Leading International Marathi News Daily                                 बुधवार, ११ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

राष्ट्रीय समाज पक्ष लोकसभेच्या तीनशे जागा लढवणार- जानकर
सांगोला, १० फेब्रुवारी/वार्ताहर

 

विषमतावाढी व्यवस्थेला मूठमाती देऊन समाजवादी समाज निर्मितीचे आमचे धोरण असून त्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षातर्फे देशात ३०० लोकसभेच्या जागा लढविणार असल्याची माहिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिली.माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षातर्फे उमेदवार म्हणून जानकर निवडणूक लढविणार आहेत. प्रचारानिमित्त मतदारसंघातील सांगोला येथे आले असता पत्रकार परिषदेत जानकर यांनी माहिती दिली.
जानकर पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात ४८ जागा असून, त्या सर्व जागा राष्ट्रीय समाज पक्षातर्फे लढविल्या जाणार आहेत. महाराष्ट्रात आमच्या पक्षाचे १५०० ग्रामपंचायत सदस्य आहेत, तर अंबेजोगाई पंचायत समतीत बहुमत आमच्या पक्षास आहे. चार राज्यात ६ टक्के मते मिळवून राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळविण्याचा प्रयत्न राहणार आहे.
समाज व राजकारणाविषयी जानकर म्हणाले, महात्मा फुले यांच्या विचारावर श्रद्धा ठेवून आमच्या पक्षाची वाटचाल राहणार आहे. शासनामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात त्या त्या समाजाला भागीदारी मिळाली पाहिजे. महाराष्ट्रात ठराविक घराण्यामध्ये सत्ता वाटून घेतली जाते. लोकशाहीच्या नावाखाली घराणेशाही सुरू आहे. शिक्षणाचे राष्ट्रीयकरण झाल्याशिवाय मक्तेदारी संपणार नाही.
भाजप व काँग्रेस यांनी वंश परंपरावाद जोपासला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय पक्ष नाही. तो काँग्रेस पक्षाचा बाहुला आहे, असे सांगून जानकर म्हणाले की, सध्याची लोकशाही खरी नाही. बाहुबलापेक्षा आमची बुद्धिबळावर श्रद्धा आहे. समाजमंदिर बांधून विकास होत नाही. नागरिकांना भौतिक सुविधा मिळवून दिल्या पाहिजेत. दलितांना माणुसकीचा हात मिळाला नाही. बहुजन समाजाच्या मताला किंमत दिली नाही. समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन चालायचा मनोदय असल्याचे सांगितले. मी म्हसवडजवळील पळसावले गावाचा रहिवाशी आहे. माझा माण तालुका माढा मतदारसंघास जोडला आहे. त्यामुळे हा मतदारसंघ घरचा मतदारसंघ आहे. दिल्ली आमचे लक्ष असून, वाटेल ती किंमत मोजून माढा मतदारसंघ मिळविणारच आहे.