Leading International Marathi News Daily                                 बुधवार, ११ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

नांदणीत अखेर बाटली आडवी
इचलकरंजी, १० फेब्रुवारी / वार्ताहर

 

दोन वेळच्या अपयशातून तावून सुलाखून निघालेल्या नांदणी (ता.शिरोळ) गावातील महिलांनी एकजुटीचे दर्शन घडवीत मंगळवारी आडवी बाटली करण्यात यश मिळविले. गावातील एकमेव देशी दारू दुकान बंद करण्यासाठी बोलाविलेल्या खास सभेत ७० टक्के महिलांनी हात उंचावून कौल दर्शविला. या यशानंतर महिलांनी आनंदोत्सव साजरा केला.
नांदणी गावात शशिकला कोळी यांच्या मालकीचे देशी दारू दुकान १९७२ पासून सुरू आहे. ते बंद करण्यासाठी दोन वेळा प्रयत्न झाले पण महिलांची उपस्थिती कमी असल्यामुळे पदरी अपयश आले. गेल्या महिन्याभरापासून महिलांनी उचल खाल्ली. त्यांनी दुकान बंद करण्यासाठी प्रबोधन सुरू केले.
मंगळवारी सकाळी ९ वाजल्यापासून महिला गटागटाने केंद्रीय शाळेत मतदानासाठी दाखल होवू लागल्या. ११ वाजता सभेला सुरूवात झाल्यावर सरपंच सुवर्णा देवकाते यांची अध्यक्षपदासाठी निवड झाली. दारूबंदीचा ठराव वैशाली कणीरे यांनी मांडला. त्यास सुनंदा कांबळे यांनी अनुमोदन दिले. हात उंचावून मतदान करण्याचे आवाहन केल्यावर ४६२२ पैकी ३२५५ महिलांनी प्रतिसाद देवून बाटली आडवी केली. दारू उत्पादन शुल्क खात्याचे निरीक्षक के.टी.लोंढे, शिरोळचे गटविकास अधिकारी एम.आर.जाधव यांनी महिलांनी दाखविलेली एकजूट कौतुकास्पद असल्याचे सांगून दुकान बंद करण्याची प्रक्रिया सुरू करणार असल्याचे नमूद केले. यानंतर महिलांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करून आनंदाला वाट मोकळी करून दिली.