Leading International Marathi News Daily                                 बुधवार, ११ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

सांगलीत येत्या शुक्रवारी रामदास कदम यांची सभा
सांगली, १० फेब्रुवारी/प्रतिनिधी

 

केंद्र व राज्यातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारने आजवर दिलेल्या अनेकविध फसव्या घोषणांचा बुरखा फाडण्यासाठी शुक्रवार दि. १३ फेब्रुवारी रोजी शिवसेनेचे विरोधी पक्षनेते रामदास कदम यांची सांगली येथे जाहीर सभा आयोजित केल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार परशुराम उपरकर यांनी दिली.
नुकतीच शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची सातारा येथे जाहीर सभा झाली. या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. काँग्रेस आघाडी सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीची फसवी घोषणा केलेली आहे. या शेतकऱ्यांचा अद्याप एक रुपयाही माफ झालेला नाही. राज्यकर्त्यांच्या बँका, पतसंस्था व सोसायटीतील कर्जमाफीची माहिती या शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. याबाबत दि. ११ फेब्रुवारी रोजी सर्व संस्थाचालकांना निवेदन देण्यात येणार असल्याचेही आमदार उपरकर यांनी सांगितले.शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीची सत्ता असताना कृष्णा खोऱ्यातील ८० टक्के कामे पूर्ण झाली होती. मात्र काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात ती पुन्हा रखडलेली आहेत. जनतेला पाणी नाही, वीज भारनियमन वाढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ कर्जमाफी नाही, तर संपूर्ण कर्जमुक्ती हीच शिवसेनेची प्रमुख मागणी आहे.आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीविषयी बोलताना ते म्हणाले की, शिवसेना व भाजप कार्यकर्त्यांत कोणतेही मतभेद नाहीत. लोकसभा निवडणुकीत सांगली मतदारसंघासाठी शिवसेना आग्रही राहणार असून, याबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार असल्याचेही आमदार उपरकर यांनी सांगितले. या वेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बजरंग पाटील, बबन भगत, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख श्रीमती सुनीता मोरे व विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख शंभोराज काटकर आदी उपस्थित होते.