Leading International Marathi News Daily

बुधवार, ११ फेब्रुवारी २००९

पंतप्रधानपदाची अपेक्षा नाही- पवार
सोलापूर, १० फेब्रुवारी/प्रतिनिधी

पंतप्रधानपदासाठी शिवसेनेने पाठिंबा दिला असला तरी त्यांचे मतांचे बळ पाहता आम्ही कोठे आहोत व यासाठी मतांचे गणित आपणास चांगले समजते. त्यामुळे आपण भलत्या अपेक्षा ठेवत नाही, असे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सांगितले. श्री. पवार मंगळवारी विविध कार्यक्रमांसाठी येथे आले असताना हॉटेल हेरिटेज येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, लोकसभा निवडणूक लढविण्याची आपली इच्छा नाही. लोकांनी तशी इच्छा व्यक्ती केली आहे.

विमानसेवेमुळे सोलापूरच्या विकासाचा नवा टप्पा गाठेल - पवार
सोलापूर, १० फेब्रुवारी/प्रतिनिधी

सोलापुरात सुरू झालेल्या विमानसेवेमुळे स्थानिक विकासाचा नवा टप्पा गाठला जाईल, असा विश्वास केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केला. ही विमानसेवा कायमस्वरूपी राहण्यासाठी प्रतिसाद देण्याचे आवाहनही त्यांनी सोलापूरकरांना केले. भारताची पहिली आणि एकमेव पंचतारांकित विमान वाहतूक कंपनी ‘किंगफिशर एअरलाईन्स’ येत्या १७ फेब्रुवारीपासून मुंबई-सोलापूर दरम्यान नियमित विमान फेऱ्या सुरू करणार आहे.

पालिकेसाठी खुले भूखंड शोधून देण्यासाठी अतिक्रमण करणाऱ्याच्या नेतृत्वाखाली सांगलीत समिती
सांगली, १० फेब्रुवारी / प्रतिनिधी
सांगली महापालिकेच्या खुल्या भूखंडाचा शोध घेऊन ही मालमत्ता महापालिकेच्या नावे करण्यासाठी स्थायी समितीच्या सभेत नगरसेवक मनगू आबा सरगर यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांची एक समिती नियुक्त करण्याचा निर्णय मंगळवारी घेण्यात आला. विशेष म्हणजे मनगू सरगर यांनीच महापालिकेच्या डीपी रस्त्यावर अतिक्रमण करून कंपाऊंड घातले आहे. गेल्या चार महिन्यापासून साधे कंपाऊंड काढण्याचे धारिष्टय़ही महापालिका प्रशासनाने दाखवलेले नाही. अशावेळी त्यांची केलेली ही निवड वादग्रस्त ठरली आहे.

सातारा जिल्ह्य़ातील नेते ‘लिक्वीडेशन’मध्ये - उदयनराजे
‘मला अडवण्याची भाषा करणाऱ्यांची वाट लावीन ’
सातारा, १० फेब्रुवारी / प्रतिनिधी
सातारा जिल्ह्य़ातील सर्व नेते लिक्वीडेशनमध्ये निघाले आहेत. त्यांच्या हातून काहीही भले होणार नाही. जिल्ह्य़ाचे पाणी वीज बाहेर फळवून नेली जात आहे. ते रोखून धरण्याची हिंमत फक्त माझ्याच मनगटात आहे. सातारा जिल्ह्य़ाचा मी वाघ आहे. परजिल्ह्य़ातील शेळ्यामेंढय़ांना खाऊन टाकीन माझ्या नादाला कुणी लागू नका. मला आडवण्याची भाषा करणाऱ्यांची वाट लावीन अशा कणखर शब्दात माजी महसूल राज्यमंत्री उदयनराजे भोसले यांनी काँग्रेसच्या नेत्यांना आव्हान दिले.

बफेलो पॉक्सग्रस्त जनावरांच्या तपासणीसाठी पुण्याचे पथक
गडिहग्लज, १० फेब्रुवारी / वार्ताहर

