Leading International Marathi News Daily                                 बुधवार, ११ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

सातारा जिल्ह्य़ातील नेते ‘लिक्वीडेशन’मध्ये - उदयनराजे
‘मला अडवण्याची भाषा करणाऱ्यांची वाट लावीन ’
सातारा, १० फेब्रुवारी / प्रतिनिधी

 

सातारा जिल्ह्य़ातील सर्व नेते लिक्वीडेशनमध्ये निघाले आहेत. त्यांच्या हातून काहीही भले होणार नाही. जिल्ह्य़ाचे पाणी वीज बाहेर फळवून नेली जात आहे. ते रोखून धरण्याची हिंमत फक्त माझ्याच मनगटात आहे. सातारा जिल्ह्य़ाचा मी वाघ आहे. परजिल्ह्य़ातील शेळ्यामेंढय़ांना खाऊन टाकीन माझ्या नादाला कुणी लागू नका. मला आडवण्याची भाषा करणाऱ्यांची वाट लावीन अशा कणखर शब्दात माजी महसूल राज्यमंत्री उदयनराजे भोसले यांनी काँग्रेसच्या नेत्यांना आव्हान दिले.
उदयनराजे यांनी जिल्ह्य़ात काढलेल्या भूमाता गौरव दिंडीची सांगता सोमवारी रात्री येथील हजेरी माळावर झालेले भव्य संकल्प सभेत झाली. त्यामध्ये ते बोलत होते. व्यासपीठावर ज्येष्ठ कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक,नगराध्यक्ष निशांत पाटील यांच्यासह उदयनराजेंचे प्रमुख समर्थक कार्यकर्ते होते. उदनयराजे म्हणाले, माझ्या मनगटात ताकद आहे ती जनतेच्या विश्वासाची आहे. ती आहे तोपर्यंत जिल्ह्य़ावर अन्याय होऊ देणार नाही.
सर्व आमदार, खासदारांनी एकत्र येऊन आपली पेन्शन, मानधन वाढवून घेतले. त्यांची पेन्शन गोठवण्यात आली. तर त्यातून अनेक प्रश्न सुटण्यास मदत होईल. ‘एआयबीपी’ योजनांचे प्रस्ताव गेले १२ वर्षांत महाराष्ट्र सरकारने केंद्राला पाठविले नाहीत. त्यामुळे धरणांना निधी मिळत नसल्याने त्यांची कामे रखडली आहेत. प्रत्येक समाज आरक्षण मागू लागला आहे. शेतकऱ्यांना आरक्षण आहे का? त्याचा कोणी विचार करीत नाही. तो झाला तर देश महासत्ता बनेल. देशाचे भले करायचे असेल तर शेतकऱ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे. आपल्या लोकसभा उमेदवारीमुळे धसका घेतलेले मला आडवण्याची भाषा करीत आहेत. अडवा अन् जिरवा ही त्यांचीच घोषणा आहे. आता त्यांना शेतकरीच अडवून जिरवणार आहेत. आपण शेतकऱ्यांचे प्रश्न हातात घेतले ते विरोधकांनी घेतले असते तर त्यामध्ये आनंदाने सहभागी झालो असतो. आता मला आडवण्याचे लांबच राहिले. माझ्या आडवे तर जाऊन दाखवा असे आव्हान त्यांनी त्या वेळी दिले.आपल्याला मंत्रिपदाच्या ऑफर आल्या पण मी त्या नाकारल्या. ऑफर देणाऱ्यांच्या पंक्तीत बसायला मला लाज वाटते. लोकांच्या आदराला आणि विश्वासाला पात्र राहून काम केले पाहिजे. ते मी हातात घेतले आहे. जिल्ह्य़ाचे पाणी एक्स्प्रेस कॅनॉलने बाहेरच्या जिल्ह्य़ात नेले गेले. त्यावेळी जिल्ह्य़ातील लोकप्रतिनिधी काय करत होते. या लोकप्रतिनिधींचे जनतेने ऑडिट केले पाहिजे.डॉ. बुधाजीराव मुळीक म्हणाले, छत्रपती शिवरायांच्या जीवावर अनेकजण पोटं भरतात. पण त्यांचे शेतीधोरणाची दखल आजपर्यंत कोणी घेतली नाही. ती शिवरायांचे थेट तेरावे वंशजांनी घेतली आहे. त्यांना कोणी गॉड फादर नाही. जनताच त्यांची गॉडफादर आहे. ती त्यांना लोकसभेत पाठविल्याशिवाय राहणार नाही.