीस वर्षांत एक कोटी माणसे ठार मारली’, असे म्हटले असून हिटलरच्याच काळ्याकुट्ट अमानवी कार्याप्रमाणे कॉम्रेड स्टॅलिनच्या कार्याचा जो आढावा केतकर यांनी (इतिहासकारांच्या नावाने) मांडला आहे, तो अत्यंत चुकीचा आहे, असे म्हणावे लागते. खरेतर या दोन व्यक्तींच्या कार्याचा आढावा सदराच्या मर्यादेत देता येणार नाही.

 

इतिहासाचा व राजकारणाचा गंभीर अभ्यास करणाऱ्यांनी त्याबाबत स्वतंत्रपणे इतिहासाच्याच आधारे चिंतन करायला हवे. केतकर यांनी त्यांच्या लेखात कॉम्रेड स्टॅलिनच्या कार्याचे मूल्यांकन करताना वाचकांना हेच आव्हान केले असावे, असा माझा समज आहे. कॉम्रेड स्टॅलिन हे हिटलरप्रमाणे ‘हुकूमशहा’ नव्हते, एवढेच नव्हे तर ते ‘युद्धाच्या समयी कुशल योद्धे होते व खऱ्या जागतिक शांतीसाठी सातत्याने जनताभिमुख शांतिदूत म्हणूनच कार्यरत होते,’ हे प्रतिपादन करताना दोन पुरावे सादर करीत आहे.
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूजी यांनी कॉम्रेड स्टॅलिन यांना श्रद्धांजली अर्पण करताना ५ मार्च १९५३ रोजी म्हटले, ‘आम्ही मार्शल स्टॅलिनबद्दल विचार करतो तेव्हा मागील ३५ वर्षांच्या इतिहासाची मालिका डोळ्यांपुढे येते. आम्ही सर्व याच युगाचे संतान आहोत. मार्शल स्टॅलिननी इतिहासाला प्रभावित केले. ‘शांती आणि युद्ध’ या दोन्हीतही त्यांनी स्वत:चे श्रेष्ठत्व जगाला पटवून दिले. त्यांनी दुर्दम्य इच्छाशक्तीने व असामान्य हिमतीने ‘शांती व युद्ध’ यांची ओळख करून दिली. या काळाचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा या गोष्टींवर सर्वाचे एकमत होईल की, मार्शल स्टॅलिन एक फार मोठय़ा व्यक्तिमत्त्वाचे पुरुष होते, ज्यांनी आपल्या युगाच्या भाग्याची निर्मिती केली. त्यांनी आपल्या देशाला जगात महाशक्ती म्हणून महान बनविले. त्यांनी आपल्या प्रतिमेचा व प्रतिभेचा उपयोग नेहमी शांतीच्या हक्कासाठी केला आहे. त्यांच्या मृत्यूनंतरसुद्धा शांततेच्या कामी त्यांची शिकवण उपयोगात आणली जाईल अशी आशा मी बाळगतो.’
अ‍ॅना लुईस स्ट्राँग या अमेरिकेतील पत्रकार व साहित्यिक. त्यांनी कॉम्रेड स्टॅलिनबाबतचा अनुभव त्यांच्या ‘स्टॅलिन इरा’ या पुस्तकात मांडला आहे. ‘स्टॅलिनचे विरोधक व त्यांचे समर्थन करणाऱ्या लेखकांचा एक वर्ग सतत म्हणत आला आहे की, स्टॅलिनने दांडगाई करून व हीन मार्गाने बहुमत आपल्या बाजूला करून घेतले. पण स्टॅलिनशी चर्चा करण्याची संधी मिळाली ते कोणीही असा आरोप करणार नाहीत.’ असे त्यांनी नोंदवले आहे. ‘बहुसंख्याकांच्या इच्छा डावलून निर्णय घेता येतात, असे मानणारा तो हुकूमशहा नव्हता. बहुमत आपल्या बाजूला कसे वळवायचे, किंवा बहुमत कसे तयार केले जात असे हे त्याला चांगलेच माहीत होते, तथापि त्या मार्गाचा अवलंब करण्याची त्यास गरज भासली नाही. स्टॅलिन यांच्या वैशिष्टय़पूर्ण पद्धतीमुळे बिनीच्या कार्यकर्त्यांत, वैज्ञानिकांत व कोटय़वधी जनतेत आत्मविश्वास द्विगुणित झाला व त्यांच्याद्वारे पंचवार्षिक योजना फळाला आली आणि ‘एका देशात समाजवाद स्थापन करण्याचे’ रशियन जनतेचे स्वप्न साकार झाले.’ या दाखल्यांवरून हे सिद्ध होत आहे की, हेर हिटलरच्या मालेत कॉम्रेड स्टॅलिन नव्हतेच नव्हते. सत्ताधारी वर्ग वैचारिक व हेतुप्रवर्तक योजना राबवितात तेव्हा त्याला विरोध करणाऱ्यांना वर्गीय रूपाचे शासन मोडून काढते. कॉम्रेड स्टॅलिन यांनी जनहिताच्या पंचवार्षिक योजना राबविल्या तेव्हा मेनशेव्हिकांनी आणि ट्रॉटस्कीवाद्यांनी विरोध केला. त्यावेळच्या शेतकऱ्यांच्या हत्यांना जबाबदार आहेत मेनशेव्हिकच. म्हणून कॉम्रेड स्टॅलिन यांना आणि रशियाच्या समाजवादी शासनास कसे जबाबदार धरता येईल?
सुंदर नवलकर, दादर, मुंबई

