Leading International Marathi News Daily                                 बुधवार, ११ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

पंतप्रधानपदाची अपेक्षा नाही- पवार
सोलापूर, १० फेब्रुवारी/प्रतिनिधी

 

पंतप्रधानपदासाठी शिवसेनेने पाठिंबा दिला असला तरी त्यांचे मतांचे बळ पाहता आम्ही कोठे आहोत व यासाठी मतांचे गणित आपणास चांगले समजते. त्यामुळे आपण भलत्या अपेक्षा ठेवत नाही, असे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सांगितले.
श्री. पवार मंगळवारी विविध कार्यक्रमांसाठी येथे आले असताना हॉटेल हेरिटेज येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, लोकसभा निवडणूक लढविण्याची आपली इच्छा नाही. लोकांनी तशी इच्छा व्यक्ती केली आहे. आपण राज्यसभेत गेलो तर मागच्या दाराने आलो असे कोणीही म्हणणार नाही. शिवसेनेने आपणास पंतप्रधानपदासाठी पाठिंबा दिला असला तरी या पदासाठी लागणारे मतांचे गणित आपणास चांगले ठाऊक आहे. त्यामुळे तशी अपेक्षा आपण ठेवली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसने कोणत्याही पक्षाशी राष्ट्रीय पातळीवर निवडणुकीत युती न करण्याची भूमिका घेतल्यामुळे कोणत्याही संदर्भात त्या पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करण्याचा संबंध नाही. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस गोव्यात आणि गुजरातमध्ये काँग्रेसशी वाटाघाटी करावी, अशी परिस्थिती आहे. बिहारमध्ये लालूप्रसाद यांच्या नेतृत्वाखालील राजद या पक्षाशी आमची सामंजस्याची भूमिका आहे. अरूणाचल, मेघालय, नागालॅन्ड येथे तेथील स्थानिक पक्षांशी आमची युती राहील. केरळमध्ये यापूर्वी डाव्या आघाडीबरोबर एकत्र येऊन निवडणूक लढविली होती. परंतु या आघाडीने आता वेगळी भूमिका घेतली आहे. त्यांच्या भूमिकेत बदल झाल्यास त्यांच्याशी संपर्क साधता येईल, असे पवार यांनी सांगितले.
राज्यात जागा वाटपाच्या संदर्भात रिपब्लिकन पक्षाला सहभागी करून घेण्याची सूचना आपण दिली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये जागा वाटपाबाबत प्राथमिक चर्चा झाली असून अंतिम चर्चा अद्याप झाली नाही. राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने जिल्हा पातळीवर चर्चा झाल्यानंतर राज्याचे नेतृत्व उमेदवारांची यादी ठरविणार असून त्यानुसार अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. ज्या जागेवर निश्चित विजय होईल, ते सूत्र ठरवून तसा निकष लावावा, अशी आपली भूमिका असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या जगात महामंदी चालू असून त्याचा भारतावरही अनिष्ठ परिणाम होत आहे. त्यामुळे देशात स्थिर सरकार असणे गरजेचे आहे. त्यामुळे आमच्या पक्षाचे लोक अधिक निवडून कसे येतील, याकडे आमचा कल राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मराठा समाजाला राजकीय क्षेत्रात आरक्षण द्यावे असे आपणास वाटत नाही. ज्यांना राजकारणात संधी मिळत नाही त्यांनाच आरक्षण मिळावे. मराठा समाजाची तशी परिस्थिती नाही. मराठा समाजाला शैक्षणिक, आर्थिक आणि शासकीय नोकऱ्यांत आरक्षण देण्यात हरकत नाही. परंतु देशात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांसाठी असलेल्या पन्नास टक्के आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण देण्यात यावे, अशी सूचना आपण केल्याचे श्री. पवार यांनी सांगितले.
मुंबई येथे झालेल्या अतिरेक्यांच्या हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर श्री. पवार यांनी युध्द हा पर्याय असू शकत नाही. दोन्ही राष्ट्र अणवस्त्रधारी आहेत. सामंजस्याचीच भूमिका घेण्यात आल्याचे सांगतानाच परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी यांनी दहशतवादावर दबाव आणण्याचे उत्तम काम केले आहे. आज जगातील बहुसंख्य राष्ट्रे भारताच्या बाजूने आहेत. पाकिस्तान एकाकी पडल्याचे ते म्हणाले.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर कुठलाही मुद्दा नसल्यामुळे भाजपने नागपूरमध्ये पुन्हा रामाचे नाव घेऊन धार्मिक आणि भावनिक प्रश्न जो झिजलेल्या नाण्यासारखा आहे, तो उपस्थित केला आहे. त्याच फार उपयोग त्या पक्षाला होणार नाही, असेही पवार यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस जिल्ह्य़ाचे पालकमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील हे उपस्थित होते.