Leading International Marathi News Daily                                 बुधवार, ११ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

ग्राहकांच्या हक्क जागृतीसाठी प्रबोधन आवश्यक- फारुकी
सांगली, १० फेब्रुवारी / प्रतिनिधी

 

सर्वसामान्य खरेदीदारात जागृती निर्माण होण्यासाठी ग्राहकांच्या हक्कांसाठी प्रबोधन होणे गरजेचे असून यात तहसीलदार मोठी जबाबदारी पार पाडू शकतात, असे प्रतिपादन ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष कमाल फारुकी यांनी केले.
ग्राहक चळवळ ग्रामीण भागापर्यंत पोहोचविण्यासाठी सांगली जिल्ह्य़ातील ग्राहकांच्या तक्रारींची दखल व निराकरण तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्थेची कार्यप्रणाली व त्यातील त्रुटींबाबत चर्चा व निवारण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अल्पबचत सभागृहात आयोजित केलेल्या बैठकीत कमाल फारुकी बोलत होते.
ग्राहक कल्याण समित्या व ग्राहक निवारण मंच हे फक्त अन्न व नागरी पुरवठा विभागाशी संबंधित आहेत, असा गैरसमज असून ग्राहक आपण खरेदी केलेल्या कोणत्याही वस्तू वा सेवेबद्दल दाद मागू शकतो, हा त्याचा हक्क आहे, असे स्पष्ट करून श्री. फारुकी म्हणाले की, अन्नपदार्थ, तेल, दूध, मसाले, औषधे व पेट्रोलियम पदार्थ यातील भेसळ रोखण्यासाठी ग्राहकांमध्ये जनजागृती होणे महत्त्वाचे आहे.
ग्राहकाचे हक्क, त्याच्यासाठी असलेल्या सुविधा, कायद्याने त्यांना दिलेले संरक्षण याबाबत प्रचार, प्रसार व जनजागृती करण्याच्या आवश्यकतेवर भर देऊन ते म्हणाले की, या संदर्भात ठिकठिकाणी स्थापन करण्यात आलेल्या दक्षता समित्यांची जबाबदारीही मोठी आहे. अन्न व औषध प्रशासन व वजनमापे नियंत्रक यासारख्या कार्यान्वयीन यंत्रणांनीही दक्ष राहून छापे टाकणे व अवैध गोष्टी आढळून आल्यास कारवाई करणे याकडे लक्ष कंेद्रित करणे आवश्यक आहे.
कंेद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यामुळे महाराष्ट्राला १५ हजार मेट्रिक टन गव्हाचा अतिरिक्त कोटा वाढवून मिळाला आहे. हा गहू गोरगरिबांपर्यंत पोहोचतो की नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी ग्राहक जागृती क्षेत्रात कार्य करणाऱ्या स्वयंसेवी कार्यकर्त्यांचीही आहे. गरिबांचे धान्य गरिबाला मिळाले पाहिजे, यासाठी शिधावाटप दुकानदार, तहसीलदार व पुरवठा अधिकारी या सर्वानीच दक्षता घ्यावी, असे आवाहनही कमाल फारुकी यांनी केले.
प्रारंभी अतिरिक्त जिल्हाधिकारी विश्वजित माने यांनी स्वागत करून प्रास्ताविकात सांगली जिल्ह्य़ात सुरू असलेल्या ग्राहक संरक्षण चळवळीविषयी माहिती दिली. जिल्ह्य़ात आयोजित करण्यात येत असलेल्या जागतिक व राष्ट्रीय ग्राहक दिन तसेच अन्य ग्राहक उपक्रमांविषयी माहिती देऊन गॅस ग्राहकांसाठी शहरात महिन्यातून दोनदा गॅस ग्राहकदिनाचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगितले. या बैठकीला ग्राहक हक्क विषयक विभागांचे संबंधित अधिकारी, रेशन, रॉकेल, गॅस व पेट्रोल- डिझेल पंप तसेच ग्राहक संघटनांचे प्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते.