Leading International Marathi News Daily                                 बुधवार, ११ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

शिरढोण ग्रामस्थांचा रस्ता रोकोचा इशारा
इचलकरंजी, १० फेब्रुवारी / वार्ताहर

 

कृष्णा नळपाणी योजनेच्या बेकायदेशीर जोडणी घेणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचा ठराव संमत झाल्यावर शिरढोण गावातील ग्रामस्थांनी नगराध्यक्षा व पाणीपुरवठा सभापतींचा निषेध नोंदवून मंगळवारी रास्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे. त्यावर टाकवडे गावचे सरपंचांनी रास्ता रोको आंदोलनात टाकेवडेकरांचा सहभाग नसल्याचे स्पष्टीकरण करून पाण्याची बेकायदा जोडणी घेणाऱ्यांवर कारवाई करण्यास आपली ना नसल्याचे सांगितले. तर नगराध्यक्षा किशोरी आवाडे यांनी पिण्यासाठी पाणी देण्यास नकार नाही पण शेतीसाठी बेकायदेशीर जोडणी केल्यास त्यावर कारवाई करण्याचा पुनरूच्चार केला. या घटना, आरोप प्रत्यारोपांमुळे या प्रश्नाच्या वादाने पुन्हा उचल खाल्ली आहे.
नगराध्यक्षा आवाडे, टाकवडेचे सरपंच श्री.मुल्ला, शिरोळचे माजी सभापती प्रकाश पाटील यांनी पालिकेत संयुक्तरित्या निवेदन केले. श्री.मुल्ला म्हणाले, कृष्णा योजनेची जलवाहिनी गावातून गेल्यामुळे आम्हाला पालिकेकडून दररोज सव्वा दोन लाख लिटर्स पाणी पुरवठा होतो. तो कमी पडत असल्याने त्यामध्ये वाढ झाली पाहिजे. इचलकरंजी पालिकेशी आमचे संबंध चांगले असल्याने याप्रश्नी आंदोलन करण्याचा प्रश्न उद्भवत नाही.
नगराध्यक्षा आवाडे म्हणाल्या, कृष्णा योजनेच्या गळतीचा त्रास शहरासह टाकवडे, शिरढोण गावाला होतो हे खरे आहे. गळतीची समस्या मिटवण्यासाठी पालिकेने सुजल योजनेचा प्रस्ताव दाखल केला आहे. पिण्यासाठी दोन्ही गावांना पाणी देणे हे पालिकेचे कर्तव्य आहे. शिरढोण गावातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीत मीटरप्रमाणे पाणी देण्याची पालिकेची तयारी आहे. निषेध, रास्ता रोको करून प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी समक्ष चर्चा केली पाहिजे. जलवाहिनीचे व्हॉल्व्ह ढिले करून पाणी घेण्याचा प्रकार बंद करण्यात येणार आहे.