Leading International Marathi News Daily                                 बुधवार, ११ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

विमानसेवेमुळे सोलापूरच्या विकासाचा नवा टप्पा गाठेल - पवार
सोलापूर, १० फेब्रुवारी/प्रतिनिधी

 

सोलापुरात सुरू झालेल्या विमानसेवेमुळे स्थानिक विकासाचा नवा टप्पा गाठला जाईल, असा विश्वास केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केला. ही विमानसेवा कायमस्वरूपी राहण्यासाठी प्रतिसाद देण्याचे आवाहनही त्यांनी सोलापूरकरांना केले.
भारताची पहिली आणि एकमेव पंचतारांकित विमान वाहतूक कंपनी ‘किंगफिशर एअरलाईन्स’ येत्या १७ फेब्रुवारीपासून मुंबई-सोलापूर दरम्यान नियमित विमान फेऱ्या सुरू करणार आहे. या विमानसेवेचा शुभारंभ मंगळवारी दुपारी श्री. पवार यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. ही विमानसेवा सुरू करण्यासाठी विशेष पुढाकार घेणारे ग्रामविकासमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील हे या ऐतिहासिक स्वरूपाच्या समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे, ग्रामविकास राज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे, रिपाइर्ं नेते खासदार रामदास आठवले, महापौर सौ. अरुणा वाकसे, जिल्हा परिषद अध्यक्षा सुमन नेहतराव, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष सुधाकर परिचारक आदींची प्रमुख उपस्थिती होती. सोलापूर-मुंबई विमानसेवेच्या या खास शुभारंभ फेरीचा लाभ खासदार रामदास आठवले यांच्यासह निवडक व्यक्तींनी घेतला.
सोलापूरकरांना मुंबईला जाण्यासाठी रात्रीची रेल्वे सोयीची असल्याने रेल्वे प्रवासाची जुनी सवय आहे. ही सवय बदलून आता विमानसेवेचा लाभ घेणे आवश्यक असल्याचे सांगताना श्री. पवार पुढे म्हणाले की, आर्थिक व्यवस्था मजबूत होण्यासाठी दळणवळण सेवा प्रबळ असावी लागते. त्यात विमानसेवा थेट प्रवासासाठी अधिक प्रभावी आहे. या नवीन सेवेमुळे सोलापूरच्या विकासाला नवा टप्पा गाठता येणे शक्य आहे. ही नवीन विमानसेवा उत्तम दर्जाची ठरेल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सध्याच्या आर्थिक मंदीच्या संकट काळात विमानसेवेसाठी खर्च करण्याची भूमिका व्यापारी व उद्योजक कितपत घेतील, याबद्दल शंका व्यक्त करीत प्रवासी विमानसेवा फायद्याची नाही, तर ती ऑक्सिजनवर चालणारी सेवा आहे. अनेक विमान कंपन्यांना दरमहा शंभर कोटींचा तोटा सहन करावा लागतो. परंतु सोलापूरच्या नव्या विमानसेवेला प्रतिसाद मिळाला तर ती अधिक उपयुक्त ठरेल, असा आशावाद श्री. पवार यांनी व्यक्त केला.
ही विमानसेवा सुरू करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांनी श्री. विजयसिंह मोहिते-पाटील यांना धन्यवाद दिले.
केंद्रीय ऊर्जामंत्री शिंदे यांनी, सोलापुरात वीस वर्षांपूर्वी सुरू केलेली वायुदूत विमानसेवा जेमतेम दोन महिनेच चालू शकली. त्यामुळे पुन्हा नव्या विमानसेवेसाठी आपण थोडे मागेच होतो. त्यानंतर आता ही नवीन विमानसेवा श्री. मोहिते-पाटील यांच्या प्रयत्नांनी सुरू झाल्यानंतर पुरेसे प्रवासी मिळावेत. अन्यथा पूर्वीचे पाढेच गिरविले जातील, असे मनोगत व्यक्त केले. शरद पवार हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात सोलापूरच्या विमानतळावर धावपट्टी व अन्य काही सुविधा उपलब्ध झाल्या. त्यानंतर आपण मुख्यमंत्री असताना या विमानतळावर रात्री विमान उतरण्याची सोय केली गेली. परंतु ही सोय असूनही आतापर्यंत विमानसेवा उपलब्ध नव्हती. ती आता प्रत्यक्षात सुरू होत असल्याबद्दल श्री. शिंदे यांनी समाधान व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात श्री. मोहिते-पाटील यांनी, सोलापुरातून मुंबईप्रमाणेच तिरुपती, हैदराबादपर्यंतही विमानसेवा सुरू करावी, अशी सूचना केली. या नवीन विमानसेवेमुळे सोलापूरच्या विकासाला फार गती येणार आहे. तांत्रिक अडचणींमुळे ही विमानसेवा सुरू होत नव्हती. शरद पवार व केंद्रीय हवाई उड्डाणमंत्री प्रफुल्ल पटेल यांनी सोलापूरला नवीन विमानसेवा सुरू करण्यासाठी हातभार लावल्याबद्दल त्यांचे श्री. मोहिते-पाटील यांनी आभार मानले. जिल्हाधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी प्रास्ताविक केले. तर किंगफिशर एअरलाईन्सचे संचालक सुभाष गुप्ते यांनी येत्या १७ फेब्रुवारीपासून ही विमानसेवा प्रत्यक्षात सुरू होणार असल्याचे सांगितले.
‘किंगफिशर रेड सव्‍‌र्हिस’ द्वारे एटीआर विमानाच्या मदतीने मुंबई-सोलापूर विमानसेवा आठवडय़ातून चार दिवस उपलब्ध असेल. प्रवासी अतिथींना विमान प्रवासात मोफत भोजन दिले जाईल. नियमित प्रवास करणाऱ्यांना प्रत्येक वेळी ‘किंग माईल्स’ गुणांक प्राप्त करता येईल व ते वापरून तिकिटे मोफतही मिळविता येतील. किंगफिशरने प्रवाशांना कमी भाडे ते प्रीमियम सेवा अशा सर्व श्रेणी देऊ केल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.
१७ फेब्रुवारीपासून मंगळवार, गुरुवार, शनिवार व रविवार याप्रमाणे आठवडय़ातून चार दिवस ही विमानसेवा सुरू राहणार आहे. मुंबईहून सकाळी ११.१५ वाजता एटीआर विमान (फेरी क्र. आयटी ४१८५) उड्डाण करून दुपारी १२.४५ वाजता सोलापुरात उतरेल. त्यानंतर दुपारी १.१५ वाजता हेच विमान (फेरी क्र. आयटी ४१८६) उड्डाण करून दुपारी २.४५ वाजता मुंबईत उतरणार आहे, अशी माहिती किंगफिशरच्या सूत्रांनी दिली.