Leading International Marathi News Daily                                 बुधवार, ११ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

एसटी भाडे कमी करण्याच्या मागणीसाठी सांगलीत निदर्शने
सांगली, १० फेब्रुवारी / प्रतिनिधी

 

पेट्रोल व डिझेलच्या किमती कमी झाल्याने एसटी महामंडळाने आपले प्रवासी भाडे कमी करावे, या मागणीसाठी सांगली जिल्हा जनता दलाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. के. डी. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन महामंडळाच्या सांगली विभागीय कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. याबाबत तातडीने निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही अ‍ॅड. शिंदे यांनी दिला.
राज्य परिवहन महामंडळ हे प्रवासी वाहतुकीचा परवाना असलेले एकमेव सार्वजनिक महामंडळ आहे. सर्वसामान्य गरजू, ग्रामीण व शहरी प्रवाशांचे एसटी हे हक्काचे वाहन आहे. मात्र सध्या हे हक्काचे वाहन खुल्या अर्थव्यवस्थेत अस्तित्वासाठी झगडत आहे. सर्वसामान्यांचे वाहन टिकले पाहिजे, ही आमची ठाम व स्पष्ट भूमिका आहे. मात्र ज्या ज्या वेळी एसटीला लागणाऱ्या डिझेलच्या किमतीत वाढ झाली, त्या त्या वेळी राज्य सरकारने व परिवहन महामंडळाने डिझेल दरवाढीची ढाल पुढे करून प्रवाशांवर एकतर्फीच भाडेवाढ लादलेली आहे, असेही अ‍ॅड. शिंदे म्हणाले. गेल्या चार महिन्यांत डिझेलची किंमत दोन वेळा कमी झाली आहे. परंतु डिझेलची किंमत वाढल्यावर भाडेवाढ करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाला या किमती कमी झाल्यावर वारंवार मागणी करूनही प्रवासी भाडे कमी करण्याची सुद्बुद्धी झालेली नाही. अशातच वडापवाल्यांनी आपले प्रवासी भाडे कमी केल्याने सर्वसामान्य प्रवासी वडापकडे आकर्षित होऊ लागला आहे. त्यामुळे खऱ्याअर्थाने एसटीचेच अस्तित्व धोक्यात येणार आहे. शेजारील कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाने डिझेलची किंमत कमी झाल्यावर प्रवासी भाडय़ात कपात करून चांगला पायंडा पाडला व प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. तरी राज्य परिवहन महामंडळाने प्रवासी भाडे कमी करावे अन्यथा, प्रचंड जनक्षोभास सामोरे जावे लागेल, असा इशाराही अ‍ॅड. के. डी. शिंदे यांनी दिला आहे.
या आंदोलनात हमाल पंचायतीचे नेते बापूसाहेब मगदूम, अ‍ॅड. फैयाज झारी, जनार्दन गोंधळी, डॉ. जयपाल चौगुले, श्रीमती विद्या स्वामी, शोभा गोंधळी, संजय ऐनापुरे, भूपाल मगदूम, अजीज मुजावर व दत्तात्रय घाडगे आदींसह जनता दलाचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.