निष्काळजी महाराष्ट्र सरकार
‘अ-नामी अनामी’ (७ फेब्रुवारी) या अग्रलेखात म्हटले आहे की, ‘अनामी रॉय हे ढीग कार्यक्षम आहेत, पण त्यांची नियुक्ती इतरांची सेवाज्येष्ठता डावलून केली जाणे योग्य होते की नाही असा प्रश्न आहे.’ मुळात उच्चपदस्थांच्या बढत्या निव्वळ सेवाज्येष्ठतेवर अवलंबून नसतात, तिथे मेरिट-कम-सीनियॉरिटी पाहिली जाते. त्यामुळे सरकार उच्च न्यायालयात हरले म्हणजे सरकारचा रॉय यांना बढती देण्याचा निर्णय सर्वस्वी चुकीचा असेल असे समजण्याचे कारण नाही. त्यात मतभेद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.या निमित्ताने एक खेदजनक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे, आपले महाराष्ट्र सरकार सतत कोर्टाकडून थपडा खात असते. काही वर्षांत असे अनेक वेळा घडले आहे. कनिष्ठ महाविद्यालयातील प्रवेशासंदर्भातही पर्सेटाईल सूत्राच्या खटल्यात सरकारची बाजू न्याय्य असतानाही हेच घडले आहे. याचा अर्थ खटल्यांशी संबंधित प्रशासकीय अधिकारी व सरकारची बाजू मांडणारे वकील आपल्या कामात पाहिजे तेवढे लक्ष घालीत नसावेत व न्यायप्रविष्ट प्रकरणांचा पुरेसा अभ्यास करीत नसावेत असा होतो.
शरद कोर्डे, ठाणे

आरोग्य बँकांचे स्वागत
‘मुक्त विद्यापीठाच्या सहकार्याने आता राज्यात आरोग्य बँका’ ही बातमी व त्यासंबंधीचे विचार वाचून (१८ जानेवारी) सुखद धक्का बसला.
अशा प्रकारच्या आरोग्य बँकांची स्थापना लवकरच राज्यात होत आहे, ही महाराष्ट्राला नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. नेहमीच्या आरोग्य समस्यांसाठी अत्यल्प खर्चात प्राथमिक उपचार, रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार अशा प्रकारच्या रोगांवर तात्काळ उपचार झाल्यास रोगी अशा रोगांपासून नक्कीच वाचू शकतो.अधिक वेळ न दवडता यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या आरोग्य विद्या शाखेने ग्रामीण भागात अशा प्रकारच्या बँका उघडून व त्या सर्व सुविधांनी कार्यरत करणे ग्रामीण जनतेला लाभदायक ठरणार आहे.
रमाकांत चौलकर, अभ्युदयनगर, मुंबई

दहशतवाद्यांना झुकते माप कशासाठी?
‘इथे असं आक्रित घडलं’ (२६ जानेवारी) हा आशा दामले यांचा लेख वाचला. कसाबसारखे तरुण इतरांना कंठस्नान घालणे हा पैसा मिळविण्याचा मार्ग समजतात, अशा भ्रमात कुणी नाही. पण पैसा व धर्माधता एकत्र आल्यावर हिंसा घडते त्याचं काय? कसाब व इतर नऊ मिळून दहा जणांसाठी ज्या कंपनीने एक कोटीपेक्षा अधिक पैसा खर्च केला, त्यांचे पण पुनर्वसन करायचे का? त्या कंपनीला कसाब व नऊ देशबांधवांसाठी शिक्षण, व्यवसाय यात मदत करता आली नसती का?
अमेरिकेने जे राजकारण केले त्यात पाकिस्तानमधल्या राजकारणी लोकांचा हात नव्हता? त्यांनी आपल्याच राष्ट्रातल्या या तरुणांचे शिक्षण व्यवसाय व आरोग्यासाठी काहीच करायचे नाही? आशा दामले यांनी त्यांना एकदम सूट दिली आहे. म्हणजे आईने आपल्या मुलांना सांभाळण्याचे नाकारले तरी चालेल म्हणण्यासारखे हे आहे.अमेरिकेने पाकिस्तानमधल्या बेकार तरुणांकरिता शिक्षण, व्यवसाय व आरोग्यासाठी प्रयत्न करावे हे महान वाक्य सगळ्यांना खूप आवडेल. पण ते शक्य नाही. अमेरिकन जनता ओबामांना सांगेल की आधी घरातल्या बेकारांचा प्रश्न सोडवा. काश्मीरमधले दहशतवादी, नक्षलवादी हेही धट्टेकट्टे तरुण आहेत. त्यांना प्रेमाने मार्गी लावणेही प्राधान्याने व्हावे.
मंदाकिनी गोगटे, शीव, मुंबई