Leading International Marathi News Daily                                 बुधवार, ११ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

वसंतदादा बँकेवर अवसायक नेमणार- हर्षवर्धन पाटील
पुणे, १० फेब्रुवारी / खास प्रतिनिधी

 

वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेवर अवसायक नेमण्याबाबत कोणताही राजकीय दबाव नसून भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेच्या आदेशानुसार बँकेवर अवसायक नेमण्याची सूचना सहकार आयुक्तांना करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
आर्थिक अडचणीमुळे वसंतदादा सहकारी बँकेचा व्यवसाय परवाना रद्द करण्यात आला आहे. या बँकेवर अवसायक नेमण्याचे आदेश रिझव्‍‌र्ह बँकेने दिले आहेत. मात्र एक महिना उलटूनही बँकेवर अवसायक नेमला गेला नाही. यासंदर्भात सहकार मंत्र्यांना विचारले असता, त्यांनी रिझव्‍‌र्ह बँकेच्या निर्देशांनुसार अवसायक नेमण्यात येईल, असे स्पष्ट केले. रिझव्‍‌र्ह बँकेने दिलेल्या निर्देशांमध्ये कोणालाही हस्तक्षेप करता येत नाही. त्यामुळे कोणाच्या दबावाने बँकेवर अवसायक नेमण्यासाठी थांबायला सांगितलेले नाही आणि सांगू शकतही नाही, असेही पाटील यांनी सांगितले.
वसंतदादा सहकारी बँकेच्या सुमारे ३१५ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. मात्र वसुली व गैरकारभारामुळे बँकेची आर्थिक स्थिती ढासळली आहे. कमकुवत आर्थिक स्थितीमुळे बँकेवर आर्थिक निर्बंधही लागू करण्यात आले तसेच बँकेचा व्यवसाय परवाना रद्द झाला आहे. बँकेचा तोटा १९५ कोटींवर गेल्याने अवसायक नेमण्याचा आदेश रिझव्‍‌र्ह बँकेने दिला आहे. अवसायक नेमल्यास बँकेच्या सुमारे १ लाख ९४ हजार ठेवीदारांच्या एक लाखाच्या आतील ठेवींना संरक्षण मिळू शकणार आहे.