Leading International Marathi News Daily                                 बुधवार, ११ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

पालिकेसाठी खुले भूखंड शोधून देण्यासाठी अतिक्रमण करणाऱ्याच्या नेतृत्वाखाली सांगलीत समिती
सांगली, १० फेब्रुवारी / प्रतिनिधी

 

सांगली महापालिकेच्या खुल्या भूखंडाचा शोध घेऊन ही मालमत्ता महापालिकेच्या नावे करण्यासाठी स्थायी समितीच्या सभेत नगरसेवक मनगू आबा सरगर यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांची एक समिती नियुक्त करण्याचा निर्णय मंगळवारी घेण्यात आला. विशेष म्हणजे मनगू सरगर यांनीच महापालिकेच्या डीपी रस्त्यावर अतिक्रमण करून कंपाऊंड घातले आहे. गेल्या चार महिन्यापासून साधे कंपाऊंड काढण्याचे धारिष्टय़ही महापालिका प्रशासनाने दाखवलेले नाही. अशावेळी त्यांची केलेली ही निवड वादग्रस्त ठरली आहे.
सांगली कॉलेज कॉर्नर परिसरात नगरसेवक मनगू सरगर यांचे हॉटेल असून या हॉटेलच्या पिछाडीस असलेल्या खुल्या भूखंडाला त्यांनी कंपाऊंड घातले आहे. वास्तविक या भूखंडावर उत्तर- दक्षिण ८० फुटी डीपी रस्त्याचे आरक्षण आहे. यापूर्वीही याठिकाणी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र महापालिकेने तात्काळ कारवाई करून हे अतिक्रमण काढून टाकले होते. पण महापालिकेची सूत्रे विकास महाआघाडीकडे आल्यानंतर पुन्हा या खुल्या भूखंडाला कंपाऊंड घातले आहे. याच परिसरातून मोठा नाला वहात असून या कंपाऊंडमुळे नाला सफाईसाठीही अडथळे येत आहेत. तसेच या परिसरात कन्या महाविद्यालय असून हे अतिक्रमण तात्काळ काढून घ्यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते काँग्रेसचे मुन्ना कुरणे यांनी तीन महिन्यापूर्वी केली होती. मात्र या चार महिन्यात हे अतिक्रमण काढण्याचे धाडस प्रशासनाला झाले नाही.
महापालिका क्षेत्रातील अद्यापही २५० हून अधिक खुले भूखंड महापालिकेच्या ताब्यात आलेले नाहीत. ही मालमत्ता नावे करून घेण्यासाठीही प्रशासनाकडून वेळीच कारवाई न झाल्याने यातील चार ते पाच जागा पुन्हा मूळ मालकाच्या ताब्यात गेल्या आहेत. त्यामुळे महापालिकेचेच कोटय़वधी रूपयांचे नुकसान झाले आहे. या विषयावर आज झालेल्या स्थायी समिती सभेत काँग्रेसचे हणमंत पवार, राजेश नाईक, सत्ताधारी गटाचे मकरंद देशपांडे व धनपाल खोत यांनी आवाज उठविला. अखेर सभापती हरिदास पाटील यांनी हे खुले भूखंड महापालिकेच्या ताब्यात आणण्यासाठी पाच सदस्यांची समिती नियुक्त करण्याची घोषणा करीत या समितीच्या अध्यक्षपदी मनगू सरगर यांची निवड केली. या समितीत हणमंत पवार, धनंजय सूर्यवंशी, शीतल पाटील यांचाही समावेश आहे. वास्तविक या समितीच्या अध्यक्षांनीच अतिक्रमण केलेला भूखंड महापालिकेच्या नावे अद्यापही झालेला नाही, तर इतर भूखंड ताब्यात येतील की नाही? अशीच शंका उपस्थित केली जात आहे. यावर विरोधी काँग्रेस नगरसेवकांनी मनगू सरगर यांनी भूखंडावर अतिक्रमण केले असेल तर हा भूखंडही महापालिकेच्या ताब्यात येण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे.