Leading International Marathi News Daily                                 बुधवार, ११ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

महिला लिपिकाच्या बडतर्फीचा प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळला
सांगली, १० फेब्रुवारी / प्रतिनिधी

 

जन्म- मृत्यूच्या दाखल्यात फेरफार केल्याप्रकरणी लिपिक श्रीमती सुवर्णा पाटील यांना बडतर्फ करण्याचा महापालिका प्रशासनाचा प्रस्ताव फेटाळून लावत स्थायी समितीच्या सभेत त्यांच्यावर केवळ ठपका ठेवण्यात आला. ही फेरफार एका पदाधिकाऱ्याने केला असून श्रीमती पाटील या प्रथमदर्शनी निर्दोष असल्याचेही सभापती हरिदास पाटील यांनी सांगितले.
मिरज येथील जन्म- मृत्यू विभागाकडील लिपिक सुवर्णा पाटील यांनी नोंदणीत फेरफार करून दाखला दिल्याचे प्रकरण चार वर्षांपूर्वी चांगलेच गाजले होते. श्रीमती पाटील यांची विभागीय चौकशीही झाली होती. या चौकशीत त्यांच्यावर आरोपही सिध्द झाले होते. त्यानंतर प्रशासनाने त्यांच्या बडतर्फीची शिफारस करणारा प्रस्ताव स्थायी समितीसमोर आणला होता. पण या प्रस्तावाला सत्ताधारी गटाबरोबरच विरोधी सदस्यांनीही आक्षेप घेतला. वास्तविक श्रीमती पाटील या निर्दोष असून एका तत्कालीन पदाधिकाऱ्यानेच नोंदणी रजिस्टरमध्ये खाडाखोड केली होती, असा मुद्दा नगरसेवक महादेव कुरणे यांनी मांडला. अन्य सदस्यांनीही त्याला पाठिंबा देत त्यांच्या बडतर्फीची मागणी फेटाळून लावत त्यांना कमीत कमी शिक्षा करण्याची विनंती केली. त्यानुसार सभापती हरिदास पाटील यांनी केवळ त्यांच्या सेवापुस्तिकेत नोंद करण्याचे आदेश देत हा विषय बाजूला केला.
महापालिकेच्या आजपर्यंतच्या इतिहासात अनेक अधिकाऱ्यांवर गैरव्यवहाराचे आरोप झाले. त्यासाठी चौकशी समितीही नियुक्त केल्या गेल्या. मग तो निवडणुकीतील मतमोजणी घोटाळा असो की भ्रष्टाचार! प्रत्येक प्रकरणात आरोप सिध्द होऊनही संबंधितावर कधीही कारवाई झालेली नाही. उपायुक्त दर्जाच्या एका अधिकाऱ्याला तर मतमोजणी घोटाळ्याप्रकरणी खुद्द न्यायालयाने दोषी ठरवले असतानाही महापालिकेने त्यांना क्लिनचिट देऊन पदोन्नतीही दिली आहे. मात्र एक महिला कर्मचारी दोषी नसतानाही ठपका का ठेवण्यात आला, असेच कोडे सर्वाना पडले आहे.
स्थायी समितीच्या आजच्या सभेत सत्ताधारी गटाचे ज्येष्ठ नगरसेवक धनपाल खोत यांनी गेल्या सभेत आपण काही विषयांना विरोध नोंदविला होता, त्याची दखल प्रशासनाने घेतली आहे का, अशी विचारणा केली. त्यावर नगरसचिवांनी विरोध नोंदविल्याचे सांगितले. काँग्रेसनेही या विषयांना आपला विरोध असल्याचे सांगत तशी नोंद करावी, अशी मागणी लावून धरली. अखेर नगरसचिवांनी सभागृहाची माफी मागत धनपाल खोत यांचा विरोध नोंदविला नसल्याचे कबूल केले.

सभापतीच उशिरा
महिन्याभरापूर्वी स्थायी समितीच्या सभेला उशिरा आल्याबद्दल सभापती हरिदास पाटील यांनी दोघा अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते. गेल्या तीन ते चार सभांना खुद्द सभापतीच १५ ते २० मिनिटे उशिरा येत आहेत. विरोधी काँग्रेस सदस्यांनी सभापतींना याबाबत आज जाब विचारण्याचा प्रयत्नही केला. पण हरिदास पाटील यांनी सावरासावरी करून वेळ मारून नेली. यापुढे सभापतींनी सभेला विलंब केल्यास बहिष्कार टाकण्याचा इशारा काँग्रेसचे नगरसेवक राजेश नाईक यांनी दिला.