Leading International Marathi News Daily                                 बुधवार, ११ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

घोडावत यांच्या कारखान्यांवर प्राप्तिकर विभागाचे छापे
सांगली, १० फेब्रुवारी / प्रतिनिधी

 

सांगली येथील प्रसिध्द उद्योगपती राजेंद्र घोडावत यांच्या मालमत्तेवर कोल्हापूर येथील आयकर विभागाच्या एका पथकाने मंगळवारी छापे टाकले. श्री. घोडावत यांच्या उद्योगावर छापे टाकून आयकर विभागाने खळबळ उडवून दिली असून कागदपत्रांच्या तपासणीचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. या छाप्यातून आयकर विभागाच्या हाती काय लागले, हे मात्र अद्यापही गुलदस्त्यातच आहे.
कोल्हापूर येथील आयकर विभागाच्या १५ अधिकाऱ्यांच्या एका पथकाने काल राजेंद्र घोडावत यांच्या वसंतदादा औद्योगिक वसाहतीतील ज्युबिली डाईंग व ब्लिचिंग वर्क्‍स व मिरज औद्योगिक वसाहतीतील एम्पायर डाईंग अँड ब्लिचिंग वर्क्‍स या दोन कारखान्यांवर छापे टाकले होते. रात्री दीड वाजेपर्यंत या कारखान्यातील कागदपत्रांची तपासणी सुरू होती. आज या पथकाने श्री. घोडावत यांच्या माधवनगर येथील ज्युबिली हाऊस या निवासस्थानाची चौकशी सुरू केली आहे. या छाप्याबाबत आयकर अधिकाऱ्यांनी कमालीची गुप्तता पाळली असून काहीही सांगण्यास ठाम नकार दिला आहे.
शिराळा येथील तीन किराणा व्यापारी, एक लाकूड व सिमेंट व्यापारी यांच्यावर आज दुपारी आयकर विभागाच्या पथकाने छापे टाकून कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे. व्यापाऱ्यांच्या घरावरही अचानक टाकलेल्या या छाप्यामुळे शिराळ्यात एकच खळबळ उडाली आहे. या छाप्यात अपुरी कागदपत्रे व मालाचा बेहिशोबी साठा आढळल्याने व त्यानुसार आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी उशिरापर्यंत कारवाई सुरू केल्याचे समजते. सोमवारी शिराळा येथील आठवडा बाजाराचा दिवस असल्याने या दुकानातून ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती. काही वस्तू खरेदीनिमित्ताने निवडक दुकानांची पाहणी करून ग्राहकांना दिलेल्या पावत्या योग्य आहेत की नाहीत, जमा खर्चाच्या नोंदी याबाबतची सखोल माहिती घेऊन त्यानंतर लगेचच आयकर विभागाच्या पथकाने तपासणी सुरू केली असल्याचे व्यापारीवर्गातून बोलले जात आहे. आयकर विभागाच्या या कारवाईच्या भीतीने काही व्यापाऱ्यांनी तर आपली दुकाने बंद करून परगावीच जाणे पसंत केले आहे.