Leading International Marathi News Daily                                 बुधवार, ११ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

राजेशाही नको म्हणणारेच झालेत राजकारणातले राजे - उदयनराजे
सातारा, १० फेब्रुवारी/प्रतिनिधी

 

राजेशाही नको म्हणणारे राजकारणातले राजे झालेत. राजेशाही असती तर आपण ऐष केली असती. राजेशाहीत निर्णय करणे सोपे जाते. तसेच देशात राष्ट्रपती व राज्यपाल यांच्या व्यवस्थेवर करोडो रुपये खर्च होतोय. ही पदे रद्द करावीत अशी मागणी माजी महसूल राज्यमंत्री उदयनराजे यांनी पत्रकार परिषदेत केली व देशाच्या महत्त्वाच्या प्रकल्पाच्या उभारणीसाठी हा पैसा वापरावा असे सूचविले.
कोयना जलविद्युत प्रकल्पाद्वारे महाराष्ट्राला वीज पुरविण्यासाठी योगदान देणाऱ्या सातारा जिल्ह्य़ात शून्य वीज भारनियमन होण्याच्या मागणीसाठी येत्या २४ फेब्रुवारी नंतर आपण सातारा ते कोयनानगर पायी मोहीम काढणार असल्याचे उदयनराजे यांनी सांगितले.
उदयनराजे यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन जिल्ह्य़ात भूमाता गौरव दिंडी काढली. तिला व सांगता सभेला मोठा प्रतिसाद मिळाला त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली. त्यांनी मनोमिलनाचा धसका घेतला याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की राष्ट्रवादीच्या नेत्यांना एवढी कला अवगत आहे की बॉलबेअरिंगवर उभे राहिले तरी ते पडणार नाहीत उभेच राहतील. आपल्याला पक्षात येण्याविषयी तसेच मंत्रिपदाची ऑफर दिली होती हे सत्य आहे पण तसे कोणी कबूल करणार नाहीत. संपूर्ण राज्यात कुठल्याही एका नेत्याची माझ्या सभेएवढी मोठी सभा झालेली नाही. या सभेचे यशात रुपांतर होणार आहेच असे त्यांनी सांगितले.
देशात १८५७ ची परिस्थिती निर्माण झालेली आहे. लोक हैराण झाले आहेत. आत्महत्या करणारे लोक पुढाऱ्यांना गोळ्या घालून मारून टाकतील अशी वेळ आली आहे. सत्ताधाऱ्यांनी लोकांचा अंत पाहू नये. भ्रष्टाचारामुळे कोणताही जनहिताचा निर्णय होत नाही. देशाच्या अखंडतेचा, अस्मितेचा प्रश्न आहे. उदयनराजेंचा नाही. सत्ताधारी नेते व्यक्तिकेंद्रीत झाले असल्याने त्यांना स्वत:पलीकडे काही दिसत नाही. बोलायचे धाडस करीत नाहीत. म.गांधींचे नाव घेणारे स्वत:च्या मुलगा, मुली व्यतिरिक्त पाहात नाहीत. बाकीचे लोक मेलेत का? आयती सत्ता मिळत असल्याने त्यांना लोकांचे योगदान काय कळणार. मूर्खासारखे वागणाऱ्यांकडून पत्रकारांनीही अपेक्षा ठेवू नये. जनतेचा पक्ष मोठा आहे, असे ते म्हणाले.
शिवेंद्रसिंहराजे आम्ही मनाने एकच
राजघराण्याचे मनोमिलनाचा धसका घेणारे काहीही बोलत असले तरी त्यांचे दुकान चालण्यासाठीच वेगवेगळे विचार मांडत असतात. शेवटी शिवेंद्रसिंहराजे आम्ही मनाने एकत्रच आहोत. त्यांनी राष्ट्रवादी पक्षाचा आदेश पाळयचा की नाही हे त्यांनी ठरवायचे आहे. शिवेंद्रसिंहराजेंवर लोकसभा निवडणुकीत आपले काम करण्याची सक्ती करणार नाही. माझ्यामुळे कुणी अडचणीत येत असतील तर ते माझा प्रचार करणार नाही. पण माझा मुद्दा मी सोडणार नाही, कसे वागायचे हा त्यांना अधिकार आहे.
वेळ आली तर माघार
जनतेच्या हिताची आपल्याला खाज आहे. इर्षां, निश्चय व आत्मीयतेने मी माझे काम करीत राहणार आहे. वेळ आली तर लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरणार नाही. सर्वसामान्य सक्षम शेतकऱ्यास निवडून आणीन. अनर्थ होईल अशी परिस्थिती सध्या आहे. माझी सभा कोणालाही आव्हान देण्यासाठी नव्हती. ते लोक ग्रेट आहेत असे शरद पवार यांचा नामोल्लेख न करता त्यांनी सांगितले. कोंबडी विंचू खाते तिला काही होत नाही. तिच कोंबडी पुढारी खातो त्यांनाही काही होणार नाही. त्यांनी माझे उपकार मानले पाहिजेत. त्यांचे काम व्यक्तिकेंद्रीत आहे, तर आमचे समाजकेंद्री आहे. त्यामुळे मी कोणाचा नामोल्लेख केला नाही, असे उदयनराजे यांनी सांगितले.