गडिहग्लज तालुक्याच्या पूर्व भागामध्ये फैलावलेल्या बफेलो पॉक्स या आजाराच्या संशोधनासाठी पुण्यावरून रोग अन्वेषण विभाग व राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेचे खास पथक आज दाखल झाले. संसर्ग झालेल्या रुग्णांचे व जनावरांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.तालुक्याच्या पूर्व भागातील दुंडगे, माद्याळ, मुगळी, खणदाळ, बडय़ाचीवाडी, चन्न्ोकुप्पी आदी गावांमध्ये बफेलो पॉक्स या रोगाची जनावरांना लागण झाली. कानातून पू येणे, पुरळ येणे आदी या रोगाची लक्षणे आहेत. या रोगाचा संसर्ग माणसांनाही झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली. बफेलो पॉक्सची लागण झालेले सुमारे १५०० रुग्ण आढळले आहेत. आज यामध्ये नव्याने १५० रुग्णांची भर पडली आहे. यापैकी ४५० रुग्ण बरे झाले आहेत.या रोगाच्या संशोधनासाठी आज गडिहग्लजमध्ये रोग अन्वेषण विभाग व राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेचे खास पथक पुण्यावरून दाखल झाले. सहायक आयुक्त डॉ.एस.व्ही.पाठक, सहायक आयुक्त डॉ.ए.एस.पोटेकर, डॉ.सी.जी.राऊत, डॉ.ए.एम.कुलकर्णी यांच्या पथकाने बडय़ाचीवाडी व चन्न्ोकुप्पी येथे जाऊन आजाराची लागण झालेल्या रुग्णांचे व जनावरांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतले. या पथकासोबत पंचायत समितीच्या सभापती सौ.आशादेवी तेली,उपसभापती दीपक जाधव, तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ.विजय कडलगे, डॉ.अथणी आदी होते.

पारधी समाजाचे आजपासून सांगली राहुम्टी आंदोलन
सांगली, १० फेब्रुवारी / प्रतिनिधी

पारधी समाजाच्या विविध मागण्यांसाठी गेल्या सहा दिवसापासून दलित महासंघाच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू असून या आंदोलनाची प्रशासनाने दखल न घेतल्याने उद्या बुधवार दि. ११ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच राहुटी आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.आदिवासी पारधी समाजाला जागा, घर, जमिन व शाळा द्याव्यात, या मागणीसाठी दलित महासंघाच्यावतीने आंदोलन सुरू आहे. पण या आंदोलनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. प्रत्येक गावात दोन गुंठे शासकीय जागा द्यावी, गायरान जमिनी कसण्यासाठी द्याव्यात, पारधी समाजाला घरकुल बांधून द्यावे, पोलिसांकडून होणारा नाहक त्रास थांबवावा, पारधी मुलांना आश्रमशाळा मंजूर कराव्यात आदी मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे. पण या आंदोलनाची दखल न घेतल्याच्या निषेधार्थ उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राहुटी आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. या आंदोलनात दलित महासंघाचे शशिकांत नांगरे, चंद्रकांत चव्हाण, नंदकुमार होळकर, सुनिल आवळे, कारकुन्या पवार, पिटय़ा पवार, महिमान्या काळे, शेखर काळे, निर्मला पवार, जितेंद्र काळे, इंद्रजित काळे, कोकण्या पवार, अंकुश काळे, राकेश काळे यांच्यासह अनेक पारधी समाजातील नागरिक सहभागी झाले आहेत.

बिगरशेती अडवणूक प्रश्नी सोलापुरात आज आंदोलन
सोलापूर, १० फेब्रुवारी/प्रतिनिधी

माळढोक पक्ष्यांचे निमित्त साधून सोलापूर शहरातील मिळकतदारांच्या बिगरशेतीच्या प्रकरणात शासन विनाकारण अडवणूक करीत असून, त्याविरुद्ध तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा भाजपचे आमदार विजय देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिला.शहरातील ज्या मिळकतदारांचे बिगरशेतीचे प्रकरण शासनाकडे दाखल आहे, त्या मिळकतदारांचे लेआऊट महापालिका आयुक्तांनी मंजूर केले आहे. या सर्व मंजूर मिळकती वन खात्याच्या बंधनात नाहीत. शासनाने २००४ मध्ये शहर विकास आराखडा मंजूर केला. त्या आराखडय़ात ज्या रहिवासी झोनचा समावेश आहे, अशांनीच शासनाकडे बिगरशेतीची मागणी केली असताना शासन अडवणूक करीत आहे. त्यामुळे शेकडो लोकांच्या जमिनीची खरेदी-विक्री थांबली असून, शहराच्या सर्वागीण विकासाला खीळ बसत असल्याचे आमदार देशमुख म्हणाले.एकीकडे शासन अडवणुकीचे धोरण सामान्य लोकांसाठी स्वीकारत असताना दुसरीकडे सोलापूर विद्यापीठ, डाळिंब संशोधन केंद्र, सहापदरी रस्ता व अन्य शासकीय कामांच्या संदर्भात कसल्याही नियमांचे बंधन पाळत नाही. या प्रश्नाबाबत येत्या ११ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन व त्यानंतर नागरिकांचा भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस नगरसेवक बाबूभाई मेहता, प्रताप चव्हाण, देविदास येळेकर, धनेश स्वामी, मल्लिकार्जुन अक्कळवाडी, बसवराज देशमुख, महेश भंडारे, गौस ट्रंकवाले आदी उपस्थित होते.